आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milind Bendale Artical On Nagar District Politics

सर्व झोत प्रस्थापितांवरच...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लोकसभेचे नगर व शिर्डी असे दोन मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघांत युतीचे खासदार आहेत. शिर्डीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे, तर नगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे दिलीप गांधी खासदार आहेत. युतीकडून हे दोन्ही मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसने कंबर कसली आहे. पण त्यांचे घोडे उमेदवारीपुढे अडले आहे. नगर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सध्या राष्ट्रवादीतून माजी मंत्री बबनराव पाचपुते, त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह व राजीव राजळे यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी विक्रमसिंह यांचे नाव निश्चित झाल्याचे त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगतात. कारण पक्षाची नुकतीच जी बैठक झाली त्यात राजळे यांनी आपल्याला उमेदवारी नको असल्याचे सांगितल्याचे पाचपुते समर्थक सांगतात. बबनराव पाचपुते लोकसभेत जाण्यासाठी अजिबात उत्सुक नाहीत. पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी याबाबत ठणकावूनही सांगितले आहे. एकतर विक्रमसिंह यांना उमेदवारी द्या; त्यांना देणार नसाल तर दुस-या कोणालाही द्या, पण मला नको, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना लोकसभेत नेण्याची राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची योजना नगरपुरती तरी गुंडाळली जाणार आहे.
असे असले तरी बबनराव पाचपुते व राजळे यांच्या नावाच्या चर्चेचे गु-हाळ जोरात सुरू आहे. पक्षाच्या व्यासपीठावर राजळे काय बोलले ते आम्हाला माहिती नाही, पण राजळेंच्या उमेदवारीसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे राजळे समर्थक म्हणतात. दरम्यान, राजळेंनी पुन्हा तयारी सुरू केल्याची माहिती समजते. तरुण व अभिजनवर्गात चांगली प्रतिमा असलेल्या राजळेंना खरा धोका स्वकीयांपासूनच आहे.
विक्रमसिंह पाचपुते हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी परदेशात व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतले आहे. लोकसभेसाठी त्यांनी आधीच तयारी सुरू केली होती. त्यादृष्टीने दुष्काळी परिस्थितीत पाचपुते यांनी नगर मतदारसंघातील सर्व तालुके चाळून काढले. आधी चारा व नंतर जनावरांच्या छावण्यांकडे चांगले लक्ष दिले. परिणामी त्यांचा मतदारसंघासह नगर शहरातही चांगला संपर्क आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत त्यांचे पारडे जड मानले जाते. शिवाय पालकमंत्रिपद भूषवलेल्या वडिलांची पुण्याई त्यांच्यामागे आहे. पालकमंत्रिपदी असताना बबनराव पाचपुते यांनी नगर शहराकडेही चांगले लक्ष दिले होते. त्याचाही लाभ विक्रमसिंह यांना होऊ शकतो. राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी अशी रस्सीखेच असताना प्रतिस्पर्धी भाजपच्या गोटात मात्र अद्याप शांतता आहे. भाजपतर्फे पुन्हा खासदार दिलीप गांधी व जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांची नावे चर्चेत असली तरी गांधी यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते. उमेदवारीसाठी दोघांचीही नुकतीच दिल्लीवारी झाली आहे. नगर मतदारसंघात नगर शहर व तालुका, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या तालुक्यांचा समावेश आहे. गांधी दोन वेळा खासदार असल्याने त्यांचा काही तालुक्यांत जनसंपर्क चांगला आहे. अर्थात पहिल्या टर्मच्या तुलनेत या वेळच्या टर्ममध्ये त्यांचा संपर्क कमी झाल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. मोदी लाटेचा त्यांना निश्चित लाभ होऊ शकतो. नगर मतदारसंघात (पूर्वीचा नगर दक्षिण) तिरंगी लढत झाल्यास भाजपला लाभ होतो, पण दुरंगी लढत झाल्यास नुकसान होते, असा इतिहास आहे. या वेळी बंडखोरीची शक्यता कमी असल्याने जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे असल्याने विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पर्याय नाही. त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. शिर्डीमुळे त्यांच्यावर प्रसिद्धीचा चांगला प्रकाशझोतही आहे. काँग्रेसकडून मात्र अद्याप कोणाच्याही नावाची चर्चा नाही. एकतर हा मतदारसंघ राखीव असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याला या निवडणुकीत फारसे स्वारस्य असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे सर्व चर्चा नगर मतदारसंघाचीच आहे. विशेष म्हणजे या चर्चेत नव्या नावाची कोठेही चर्चा नाही. जी आहे ती प्रस्थापित व त्यांच्या घराणेशाहीचीच.
‘आप’ही नशीब आजमावणार
आम आदमी पार्टीही या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पारनेर तालुक्यातील असल्याने ‘आप’ ला विशेष आशा आहेत. पण दिल्ली व नगरमध्ये मोठे अंतर आहे. तरीही ‘आप’बद्दल तरुणाईत उत्सुकता असल्याने चांगला उमेदवार दिल्यास तो दोन्ही प्रमुख उमेदवारांना त्रासदायक ठरू शकतो.