आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: कोळशाचे सोने हवे असेल धगधगण्याची तयारीही हवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीला पगारापोटी महिन्याला साठ रुपये मिळायचे. त्यातले १५ रुपये सासू-सासऱ्यांना, पाच रुपये घरभाडे आणि २० रुपये दिराच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी जायचे. उरलेल्या २० रुपयांमध्ये सविताबेनला तीन मुले आणि तीन मुलींचे कुुटुंब चालवावे लागत होते. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सविताबेन कोळशाचा व्यापार करणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे गेली. आपल्यालाही कोळशाचा व्यापार करायचा आहे असे तिने आई-वडिलांना सांगितले. ही गोष्ट आहे १९५०-६० सालची. मात्र, त्यावेळी मुलीने असा व्यवसाय करावा हे सविताबेनच्या आईवडिलांना मान्य झाले नाही. सविताबेनच्या डोक्यात मात्र कोळशाचा व्यवसाय करण्याचे पक्के होते. त्या काळी अहमदाबादला कापडाचे अनेक कारखाने होते. त्या कारखान्यांतून अर्धे जळालेले कोळसे आणून ते घरोघरी विकण्याचा धंदा सविताबेनने सुरू केला. बस कंडक्टर पतीसाठी जेवणाचा डबा आणि सहा मुलांना नास्ता करण्यासाठी सविताबेनला पहाटे ४.३० ला उठावे लागायचे. घरचे सगळे आवरून ती घरोघरी जाऊन कोळसा विकायची. त्यानंतर रात्रीचे जेवण बनवून कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून पुन्हा खादी ग्रामोद्योगमध्ये चरखा विणण्यासाठी जायची. पाच वर्षांतच सविताबेनने स्वत:चे दुकान उघडले. छोट्या कारखान्यांचे नियोजन कसे चालते हे तिला आता समजू लागले होते. रेल्वे बोगीसाठी आवश्यक असलेल्या चांगल्या प्रतीचा कोळसा पुरवण्याचा ठेकाही तिने घेतला. यासाठी तिच्या चुलत्याने तिला मोठी मदत केली. आता सविताबेनकडे मोठ्या ऑर्डर येऊ लागल्या होत्या. त्यासाठी चांगले ऑफिस हवे होते. घराशेजारच्या एका हॉटेलमध्ये व्यापाऱ्यांना बोलावून सौदे करण्यास तिने सुरुवात केली होती. 
 
अन्य व्यापाऱ्यांच्या तुलनेत सविताबेन कमी नफ्यात धंदा करत हाेती. मात्र, तिचा सगळा व्यवहार रोखीचा होता. अन्य व्यापारी १०० रुपये नफा कमावत होते, मात्र पैशासाठी किरकोळ व्यापाऱ्यांना महिनाभराची सवलत देत होते. सविताबेन मात्र ५० रुपये रोखीचा नफा कमावत होती. तिची ितन्ही मुले आता तिला व्यापारात मदत करू लागली. तिन्ही मुलीही ग्रॅज्युएट झाल्या. मोठा मुलगा रूपेशला सिरॅमिक व्यवसायात आवड होती. सविताबेनने त्याला, त्याच्या आवडीला मदत करण्याचे ठरवले. आत्तापर्यंत जमवलेला सगळा पैसा तिने सिरॅमिक कारखान्यासाठी वापरला. मुकेशनेही प्रामाणिकपणे हा व्यवसाय वाढवला. आजही ७२ वर्षीय सविताबेनचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो. सहा ते आठ असे दोन तास त्या फक्त बिझनेसवर चर्चा करतात. जॉन्सन्स या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी त्यांची कंपनी सध्या टाइल्स बनवते. 
एका खोलीच्या घरातून हे कुटुंब आता १० बेडरूमच्या मोठ्या बंगल्यात आले आहे. मर्सिडीझ, ऑडी अशा महागड्या गाड्याही त्यांच्याकडे आहेत. सोन्याची ठोक आयात करून ते सोने स्थानिक सोनारांना विकण्याचा व्यवसाय करण्याची सविताबेनची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तिने सरकारकडे या व्यवसायाचा परवानाही मागितलेला आहे. 
 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...