आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: मातृदिन विशेष: मनापासून मनापर्यंत पोहोचणारे प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल मला एक मेसेज आला. तुझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता असा प्रश्न त्या मेसेज मधून करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर काय द्यावे हेच कळत नव्हते. कारण माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय व्हावा अशाच पध्दतीने मी प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करतो आणि हेच उत्तर मी त्या मेसेजला रिप्लाय म्हणून पाठवले.
काही क्षणातच मला एक क्षण आठवला जो की मी कधीच विसरु शकणार नाही आणि त्या क्षणामुळे मला जीवनातील एक मोठे सत्य अनुभवायला मिळाले होते.
मी बेंगळूरला नोकरीसाठी होतो. नोकरी लागून नुकतेच १५ दिवस झाले असावे. जन्मल्यापासून मी घरच्यांपासून पहिल्यांदाच इतक्या लांब आलो होतो आणि नोकरी म्हणजे मी आता कायमचाच लांब होणार. त्यामुळे त्या गोष्टीची सल मनात कुठे तरी होती. १५ डिसेंबरला नोकरी लागली होती आणि ३० डिसेंबरला माझ्या घरील सर्वजण तिरुपतीला जाणार होते. त्यामुळे त्यांनी मला फोन करुन सांगितले की, तु ३० तारखेला तिरुपतीला भेट. बंगळूरवरून तिरुपती जवळपास ८ तासाचे अंतर. मी २९ ला रात्री तिरुपतीसाठी निघालो. आई-वडील भाऊ हे सर्वजण मला तिरुपतीच्या बसस्टॅंडवरच भेटणार होते. मी त्यांना भेटणार असल्यामुळे मनात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. पहाटे ४ च्या सुमारास मी तिरुपतीला पोहचलो. आई-वडीलांना येण्यास थोडा उशीर होणार होता. मी तिथेच बसस्थानकावर वाट पहायचे ठरवले. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे थंडी कडाडून होती. मी तसाच स्वेटर अंगाला लपटून एका खुर्चीवर बसलो होतो. डोळे लागत होते. परंतु सामान कोणी घेऊन जाईल म्हणुन मी हडबडून जागा व्हायचो. वाट बघत, डूळक्या लागत दीड तास गेला. मी त्यांची वाट पाहून थकलो होतो. मी त्या स्थानकातून बाहेर पडण्याचे ठरवले आणि समोर असलेल्या मुख्य रस्त्यावर आलो आणि तेथे उभारुन त्यांची वाट पहायला लागलो. ते सर्व टाटा सुमो मध्ये येणार होते. सुमो आमचीच असल्यामुळे मला सर्व माहित होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीकडे मी निरखून पाहत होतो. अंधार असल्यामुळे गाड्यांचे फक्त लाईटच दिसत होते त्यामुळे जो पर्यंत गाडी जवळ येत नाही तो पर्यंत काही कळत नव्हते. जवळपास अर्धा तास झाला असावा. मला मागून कोणी तरी आवाज दिला. मी मागे वळून पाहतो तर एक सुमो येऊन थांबली होती. मी निरखून पाहत होतो कोणाची आहे ती सुमो याकडे. तितक्यात गाडीतून कोणीतरी उतरले. ती माझी आईच होती. तिला पाहिल्यावर काहीच न कळता डोळ्यातून पाणी यायला सुरु झाले. ती सुध्दा रडतच माझ्याजवळ येत होती आणि मी सुध्दा रडतच तिच्याजवळ गेलो. नंतर जवळपास अर्धातास हे रडण काही थांबलं नाही. एक शब्द सुध्दा बोलता येत नव्हते. मी गाडीत बसलो आणि पुढे तिरुमलासाठी निघालो. तिरुमलासाठी जात असताना एक लहानपणीची गोष्ट आठवली....
मी लहान असताना आम्ही मामाच्या गावाला जायचो. आम्हाला परत येताना मामा, मावशी, आजी सर्वच जण सोडायला यायचे. आमची गाडी सुरु होताच आजी, मावशी आणि माझी आई एकसारखं रडायचे.. हे रडण चालूच असायच आणि मी नुसतं मुर्खासारखं त्यांना पहात असायचो. मला तेव्हा एक प्रश्न नेहमी पडायचा की हे लोक का रडतात. यांना कोणी मारलं नाही, की कोणी यांच्याशी भांडल नाही. तर यांना काहीच दुखण नाही तर हे लोक का रडतात मुर्खासारखे... यांना काही कळत नाही का..
रडाण्यासारखे काहीच घडले नसताना सुध्दा हे का रडतात... असे अनेक प्रश्न डोक्यात घर करुन असायचे... आणि त्या प्रश्नांचे उत्तर मला त्या दिवशी जवळपास २० वर्षानंतर मिळाले होते.

या प्रत्येक अश्रुमध्ये सामावलय प्रेम फक्त प्रेम. एक असं प्रेम जे व्यक्त करता येत नाही, कोणाला दाखवता येत नाही, कोणाला सांगता येत नाही की लिहून दाखवता येत नाही..
हे प्रेम फक्त अनुभवायचं असतं. हे प्रेम जे फक्त मनातून मनापर्यंत पोहचत...
असं प्रेम....
email - rahulakransubhe@gmail.com
whatsapp - 9762771320