१९४२ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनात २० हजार महिलांना बाबासाहेबांनी आवाहन केले ‘स्वच्छ राहा. दुर्गुणांपासून दूर राहा.’ तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्या. त्यांच्यातील कमीपणाची भावना दूर करा. मी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागाल तर तुम्ही स्वत:ची प्रगती तर करालच, त्याचबरोबर समाजालाही प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकाल. एवढे सांगून बाबासाहेब थांबले नाहीत तर ते पुढे म्हणतात, "तुम्ही तर घरच्या साक्षात लक्ष्मी! त्यामुळे घरात काही अमंगल गोष्ट होणार नाही. याची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे. सदाचरणाशिवाय घेतलल्या शिक्षणाची किंमत शून्य असून चारित्र्य हेच धर्माचे महत्त्वाचे अंग आहे, हे लक्षात घ्या.’
तथाकथित उच्चभ्रूंना विशेषाधिकार आणि इतर जातींच्या लोकांनी जीवनभर अभिशापाच्या दलदलीत सडत राहायचे, तिरस्काराचे जीवन जगायचे, या वास्तविकतेची त्यांना घृणा आली. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी कायदा व राजकारणाचा मार्ग स्वीकारला. दलित, पीडित व शोषितांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात परिवर्तनासाठी संघर्ष केला. हा संघर्ष होता - समाजातील असमानता व विषमतेचा. त्यांच्या या संघर्षात समाजातील वंचित वर्गाची पीडा होती, त्यांच्या विषयीची कळकळ होती.
समभावाबरोबर ममभावही जोडला गेला पाहिजे. समभाव + ममभाव= समरसता. ही समरसताच समाजरोगावर रामबाण औषध ठरू शकेल.. बरेच जण आयकर अधिकारी, शिक्षक व व्यापारी बनल्याने कदाचित समता निर्माण होईल. एका सवर्णाचा मुलगा शिक्षक झाला आणि एका दलिताचाही मुलगा शिक्षक झाला; तर समभाव येईल. पण त्यांच्यात ममभाव निर्माण झाला नाही तर समरसताही येणार नाही. या ममभावाची जबाबदारी देशातील समरसताधारकांवर आहे.
जगातील कोणत्याही धर्मात जेवढे समाजसुधारक झाले असतील त्यापेक्षा कितीतरी पट समाजसुधारक हिंदू धर्मात झाले आहेत. धर्मात ज्या विकृती निर्माण झाल्या होत्या त्यांत या धर्मसुधारकांनीच सुधारणा केल्या, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. डॉ. भीमराव आंबेडकर असोत की नरसैया, महात्मा गांधी असोत की सरदार पटेल, स्वामी विवेकानंद असोत की स्वामी दयानंद सरस्वती, हे सर्व एकाच हारातील फुले आहेत. समाजात या थोर व्यक्तींनी असे वातावरण तयार केला की जे वातावरण येणाऱ्या काळात समाजाचा विचार करेल. ही जबाबदारी
आपल्या सर्वांचीच आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत उभारण्यासाठी एकही स्री शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पाहावे लागेल. वाईट चालीरीती, प्रथा, परंपरा मोडीत काढाव्या लागतील. त्यासाठी बाबासाहेबांच्याच मार्गाने जावे लागेल.
या देशात एक मोठा वर्ग असा आहे की त्याला भगतसिंग, राजगुरू, श्यामजी कृष्णवर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरेंची नावे घ्यायला लाज वाटते. अशा विकृतींना समाजाने बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. देशासाठी जगणारा-मरणारा प्रत्येक महापुरुष माझा आहे, अशी भावना प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी साऱ्या देशासाठी फार मोठे कार्य केले. म्हणून ते पूजनीय आहेत. परंतु आपण मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांचे तारणहार मानून त्यांचे कर्तृत्व सीमित करून टाकले. बाबासाहेब तर समग्र शोषित, वंचितांचे तारणहार होते. केवळ दलितांचे तारणहार बनवून बाबासाहेबांना लहान करू नका. या विश्वमानवाला एका लहान वर्तुळात बंद करू नका.
जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात मानवजातीत भेदभाव दर्शवणारे स्वभाव आढळून येतील. या भेदभावाचा सामना करणारा वर्गही दिसतो. जगात कृष्णवर्णीयांसाठी लढणाऱ्यांचे नाव लोकांच्या तोंडी असते; परंतु एखादा भारतीय जर पददलितांसाठी लढत असेल तर जग त्याला ओळखत नाही. जगातील कोणत्या देशातील कवी वा लेखक त्यांच्या समाजातील वाईट चालीरीतींसंदर्भात बंड पुकारत असेल तर त्याची विश्वमानव म्हणून पूजा केली जाते. आपल्याला त्यात डोकावण्याची गरज नाही. पण एक समाज म्हणून आपल्या सर्वांच्या पीडेचा हा विषय आहे एवढेच. जननायक जगातील इतर समाजांसाठीही प्रेरणास्राेत बनून राहावेत, यासाठी प्रयत्न करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
वंचितांसाठी लढणाऱ्या अशा दोन महामानवांचे उदाहरण येथे देता येईल. अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग व हिंदुस्थानातील आपले डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दोघांनी वंचितांसाठी, पददलितांसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. दोघांचाही जन्म गरीब कुटुंबांत झालेला तसेच पालनपोषणही खडतर स्थितीत झालेले. दोघांनीही स्वत:साठी नव्हे तर वंचितांसाठी लढा दिला. सामाजिक असमानता व विषमतेची दरी मिटावी यासाठी दोघांनी आयुष्यभर लढा दिला. अधिकारांची लढाई लढता लढता या दोघांनी आपले शिक्षण घेतले, परंतु आपली जाबाबदारी सोडली नाही. थोडक्यात बाबासाहेब व मार्टिन ल्यूथर किंग यांच्या कार्याचा मार्ग व दिशा एकच होती. जगाच्या नजरेत आपण यावे असे बाबासाहेबांना कधीच वाटले नाही. आपल्या समाजातील या महामानवांना जगासमोर आणणे, ही काळाची गरज आहे. जगाला ज्या भाषेत कळते, त्या भाषेत या महामानवांचा परिचय करून देण्याची जबाबदारी एक राष्ट्र म्हणून आपली आहे. आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडू. आपले जे जे म्हणून श्रेष्ठ आहे, त्याचा गौरव करण्याची हिंमत आपल्यात असायला पाहिजे.
‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणे मला मान्य नाही. हिंदू धर्म सोडण्याचे बाबासाहेबांनी निश्चित करताच त्यांनी आपल्या बाजूने यावे, यासाठी जगभरातील लोक त्यांच्याकडे रांग लावून उभे राहिले. बाबासाहेबांनी ख्रिस्ती, इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी त्यांना अमाप धनदौलतीची लालूच दाखविली गेली. मात्र बाबासाहेबांनी हिंदुस्थानच्या अखंडता व एकतेसाठी योग्य निर्णय घेतला. ते म्हणतात. ‘मी हिंदू धर्म सोडणार. हिंदू समाजात ज्या विकृती आल्या आहेत त्या विकृतींना माझा विरोध आहे, पण मी हिंदुस्थानवर प्रेम करतो. मी हिंदुस्थानसाठी जगेन व मरेन तेही हिंदुस्थानसाठीच. माझ्या शरीराचा प्रत्येक कण, माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण, या हिंदुस्थानच्या कामी यावा यासाठीच माझा जन्म झाला आहे. मी हिंदू धर्माचा त्याग करीन, परंतु मी अशा धर्माचा स्वीकार करेन जो हिंदुस्थानच्या भूमीत स्थापन झालेला असेल. मला असा धर्म स्वीकारार्ह आहे की, जो हिंदुस्थानात आयात केलेला नसेल. तो मूळचा हिंदुस्थानीच असेल. म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारत आहे’. देशभक्तीचे