आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे यांचे अष्टकोटी उड्डाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये माझा वैयक्तिक संघर्ष सुरू होता...मन:स्थिती ढळली होती. काय करावे हे सुचत नव्हते. याचवेळी मी मातोश्रीवर गेलो. बाळासाहेबांशी माझी भेट झाली. ते मला त्यांच्या वैयक्तिक रूममध्ये घेऊन गेले. प्रथम त्यांनी मला तेथील गणपतीला नमस्कार करायला लावला. यानंतर भगवा टिळा माझ डोक्यावर लावल्यानंतर ते म्हणाले, भगवा आयुष्यभर सोडू नकोस. माझा गणपती आणि माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. या त्यांच्या बोलण्याने माझे सैरभैर झालेले मन पूर्णपणे शांत झाले.


भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी एकदा ही आठवण सांगितली होती. शिवसेनाप्रमुख या जगात नसले, तरी गणपती व बाळासाहेबांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे मुंडेंनी भगवा सोडलेला नाही आणि नि:स्पृहपणादेखील. काँग्रेसच्या वाटेवर असलेले सैरभैर मुंडे भाजपमध्येच ठाण मांडून बसले. 2014 मध्ये महाराष्‍ट्रात सत्तापरिवर्तन करण्याचा निर्धार त्यांनी केला असून, मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा त्यांनी लपून ठेवलेली नाही. अशावेळी लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याची कबुली त्यांनी देऊन टाकल्याने भाजपमधीलच काही जणांना हायसे वाटत असेल. कारण, मुंडेंना सहा वर्षे निवडणूक बंदी होऊ शकते. तसे झाल्यास भावी मुख्यमंत्रिपद विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे वा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत मुंडेंना हे पद मिळू नये, असे पक्षांतर्गत विरोधी गटास वाटते.


वास्तविक 200९च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रातील सर्व, म्हणजे 4८ खासदारांचा खर्च प्रचंडच होता व अनेकांनी 15-20 कोटी रु. खर्च केले होते. आगामी निवडणुकीत नागपूरमधून खुद्द गडकरी उभे राहणार असून, ते खर्चाचे कोणते विक्रम करतील, ते बघावे लागेल. 1९८९ मध्ये भाजपने सेनेशी युती केली व त्याचे श्रेय प्रमोद महाजनांचे होते. युतीला भाजपमध्ये असलेला विरोध मोडून काढण्याचे काम महाजनांनी केले. 1९८4 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. 1९८4 मध्ये लोकसभेत झालेली युती, त्याच्या पुढच्याच वर्षी तुटली होती. कारण, पराभवाबद्दल कठोर आत्मपरीक्षण करण्यासाठी झालेल्या बैठकीत, बदनाम झालेल्या सेनेशी युती केल्यामुळेच आपल्याला अपयश आले, असे मत तेव्हा भाजपचे उमेदवार असलेले राम जेठमलानी यांनी मांडले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत युती झाली नव्हती. त्याचा फटका शिवसेनेलाही बसला व त्यांचा केवळ एक उमेदवार (छगन भुजबळ) निवडून आला. या काळात बाळासाहेबांनी आक्रमकपणे हिंदुत्वाचा प्रचार सुरू केल्यावर तुम्ही काय करताय? असा प्रश्न भाजपवाल्यांना विचारला जाऊ लागला. तेव्हा रामजन्मभूमीचे राजकारण तापले नव्हते. मात्र, परिवारातील कार्यकर्ते ठाकरेंकडे आकर्षित होऊ लागले होते. 1९८८च्या भाजपच्या आग्रा अधिवेशनात प्रमोद महाजन म्हणाले की, विहिंपने रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू केले आहे व त्यास आपण पाठिंबा दिला पाहिजे. त्यास अडवाणी व इतरांचा प्रतिसाद मिळाल्यावर वसंतराव भागवत व महाजन यांनी राज्यव्यापी दौरे काढले. जिल्ह्याजिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी युती व्हावी, असा आग्रह त्यांच्यापाशी धरला व पालमपूरच्या भाजप राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्याबद्दलचा अंतिम निर्णय झाला. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे महाजनांमुळेच मी भाजपमध्ये आहे. ते जर काँग्रेसमध्ये असते, तर मी त्या पक्षात असतो, असे उद्गार मुंडे यांनी काढले होते. त्या अर्थाने ते परंपरा व परिवारवाद्यांना जवळचे व वंदनीय वाटतातच, असे नव्हे.
रामजन्मभूमी आंदोलन जोरात असतानाही मुंडेंनी आपल्या मतदारसंघातील आपल्या प्रचारात साध्वी ऋतुंभरा प्रभृतींचा समावेश होऊ दिला नाही. अल्पसंख्यविरोधी बेभान प्रचार करण्याचे काम त्यांनी कधी केले नाही. मराठवाड्यात मुंडेंमुळेच भाजपने समतावादी भूमिका स्वीकारली होती व मुंडे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी यादृष्टीने काही उपक्रमही हाती घेतले होते. मंडल आयोगाच्या शिफारसींना भाजपचे समर्थन होते व मराठवाडा नामांतरासही. 1९८८-८९ मध्ये शेतक-यांच्या समस्यांना तोंड फोडण्यासाठी मुंडेंनी तुळजापूर ते वेरूळ अशी शेतकरी कर्जमुक्ती यात्रा काढली आणि काही वर्षांपूर्वी गोदावरी परिक्रमा करून शेतक-यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. थोडक्यात भाजपची शेटजी-भटजींचा पक्ष ही प्रतिमा बदलण्यास मुंडे कारणीभूत ठरले आहेत.


अर्थात महाजन-मुंडेंनी आणि नंतर गडकरींनी भाजपमध्ये भांडवलशाहीही आणली. भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढणारा हा पक्षच चिखलात रुतल्याचे अनेक दाखले देता येतील. याला भाजपचे काँग्रेसीकरण झाले, हे म्हणण्याची पद्धतही जुनी झाली. संसदीय लोकशाहीतील सर्व प्रकारच्या तडजोडी करणारा पक्ष आपली ब्रँड इक्विटी गमावून बसला. आम्ही राजकारणात सप्तक्रांती आणू, अशा वल्गना करणारा जनता पक्ष (ज्यात जनसंघ होता) जवळपास अदृश्य झाला. दोनअडीच वर्षात गाशा गुंडाळण्याची एकमेव क्रांती त्याने केली. महाराष्ट्रात शरद पवारविरोधी प्रचार करून विधानसभेवर युतीचा भगवा फडकावणा-या जोशी-मुंडेंच्या सरकारमध्ये सर्वाधिक स्कॅम्स झाली. पवार सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करणा-या मनोहर जोशींना जावयाच्या एका प्रकरणावरील आरोपामुळेच मंत्रालयातून थेट दादरच्या कोहिनूरमधील ऑफिसात बसणे भाग पडले. एन्रॉन वादात पवारांवर बरसणा-या मुंडेंना एन्रॉनचा शॉकही बसला. दिल्लीत आघाडी धर्माची दीक्षा घेतल्यावर वाजपेयी सरकारला समझोते करताना नाकीनऊ आले आणि भ्रष्टाचाराचे अनेक तहलके झाले.
निवडणुकीत फक्त काँग्रेस पक्षच मते विकत घेतो, व्होट बँक
बांधून मतांचे रिकरिंग खाते उघडतो. ‘सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता’ ही अण्णा हजारी फ्रेज केवळ काँग्रेसलाच लागू होते, हा समज केव्हाच दूर झाला आहे.


मुंबईतील नरेंद्र मोदी, गडकरी व विनय सहस्रबुद्धे यांच्या लोकशाही धमसंसदेत सुशासनाचे नवे सिद्धांत मांडले जात होते, परंतु त्यांच्या समक्ष अष्ट कोटी हनूमान उड्डाण घेतल्याच्या पापाची कबुली देऊन मुंडेंनी धमाल उडवून दिली आहे. आपले पाय मातीचे आहेत, असे भाजपच्या धर्मसंसदेतले इतर नेतेही जाहीर करणार आहेत का? की कुणी खर्चाची मर्यादा ओलांडल्यास ते फक्त अधर्म, अधर्म असे पुटपुटणार आहेत?