आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या पाऊली लक्ष्मी ये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरे जवाहिरापेक्षादेखील सगळ्या जगात गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून सोने हे सर्वश्रेष्ठ ठरले. नंतर जेव्हा निरनिराळ्या देशांतील सरकारांनी सोने आणि चांदी यांचा वापर नाणी पाडण्यासाठी सुरू केला, तेव्हा सोने हे आंतरराष्‍ट्रीय विनिमयाचे साधन म्हणून मान्यता पावले. शेरशहा सुरी याने जेव्हा पहिले नाणे भारतात पाडले, तेव्हा संस्कृत ‘रौप्य’ म्हणजे, चांदी या नावावरूनच त्या नाण्याचे नाव ‘रुपिया’ हे पडले. अनेक वैदिक सूक्तात देवाजवळ ‘आम्हाला सोने, चांदी भरपूर मिळू दे’ अशी आराधना केलेली आहे. त्या काळी सर्वसाधारण माणसालाच नव्हे, तर राजा-महाराजांनासुद्धा सोने जमा करण्याची उत्कट इच्छा असे. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने आपल्या खजिन्यात सोन्याची भर घालणे, हा राज्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम असे. असा सोन्याचा प्रचंड साठा या भरतखंडात वर्षानुवर्षे जमा होत होता. त्यामुळे सतत आक्रमणे होत गेली. पण असे जरी सर्व असले तरी एक गमतीची गोष्ट म्हणजे, भारतात कुठेही मोठ्या प्रमाणात सोन्याच्या खाणी कधीच सापडलेल्या नाहीत! आपला सोन्याचा नैसर्गिक साठा म्हणजे, कर्नाटकातील म्हैसूरजवळ असलेली ‘कोलार’ येथील एकमेव सोन्याची खाण; पण या खाणीतून फारच थोडे सोन्याचे उत्पादन होत होते. आता जवळजवळ काहीच उत्पादन होत नाही, असे म्हटले तरी चालेल.


खूपच मोठा व्यापार सातवाहनकाली चालत असे. हा सगळा व्यापार सोपारा, (म्हणजे मुंबईजवळच्या नालासोपा-याजवळ), बारीगाझा- म्हणजे भडोच, चौल आणि कोचीन, कालिकत आदी बंदरांतून होत असे. या व्यापारात भारतातून रेशीम आणि इतर उत्तम प्रकारचे कापड, मसाल्याचे पदार्थ आदी रोमला निर्यात होत असे. त्याच्या बदल्यात रोमहून भारतातल्या व्यापारांना सोने मिळत असे. त्यांच्या रेशमी वस्त्रांच्या आणि मसाल्याच्या पदार्थांच्या हव्यासामुळे रोमचे प्रचंड सोने भारताच्या खजिन्यात आले! त्या काळात रोमचा व्यापार दहा कोटी सेस्त्रेती (रोमन नाणे) वार्षिक, असा भारताशी चालत असे. याची आजच्या काळातल्या किमतीत जवळजवळ शंभर कोटी डॉलर्स प्रतिवर्षी एवढी प्रचंड होईल. जकातीच्या उत्पन्नामुळे नाणेघाटात असलेला रांजण नाण्यांनी भरून वाहत असल्याचे उल्लेख तत्कालीन इजिप्तचा राजा टॉलेमीच्या पुस्तकात आहेत. एका अंदाजाप्रमाणे, त्या काळातल्या ज्ञात जगातल्या एकूण व्यापारापैकी 32% व्यापार हा भारताचा होता. 75% उत्पन्नामुळे भारत हा सुवर्णभूमी म्हणून ओळ्खला जायचा. जागतिकीकरणाविरुद्ध ओरडणारे याकडे लक्ष देतील तर फार बरे होईल!


या व्यापार मार्गावरच्या अनेक गावांमध्ये म्हणजे जुन्नर, पैठण आणि चौल, कोचीन येथे रोमची सुवर्ण आणि रजत नाणी मिळालेली आहेत. शिवाय रोमन मदिरेचे कुंभ- ज्यांना ‘अ‍ॅम्फोरा’ म्हणतात, तसे कुंभही उत्खननात सापडले आहेत. त्यावरूनच रोमन साम्राज्य आणि सातवाहनांचा संबंध सिद्ध व्हायला मदत झाली. लातूरपासून 50 कि.मी.वर ‘तेर’ नावाचे एक गाव आहे. ही पूर्वीच्या ‘तगर’ साम्राज्याची राजधानी. इसवी सनाच्या दोनशे वर्षे पूर्वीपासून इथे रोम आणि ग्रीसबरोबरच्या व्यापाराचे पुरावे वस्तूरूपात उत्खनन करून शोधण्यात आले आहेत. इथून निर्यातीचा माल भडोच बंदरात नेला जाई आणि तिथे तो पुढे जहाजांवर लादून आफ्रिकेच्या लाल समुद्रातून पुढे भूमध्य समुद्रमार्गे रोमपर्यंत पोहोचे. तेरला उत्खनन करताना एक छोटी रोमन कट्यारीची मूठ सापडली आणि तिची प्रतिकृती शोभेल अशी दुसरी मूठ इटलीच्या दक्षिणेला पॉम्पेयी येथे उत्खनन केले असता सापडली आहे! तेर येथे ग्रीक आणि रोमन व्यापा-यांची वखार होती. या व्यापाराच्या उत्पन्नामुळे सातवाहन साम्राज्य जवळपास पाच-सहाशे वर्षे मोठे आणि समृद्ध झालेले होते. पुढे रोमन साम्राज्याचे पतन झाल्यानंतर थोड्याच काळात सातवाहनांचे साम्राज्यदेखील नष्ट झाले!


भारत हा पूर्वीपासून उत्कृष्ट मालाची निर्यात करून श्रीमंत झालेला देश आहे. भारतीय सम्राटांनी कधीही बाहेरच्या देशांवर आक्रमण करून लूट मिळवून आपले खजिने भरलेले नाहीत. उत्पादन कौशल्यांचा विकास करून भारताची समृद्धी वाढवण्याचा उपक्रम जोरात सुरू केला पाहिजे, म्हणजे आपण इतिहासातून एक चांगला धडा घेतला, असे होईल! आपली निर्यात जर आयातीच्या गरजेपेक्षा जास्त झाली तरच आपण आपल्या देशाला पुन्हा जागतिक व्यापाराच्या शिखराकडे नेऊ शकू.