आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धगयेतल्या बॉम्बस्फोटांमागील ‘बोध’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौतम बुद्धाला जेथे ज्ञानप्राप्ती झाली ती बोधगया नगरी जगातल्या बौद्धांची पवित्र जागा आहे. तिची तुलना पोपनगरी रोमशी होणार नाही की अन्य धर्मीयांच्या तीर्थस्थळांशी. कारण जगाला शांतीच्या संदेशासोबत समता, बंधुभाव, प्रेमाच्या शिकवणीचा तेथूनच उगम झाल्याचे मानले जाते. अशा पवित्र स्थानी असलेल्या महाबोधी मंदिरात गेल्या 7 जुलै रोजी साखळी बॉम्बस्फोट नुकतेच घडवले. यामागे इंडियन मुजाहिदीन ही संघटना आहे, असे सांगितले जात असले तरी ते सत्याच्या विपरीत वाटते. अफगाणिस्तानातील बमियान येथे गौतम बुद्धाच्या अवाढव्य खडकात कोरलेल्या मूर्ती साध्या हत्यारांनी फुटत नाहीत हे लक्षात आल्यावर तालिबानी अतिरेक्यांनी तोफगोळे डागून या मूर्तींचा विध्वंस केला. अफगाणिस्तानात आज इस्लामी प्राबल्य दिसत असले तरी हजारो वर्षांपूर्वी बौद्ध धर्माचा प्रसार त्या प्रदेशात झालेला होता. हा इतिहास ज्यांना डाचत होता त्यांनी त्याचा सूड उगवण्यासाठी हे दुष्कृत्य अफगाणिस्तानमध्ये केले.

भारतामध्ये घातपाती कारवाया करणा-या मुजाहिदीन यांनी बुद्धगयेमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची मुळात शक्यता वाटत नाही तसेच असे होण्याला अफगाणिस्तानसारखे काहीही सबळ कारणही दिसत नाही. त्यामुळे हा तर्कच विसंगत वाटतो.
बुद्धगयेच्या बॉम्बस्फोटांमागे स्थानिक राजकारण कारणीभूत असले पाहिजे असेच वाटते. बिहारचे माजी राज्यपाल रा. सु. गवई यांचा सहजनसंपर्क अधिकारी म्हणून मी सुमारे दोन वर्षे त्या राज्यात कार्यरत होतो. त्या वेळी बिहारमधील परिस्थिती खूप जवळून पाहण्याचा योग आला. त्याच्या आधारे काही निरीक्षणे नोंदवता येतील. भाजप व या पक्षाची पितृसंस्था रा. स्व. संघाचे धोरण असे असते की, प्रथम स्थानिक पातळीवर एका पक्षाशी मैत्री करायची. त्यांच्या मदतीने सत्ता काबीज करायची आणि कालांतराने आपले स्थान बळकट करून सहकारी पक्षांना टांग मारून सगळी सत्ता स्वत:च्या ताब्यात घ्यायची. पण बिहारमध्ये याच्या उलट घडले.

नितीशकुमारांनी नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारप्रमुख ठरताच एनडीएला पंतप्रधानपदाच्या भावी उमेदवाराचे नाव घोषित करण्याची अट घातली. एनडीएने अर्थात ही अट पाळली नाही. त्यामुळे नितीशकुमारांचा जनता दल युनायटेड हा पक्ष एनडीएमधून बाहेर पडलाच. शिवाय बिहारमध्ये सरकारमधून भाजपला बाहेरचा रस्ता दाखवून नितीशकुमारांनी काँग्रेसच्या चार आमदारांच्या पाठबळावर आपल्या राज्य सरकारला पुन्हा बहुमतात आणले व राज्यकारभार सुरू ठेवला. नितीशकुमार यांनी जी पावले उचलली त्याचा राग येऊन देशातील एका राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री हे बिहारमधील भाजप कार्यकर्त्यांना उपदेश करताना म्हणाले, ‘आता नितीशकुमारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे...’ बिहारमध्ये राजकारणात हे घमासान सुरू असताना बुद्धगयेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. बुद्धगया हे जागतिक महत्त्वाचे व संवेदनशील धार्मिक ठिकाण आहे. तेथे घातपाती कृत्ये घडवण्यात आल्यास खूप गदारोळ माजेल, हे सदर कारस्थान रचणा-याला माहीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, ‘शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे.

सकारात्मक भूमिका घेणारे त्याच शस्त्राचा उपयोग हितकारक घटनेसाठी करतात. तर फिरलेल्या डोक्याचा सैतान त्याच शिक्षणाचा उपयोग विध्वंसासाठी करतो.’ त्याचप्रमाणे बुद्धगयेमध्ये बॉम्बस्फोट घडवणारी ‘फिरलेली डोकी’ कोणाकोणाची आहेत याचा बारकाईने तपास गुप्तचर यंत्रणांनी करायलाच हवा. या घटनेतील हल्लेखोर हे स्वदेशीच आहेत, असे गुप्तचर यंत्रणांना पुढेमागे आढळून आले तर अजिबात आश्चर्य वाटायचे कारण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत दुस-या महायुद्धामध्ये जपानवर अमेरिकेने दोन अणुबॉम्ब टाकून प्रचंड नरसंहार घडवला होता. परंतु प्रेमात व युद्धात सर्व क्षम्य असते, या भोंगळ वचनावर विश्वास न ठेवता डॉ. आंबडेकरांनी अमेरिकेचा कडक शब्दांत निषेध केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते तर त्यांनी जगातील बौद्धांना सर्वोच्च शांतीचा संदेश देणा-या स्थळावर झालेल्या बॉम्बस्फोटांचा तीव्र शब्दांत निषेध केला असता.


बुद्धगयेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात आजची तरुण पिढी वेगळ्या अंगाने विचार करते आहे. युवा पिढीतील एकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया मला बोलकी वाटली. ती व्यक्ती म्हणाली, ‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी गौतम बुद्धांच्या मूर्ती फोडल्या, आता बुद्धगयेवर काही कुप्रवृत्तींनी हल्ला करून नऊ बॉम्बस्फोट घडवले. पण त्यांना हे कळत नाही की, गौतम बुद्धाने जे तत्त्वज्ञान शिकवले, शांतीचे जे विचार शिकवले त्यांचा अशा हल्ल्यांमुळे काही पराभव होणार नाही. पवित्र स्थळांची त्यांनी भलेही नासधूस केली असेल, पण ते अमूल्य विचार नष्ट करू शकणार नाहीत. बुद्धगयेमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांमुळे त्या ऐतिहासिक वास्तूचे काही नुकसान हे झालेच. कलाप्रेमींना या घटनेचेही नक्कीच दु:ख झाले आहे. मात्र, असे बॉम्बस्फोट किंवा हल्ले चढवून हिंसक विचारांचे स्थान अधिक बळकट होईल, असे समजणे हे चुकीचे आहे.’ बुद्धगया येथे घडवण्यात आलेले साखळी बॉम्बस्फोट केवळ दहशत पसरवण्यासाठी घडवण्यात आले होते, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. पण ही दहशत ‘कोण’ ‘कोणाला’ बसवू पाहत होते हे तपास यंत्रणांनी लवकरात लवकर शोधून काढले पाहिजे. त्यातूनच हिंसक शक्तींनी घातलेला साधनशुचितेचा बुरखा टराटरा फाटू शकेल.