आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
अलीकडेच राष्ट्रपती आणि माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी भारतामध्ये पेटंट संस्कृती अजिबात न रुजल्याबद्दल खंत व्यक्त केली. यासंदर्भात वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आकडेवारीनुसार 2010 मध्ये भारतामध्ये फक्त 6,000 पेटंट्ससाठीच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली होती. या तुलनेत इतर काही देशांमधली आकडेवारी थक्क करून सोडणारी आहे. 2012 च्या फक्त डिसेंबर महिन्यात चीनमध्ये 3,00,000; जर्मनीमध्ये 1,70,000; जपानमध्ये 4,64,000 तर अमेरिकेमध्ये 4,20,000 पेटंट्सची नोंद झाली. अनेक वेळा आपण या पेटंटच्या संकल्पनेविषयी तसेच त्याच्या महत्त्वाविषयी वाचतो, पण तरीही आपल्याला त्यामधले बारकावे समजत नाहीत. म्हणूनच आपले याकडे म्हणावेसे लक्ष जात नाही आणि पेटंट्सचा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारला जातो. म्हणूनच त्यासंबंधी आणखी खोलात जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
‘पेटंट’ या शब्दाचा जन्म ‘पॅटंटे’ या मूळ फ्रेंच शब्दापासून झाला. फ्रेंच भाषेत या शब्दाचा अर्थ ‘खुले पत्र’ असा होतो. याचे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी काही पत्रे अगदी खुलेपणाने लिहिली जात, तर काही पत्रे खासगी स्वरूपाची असत. खुल्या पत्रांच्या खालच्या बाजूला कागदावर राजाचे अधिकृत सील असे आणि म्हणून त्याला अधिकृत दर्जा असे. याचबरोबर 1580 च्या दशकापासून एखाद्या शोधाच्या संदर्भातले हक्क म्हणूनसुद्धा ‘पेटंट’ हा शब्द वापरला जात असे. आता अर्थातच पेटंट या शब्दाचा अर्थ अगदी कायदेशीर नजरेतूनसुद्धा स्पष्ट आहे. एखाद्या गोष्टीचा शोध लावलेल्या संशोधकाचा त्या गोष्टीवर ठरावीक मुदतीसाठी बौद्धिक हक्क निर्माण होतो आणि या हक्कावर इतर कुणालाही गदा आणता येत नाही. म्हणजेच या शोधाचा गैरवापर करता येत नाही. एखाद्या माणसाच्या शोधाचा इतरांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी ही तरतूद असते. याशिवाय सर्वसामान्य लोकांपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांना नवनव्या संकल्पनांना जन्म देऊन त्यातून स्वत:चा आर्थिक विकास घडवण्याची प्रेरणाही मिळत असते. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा पेटंट्सना खूप महत्त्व आहे.
याची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडच्या राजदरबारामध्ये वेगवेगळ्या संशोधनासाठी पेटंट्सचे अर्ज दाखल केले जाण्याची पद्धत सोळाव्या शतकात रुजली. 1561 ते 1590 या काळात पहिल्या एलिझाबेथ राणीने साबण, तुरटी, काच, चामडी, मीठ, चाकू, लोखंड, कागद अशा एकंदर 50 वेगवेगळ्या वस्तूंसंबंधीचे हक्क अर्जदारांना बहाल करून टाकले. त्यामुळे संशोधन आणि व्यापार यांच्यासंदर्भातली व्यावसायिक वृत्ती इंग्रजांमध्ये फार पूर्वीपासूनच रुजली. औद्योगिक क्रांतीमुळे पेटंट्सच्या संकल्पनेला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले. अमेरिकेमध्ये पूर्वीपासूनच ठिकठिकाणचे लोक स्थायिक झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चढाओढीचे वातावरण असे. आपले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठीची स्पर्धात्मक वृत्ती अमेरिकन लोकांमध्ये मुळापासूनच रुजली. त्यातच पेटंटची संकल्पना वापरली जात असल्यामुळे अमेरिकन लोकांना नुसतेच संशोधन न करता त्याचे व्यावसायिकीकरण करण्याची हातोटी साधली. त्यानंतर विसाव्या शतकामध्ये दुस-या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान यांच्या नवनिर्माणाच्या काळात लोकांनी इरेला पेटून नवे संशोधन करणे आणि त्याचे पेटंट घेणे याचा सपाटा सुरू केला. चीनमधल्या गेल्या काही दशकांमधल्या सरकारी धोरणांमुळे पेटंट संस्कृती जोरात वाढली. आपल्या देशामध्ये मात्र मूळ संशोधन करणे तसेच ते केले तर त्यानंतर त्याचे पेटंट घेणे यासंदर्भात पुरेशी जागृती नसल्यामुळे तसेच याचे दीर्घकालीन फायदे लक्षात घेऊन त्यासंबंधीची धोरणे न आखल्यामुळे पेटंट्सविषयी फारशी कुणाला फिकीर नसल्याचे जाणवते.
