आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रथम स्मृतीदिन: जगाला बाबांचा विसर पडू देणार नाही - पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विरोधी पक्षात राहून हयातभर सत्ताधा-यांशी झुंजणा-या साहेबांना विजयश्री मिळाल्यामुळे सगळेच आनंदात होते, पण त्यांच्या अचानक जाण्याने मुंडे कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांवर आभाळ कोसळले. त्यातूनही पुन्हा उभारी घेणा-या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...

१५ वर्षांपासून सत्तेचे स्वप्न पाहणा-या राज्यातील जनतेची इच्छा २६ मे २०१४ रोजी पूर्ण झाली. माझे बाबा गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनं राज्यभरातील जनता सुखावली. केंद्रीय मंत्रिमंडळातील मोठे पद जिल्ह्याच्या वाट्याला आल्याने विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. जिल्ह्यात ३ जून रोजी साहेबांच्या स्वागताचा कार्यक्रम ठेवला, तयारीही पूर्ण झाली होती, परंतु नियतीने सर्वकाही हिरावून घेतले. मी पूर्णत: खचून गेले. कामं सोडून शांत बसावं, असा विचार मनात यायचा. आई व बहिणींना आधार देण्याची जबाबदारी माझ्यावरच होती. राज्यभरातील कार्यकर्त्यांचा तर आधारच हरपला होता. दिशाहीन झालेले कार्यकर्त पाहून मन घट्ट केले. आपलं काहीही झालं तरी जगाला बाबांचा विसर पडू द्यायचा नाही, असा निर्धार करत राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. राज्यात सत्तापरिवर्तन करण्यासाठी ३२०० किलोमीटरची १६ दिवसांची संघर्ष यात्रा काढली. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून दुप्पट ताकदीनं कामाला लागले. सभांना उपस्थित राहणारा जनसमुदाय मतदार बनला आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहापैकी पाच जागा जिंकल्या. १२३ जागा जिंकणारा भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपचे सरकार आले. केंद्रात बाबांकडे असणारे खाते राज्यात माझ्याकडे आले. त्यानंतर वैद्यनाथ साखर कारखाना, दीनदयाळ बँक, जिल्हा बँक या निवडणुका बाबांवर जिवापाड प्रेम करणा-या जनतेच्या बळावरच जिंकल्या. लोकसभेची पोटनिवडणूक देशभरात सगळ्यात जास्त मतांनी जिंकण्याचा विक्रम डॉ. प्रीतम मुंडे यांनी केला तो कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच.
माणसे जोडण्याचा
वसा जपणार
सत्ता आल्यापासून जिल्ह्यासाठी ३०० कोटींचा निधी आणला. मुंडे साहेबांचं स्वप्न असलेला परळी-बीड-नगर रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वतः राज्याच्या सचिवांशी चर्चा करून निधीची तरतूद केली. बाबांनी हयातभर केलेले माणसे जोडण्याचे काम मला पुढे न्यायचे आहे. गोपीनाथ मुंडेंचे नाव जगाला विसरू देणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे.