आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनमधील ‘डोकचुल्या’ विष्णू मनोहर..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विष्णू मनोहर हे नाव माहीत नसलेला मराठी माणूस नसेल. विशेषकरून ज्याला खाण्यापिण्याची वा खिलवण्याची आवड आहे असा. गेली आठ-नऊ वर्षं मेजवानीमध्ये आपण त्यांना पाहत आलोय. त्यांनी मराठी माणसाच्या खाण्यापिण्याची नस कशी पकडली आहे, ते पाहू..

1999 नागपूरला भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. त्या वेळी प्रमोद महाजनांनी प्रस्ताव मांडला, की जेवण फक्त महाराष्ट्रीय पद्धतीचं न ठेवता त्यात वैविध्य असावं. विष्णूजी व इतर काही जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपच्या इतिहासात प्रथमच अधिवेशनात मराठी, दक्षिण व उत्तर भारतीय जेवण ठेवण्यात आले.

स्वयंपाकाचं वा पाकशास्त्राचं व्यावसायिक प्रशिक्षण विष्णूजींनी घेतलेलं नाही. वडिलांकडून चित्रकलेचा वा कलेचा वारसा त्यांना मिळालेला आहे. आर्थिक परिस्थितीशी झुंजता झुंजता वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते काम करू लागले. लग्नात मंचावर नवरानवरीचे नाव थर्माकोलमध्ये लिहिण्याची पूर्वी फॅशन होती. तसे काम त्यांनी सुरू केले. त्यातूनच लग्नाच्या जेवणाचे कंत्राट घेणार्‍याशी त्यांची ओळख झाली व ते त्याला मदत करू लागले, मात्र ही नोकरी नव्हती. काही काळाने त्याने विष्णूजींचा काही कारणाने अपमान केला व त्यांनी निश्चय केला, की मीसुद्धा या कामात यश मिळवून दाखवेन. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी नागपुरात एका लग्नाचे जेवणाचे कंत्राट घेतले, 250 माणसांचा स्वयंपाक केला. काही महिन्यांतच त्यांच्या लक्षात आले, की हे काम व्यावसायिक पद्धतीने करणे आवश्यक आहे. मग त्यांनी काही माणसे कामावर ठेवली. त्यांचे एक वैशिष्ट्य लोकांच्या लवकरच लक्षात आले, ते म्हणजे विष्णूजी पदार्थ अतिशय वेधक पद्धतीने सादर करत. त्यामुळे त्यांना 10 ते 20 टक्के जास्त दर देण्याचीही लोकांची तयारी असे.

लहानपणापासून त्यांनी खाण्याची आवड होती. मग स्वयंपाकघरात आईला मदत करायच्या नावाखाली लुडबुड व्हायचीच. आई त्यांना डोकचुल्या म्हणायची. डोकचुल्या म्हणजे चुलीत लाकडं ढोसणारा. गेल्या बारा-तेरा वर्षांत मराठी माणसाचा जेवणाचा, लग्नातल्या पंगतींचा ट्रेंड बदलला आहे. आता टीव्हीवरील कुकरी शो आणि इंटरनेट यांमुळे खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी सतत बदलत असतात, असं त्यांना वाटतं. आता विष्णूजींची चार रेस्तराँ आहेत. नागपूर, औरंगाबाद, पुणे व ठाणे येथे विष्णूजी की रसोई ही थीमबेस्ड रेस्तराँ असून आणखी दोन ठिकाणचे काम सुरू आहेत. शिवाय ईटीव्हीवरील मेजवानी सुरू आहेच. ते अनेक लाइव्ह शो करतात. त्यांची आतापर्यंत 25 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. अभ्यासाचा कंटाळा असणार्‍या विष्णूजींना हे सांगताना हसू येतं, की आता पुस्तकं लिहायसाठी किती वाचावं लागतं.
स्वयंपाकघरात लुडबुड व्हायचीच. आई त्यांना डोकचुल्या म्हणायची. डोकचुल्या म्हणजे चुलीत लाकडं ढोसणारा.