विसाव्या शतकामध्ये अमेरिकेची इतकी प्रचंड भरभराट होण्यामागच्या अनेक कारणांमध्ये पेटंट संस्कृती हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. 1920 च्या दशकामध्ये वाल्डो सीमॉन याने ‘प्लास्टिसाइझ्ड पॉलिव्हिनाईल क्लोराईड (पीव्हीसी)’ या संकल्पनेचे पेटंट घेतले आणि त्यातून अब्जावधी डॉलर्सचा प्लास्टिक उद्योग जन्मला. थॉमस अल्वा एडिसन तर आयुष्यभर संशोधन करणे आणि त्याचे पेटंट घेणे या जिद्दीने भारावून गेला होता. त्यामुळे एडिसनने अनेक वेगवेगळ्या उद्योगांना थेट किंवा अप्रत्यक्षपणे जन्म दिला. अशा प्रकारे इतर अनेक उद्योगांशी संबंधित असलेली लाखो पेटंट्स अमेरिकन संशोधकांनी मिळवली.
पेटंट्सच्या संदर्भातला एक मोठा गैरसमज म्हणजे, जो माणूस किंवा जी संस्था यांना पेटंट मिळते त्यांनीच या संशोधनाचा आर्थिक लाभ थेट उत्पादने बनवून घेतला पाहिजे. यात अजिबात तथ्य नाही. अनेकदा काही संशोधक फक्त संशोधनामध्येच रमणे पसंत करतात. याचा अर्थ, या संशोधनाचा आर्थिक लाभ त्यांना घेणे शक्य होत नाही, असा अजिबातच नसतो. या लोकांनी स्वत: व्यवसायामध्ये पडायचे नाही असे ठरवले म्हणजे त्यांच्या पेटंटवर इतर कुणीतरी आपला फायदा करून घेणार, असे मुळीच होत नाही.
उलट हे संशोधक आपल्या पेटंटचे हक्क स्वत:कडे ठेवतात आणि या पेटंटद्वारे लावलेल्या शोधाचा वापर व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर करू देतात. यामुळे संशोधक तसेच व्यावसायिक या दोघांनाही आपापल्या आवडीच्या तसेच झेपणा-या क्षेत्रात काम करत राहणे शक्य होते. याचे अलीकडचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे क्वालकॉम नावाच्या कंपनीने मोबाइलचे ‘सीडीएमए’ हे तंत्रज्ञान जन्माला घातले; पण त्याचा व्यावसायिक फायदा स्वत: थेट उत्पादने बाजारात न आणता इतर कंपन्यांना हे तंत्रज्ञान भाडेतत्त्वावर करून दिला. अर्थातच क्वालकॉम कंपनीलाही यातून भरपूर आर्थिक लाभ झाला. तसेच ‘जीएसएम’ या तंत्रज्ञानाला एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
अर्थात पेटंट्सविषयी काही वादविवादही आहेत. मायकेल फॅरेडे, मेरी क्युरी यांच्यासह काही अत्यंत महान शास्त्रज्ञांनी आपल्या अभूतपूर्व संशोधनावर पेटंट्स घ्यायला नकार तरी दिला किंवा त्यासंदर्भात फारशी उत्सुकता दाखवली नाही. उलट आपल्या संशोधनाचा खुलेपणाने सगळ्या जगाला विनामोबदला फायदाच झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका कायम राहिली. असे काही मोजके अपवाद वगळता बहुतेक सगळ्या संशोधकांनी मात्र पेटंट्सचा फायदा स्वत:ला मिळालाच पाहिजे यासाठी खूप धडपड केल्याची आणि त्यामुळे अनेक दुर्दैवी खटले वर्षानुवर्षे चालल्याची उदाहरणेही कमी नाहीत. सगळ्या बाजूंनी विचार केल्यावर आजच्या जगामध्ये दीर्घकालीन आर्थिक लाभ करून घ्यायचा असेल तर पेटंट्सना पर्याय नाही, असे म्हणावेसे वाटते!
akahate@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.