आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश की यशस्वी माघार (BLOG)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'ऐ दिल है मुश्किल\' चित्रपटाच्या कमाईतील 5 कोटी रुपये आर्मी रिलिफ फंडमध्ये दिले जाणार आहे, हे मनसेच्या आंंदोलनाचे यश असल्याचे राज ठाकरे म्हणाले. - Divya Marathi
\'ऐ दिल है मुश्किल\' चित्रपटाच्या कमाईतील 5 कोटी रुपये आर्मी रिलिफ फंडमध्ये दिले जाणार आहे, हे मनसेच्या आंंदोलनाचे यश असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद अखेर मिटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध मागे घेतला आहे. मात्र यामुळे मनसे या खळ्ळखट्याकची भाषा करणाऱ्या पक्षाने माघार घेतली की खरोखर हे त्यांच्या आंदोलनाचे यश आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनसे 'खळ्ळखट्याक' करणार म्हटल्यावर चांगल्या-चांगल्यांचे धाबे दणाणत होते. राज्य सरकारसह मुंबईतील मोठमोठ्ठे मॉल, चित्रपट निर्माते, कलाकार यांनाही अनेकदा मनसेपुढे झुकावे लागले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग मराठी पाट्या असो किंवा मराठी मुलांना रेल्वेतील नोकरीचा मुद्द्दा किंवा नुकताच प्रदर्शित झालेला 'एम.एस धोनी' हा हिंदी चित्रपट मराठीत प्रदर्शित करण्याचा वाद असेल. मनसेचे आंदोलन बहुतेकवेळा त्यांच्या 'खळ्ळखट्याक'च्या भीतीने यशस्वी झालेले आहे. मात्र ज्या चित्रपटाच्या नावातच 'मुश्किल' आहे त्यांनी सर्व 'मुश्किली' दूर करत ऐन दिवाळीच्या तोंडावर मनसेचा फटाका 'फूस' करुन टाकला आहे.

पाकिस्तानी कलाकारांना विरोध करीत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला होता. या चित्रपटात फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराची भूमिका आहे. त्यासाठी आंदोलनाचीही जय्यत तयारी केली होती. मल्टीप्लेक्समधील कामगारांना हाताशी धरुन चित्रपट प्रदर्शित झाला तर संपाचे हत्यार उपसण्याचाही चंग खोपकरांनी बांधला होता. 28 ऑक्टोबरला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे, त्याआधी एक पडदा चित्रपटगृह मालकांचेही देशप्रेम उफाळून आले होते. मनसेच्या विरोधात सहभागी होत त्यांनी चार राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची घोषणा केली होती.

चित्रपटगृह मालक, मल्टिप्लेक्स कर्मचारी आणि मनसेच्या खळ्ळखट्याकची भीती काचेचे इमले बांधलेल्या मल्टिप्लेक्स चालकांच्याही मनात घर करुन बसली होती. चित्रपट आणि कलाकार हे आपल्या देशात नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिलेले आहेत. त्यांच्याविरोधात काहीही बोलता येते आणि बोललेल्या प्रत्येक बऱ्या-वाईटाला प्रसिद्धीही मिळते. मात्र यावेळी दिग्दर्शक करण जोहर आणि प्रोड्यूसर्स गिल्डने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज'वर जाऊन वाद मिटविला नाही तर त्यांनी सुरुवातीला मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने एक व्हिडिओ पब्लिश करुन पाकिस्तानी कलाकारांना संधी दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढे कोणत्याच पाकड्यांना संधी देणार नाही, असेही अभिवचन दिले. मात्र तरीही मनसेच्या खोपकरांनी वर मान करुन आणि डोळ्याला डोळा भिडवून मोठ्या मनाने विरोध मागे घेतला नाही, उलट बुधवारी एका मल्टिप्लेक्सबाहेर आंदोलन करुन विरोध कसा राहील याचे ट्रेलर दाखवले.

