आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्नांतूनच पदरी पडेल यश; घडतील बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळे मिटून स्वयंपाक केला, तर पदार्थांची चव बिघडण्याचा धोका असतो; पण क्रिस्टीन हे (32) यांनी हा समज चुकीचा ठरवला. 2007 मध्ये एका आजारात क्रिस्टीनने दृष्टी गमावली. काही दिवसांपूर्वी अमेरिकन मास्टर शेफ 2012 या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्टार वर्ल्ड वाहिनीवर दाखवण्यात आले होते. संपूर्ण चाहत्यांच्या साक्षीने क्रिस्टीन या कार्यक्रमाच्या विजेत्या ठरल्या. जिद्दीमुळेच हे शक्य झाले, अन्यथा असे होणे सर्वथा अशक्य. स्पर्धेत सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मते त्यांची ही गुणवत्ता अत्युच्च आहे. शरीराचा एखादा अवयव निकामी झाला तरीही तुमचा निर्धार ढळू शकत नाही, हेच यातून सिद्ध झाले. स्वप्न पूर्ण करण्याचे मी चालते-बोलते उदाहरण आहे, असे त्या जिंकल्यावर म्हणाल्या.

डोळस स्पर्धकांसोबत मास्टर शेफ स्पर्धेत का सहभागी झालात, असे एका पत्रकाराने विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, आव्हान किती ही मोठे असले तरी काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाचे यशापयश तो आव्हानाचा सामना कसा करतो, यावर अवलंबून आहे. एक शेफ म्हणून क्रिस्टीनला काम करताना पाहणे प्रेरणादायकच होते. आपल्या आनंदी प्रवृत्तीने डोळस लोकांनाआव्हान देण्याचे तिचे धाडस, प्रत्येक गोष्ट सकारात्मक पद्धतीने स्वीकारणे हे प्रेरणादायकच होते.

ज्यांच्याकडे दृष्टी आहे, ते आपल्या आयुष्यात रंग भरू शकतात, पण क्रिस्टीनचे आयुष्य विविध रसांनी भरून गेले आहे. नेत्रहीन असल्याबद्दल कुणाचीही सहानुभूती त्यांना नको आहे. क्रिस्टीनला अंधत्वाचे कारण पुढे करत कोणतीही सवलत नको होती. तिचे हे यश म्हणजे तिच्या गुणकौशल्याचा विजय असल्याचाच पुरावा आहे. क्रिस्टीनचा आदर्श घेऊन आपण आपले आयुष्य घडवू शकतो. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर क्रिस्टीनने फक्त लाखो रुपयेच जिंकले नाहीत, तर पुस्तक लिहिण्याचा एक प्रस्तावही तिला मिळाला आहे.

नेत्रहीन असलेली क्रिस्टीन लहान असतानाच तिची आई वारली. क्रिस्टीन अपवाद असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे, पण एखादी अंध व्यक्ती जर अशक्य बाब सहज शक्य करून दाखवत असेल, तर तुम्ही व मी नक्कीच करू शकतो, असे माझे मत आहे. आपण आजपासून दररोज काही ना काही आव्हानात्मक काम केले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.

विजय बत्रा
अमेरिका आणि जपानमध्ये प्रेरक वक्ते