देशवासियांची माफी मागताना करण जोहरने सांगितले होते, की हा चित्रपट फ्लोअरवर गेला तेव्हा भारत-पाकिस्तान संबंधामध्ये सुधारणेचे वारा वाहात होते. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना संधी दिली गेली होती. दुसरे असे की जेव्हा आपले पंतप्रधान चहा घेण्यासाठी कराचीत उतरले आणि पाकिस्तानचे शरीफ पंतप्रधान नवाज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आले, तेव्हाच या चित्रपटाचा मुहूर्त झाला होता. भारताच्या 'उरी' हल्ला झाला तेव्हा चित्रपट पूर्ण झालेला होता. त्यासाठी तीनशे कलाकार आणि तंत्रज्ञांची मेहनत लागलेली होती. कोट्यवधी रुपये त्यासाठी ओतण्यात आले होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ही सर्व मेहनत वाया जाऊ नये, यासाठी करण जोहरचे हात जोडून झाले, पोलिसांच्या पाया पडून झाले मात्र मार्ग सापडत नव्हता.
'ना खाऊंगा ना खाने दूंगा'
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दारात जाऊन करण जोहर माफी मागणार, अशी शक्यता सर्वांनाच वाटत होती, मात्र त्याने तसे केले नाही. तो थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहाकडे गेला. सोबत प्रोड्यूसर मुकेश भट, केंद्रीय मंत्री आणि बॉलिवूड गायक बाबुल सुप्रियो देखील होते. सुप्रियो यांनी त्याच दिवशी स्पष्ट संकेत दिले की मनसेचा विरोध सरकार मोडीत काढणार. त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशी झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खुद्द खोपकरांनीच दिली, आमचा विरोध कायम आहे, आंदोलन लोकशाही मार्गाने केले जाईल, अशी मवाळ भाषा झाली होती. कारण, केंद्रीय मंत्री सुप्रियो यांनी, मनसे गुंडांचा पक्ष असल्याचे म्हटले होते. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर ज्याप्रमाणे आज मुकेश भट मीडियाच्या समोर आले, गुरुवारीही तेच दिल्लीत माध्यमांना सामोरे आले आणि गृहमंत्री चित्रपट प्रदर्शनाला अनुकुल असल्याचे सांगत, संरक्षण देण्याचे मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
तेव्हाच स्पष्ट झाले होते की मनसेचा विरोध चिरडून टाण्याची तयारी सरकारने केली आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत हे स्पष्ट झाले नाही, की करण जोहर या साळसूद चेहऱ्याला गृहमंत्र्यांना भेटण्याची भन्नाट कल्पना कुठून सुचली, की राज्यातूनच कोणी सुचविली ?
असो, आता मनसेचा विरोध मावळल्यानंतर काँग्रेसने याला भाजप - मनसेमधील तोडपाणी म्हटले आहे. खरच मनसे तोडपाण्यासाठी असा विरोध करीत असेल का? तसे असेल तर मग ही नेहमीची तोडपाणी बंद करण्यासाठीच करण जोहर आणि प्रोड्यूसर्स गृहमंत्र्यांच्या भेटीला गेले नसतील कशावरुन. कारण पंतप्रधानांनी म्हटलेलेच आहे 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा..' याची आठवण कदाचित करण जोहरला झाली असावी.
मनसेचे अस्तित्व लयाला चालले आहे का ?
आता सर्व राजकीय पक्ष नगरपालिकांची तयारी करीत असताना बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतून तयार झालेल्या राज ठाकरेंच्या मनसेची कुठेही चर्चा नाही. शिवसेनेने स्वबळाचा शंख फुंकला आहे तर, काँग्रेस राष्ट्रवादीही जिल्ह्या-जिल्ह्यातील नेतृत्वावर निर्णय सोपवून लढण्याची तयारी करीत आहे. भाजपने तर आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ असे जाहीरच करुन टाकले आहे. या सर्व चर्चेत मनसे नेहमीच मागे पडत चालली आहे. त्यांची चर्चा फक्त मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळाला पाहिजे. मुंबई आणि आसपासच्या निवडणुका लागल्या की मराठी पाट्या लागल्या पाहिजे. टोलचा प्रश्न भाजप सरकार आल्यापासून जणू निकाली निघाला आहे. त्यामुळे तात्कालिक प्रश्नांवर राण उठवणे एवढेच काय मनसेचा सध्याचा मुद्दा दिसत आहे. त्यातही पब्लिसिटी कशात आहे, तेच प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटताना दिसतात.

आता राहिला मुद्दा, 'ऐ दिल'च्या प्रदर्शनाचा, तर 28 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी उरी या लष्करी तळावर शहीद झालेल्या 18 जवानांना चित्रपट श्रद्धांजली वाहणार आणि नफा हो किंवा तोटा आर्मी रिलिफ फंडामध्ये 5 कोटी रुपये जमा करणार आहे, हे मनसेच्या आंदोलनाचे यश असल्याचे राज ठाकरेंनी शेवटी स्वतःच्या घरात येऊन सांगितले. आत हे यश आहे की यशस्वी माघार हे तमाम जनतेला चांगले कळते.
बातम्या आणखी आहेत...