हे केवढे मोठे शिखर! किती गहन चिंतन आहे हे ! कल्पना करा, त्यांची दिव्य दृष्टी कशी होती! जे लोक धर्मांतराच्या प्रक्रियेशी जोडले गेलेले आहेत त्यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश सतत स्वीकारण्यायोग्य आहे. दलितांना अस्पृश्यतेच्या ज्या यातना होत होत्या, त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल राष्ट्रप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. शिक्षणाच्या दिशेने प्रगती करायची असेल तर बाबासाहेबांसारखी दुसरी कोणतीही मोठी प्रेरणा असूच शकत नाही. किती विपरीत स्थितीत त्यांनी ही उंची गाठली होती! किती मोठा संघर्ष केला ! ते म्हणत, “शिक्षित झाले पाहिजे’. पण जी मुले शिक्षित झाली नाहीत त्यांच्यासाठीच हा संदेश होता असे नाही, तर शिक्षित झालेल्यांनाही ते म्हणत की, शिक्षित व्हा. हाच खरा मार्ग. डॉ. बाबासाहेबांचे जीवन समजून घेण्यासाठी, वाचण्यासाठी, अभ्यास करण्याचा, मनन-चिंतन करण्याचा संकल्प करा. या महामानवाच्या जीवनापासून तुम्हाला एक नवी दिशा मिळते. जीवनसंघर्षासाठी एक नवी प्रेरणा मिळते.
बाबासाहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ते सत्यासाठी लढत, परंतु त्यांच्या जीवनात तिरस्कार, घृणेला मात्र स्थान नव्हते. त्यांना समाज तोडायचा नव्हता, तर जोडायचा होता. त्यांनी समाजावर टीका केली, समाजाला चेतविले, परंतु तोडले मात्र नाही. समता-ममतेच्या माध्यमातून जीवनभर मेहनत घेतली. काळाराम मंदिरात प्रवेशाची गोष्ट असो की चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा प्रश्न असो, त्यांच्या कार्यक्रमाचा आणि आंदोलनाचा केंद्रबिंदू समाजाची एकता हाच असे.
आजच्या पिढीचे कर्तव्य : काँग्रेसने योजनापूर्वक दोन महामानवांवर अन्याय केला. एक सरदार पटेल व दुसरे बाबासाहेब आंबेडकर. या दोघांचा देशाला पूर्ण परिचयच करून दिला नाही. हे दोन नेते समाजाशी जोडले गेलेले होते. सरदार पटेल व बाबासाहेबांची कमतरता आजही समाजात जाणवते. त्या वेळी या महापुरुषांनी देशासाठी अजूनही फार कार्य केले असते, परंतु त्यांना तशी संधीच दिली गेली नाही. त्यांच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. मानवतेसाठी ती शक्ती ज्या प्रमाणात उपयोगात आणायला हवी होती, त्या प्रमाणात तिचा वापर केला गेला नाही. म्हणून संपूर्ण समाजावर एक प्रकारे अन्यायच करण्यात आला. आज जेव्हा जगात प्रामाणिकतेचा, सत्याचा स्वीकार केला जात असताना हे चित्र कसे काय उभे राहिले? यासाठी कोण जबाबदार? यासाठी आपण सर्व भारतवासी जबाबदार आहोत.
हिंदू समाज सदैव परिवर्तनशील राहिला आणि या परिवर्तनशील समाजात ज्या काही वाईट चालीरीती आहेत. अस्पृश्यता, उच्च-नीच भाव वाईटच. केवळ नोकरी वा चांगली आर्थिक स्थिती समग्र परिर्वतन घडवून आणू शकत नाही. यासाठी तर आपलेपणाचा, अस्मितेचा भाव असणे आवश्यक आहे. समाजाप्रती कटुतेचा भाव, समाजासाठी वैरवृत्तीचा भाव, कोणाला कमी लेखण्याचा भाव अशी जी परंपरा चालत आलेली आहे. ती आता बदलली पाहिजे. अशा वाईटरीती विरुद्ध आपण लढले पाहिजे.
समता व ममता दिली...
स्वामी विवेकानंदांना आपण ते अमेरिकेतून आल्यानंतरच स्वीकारले. आपल्याकडे योगसाधनेचा एवढा मोठा वारसा दुर्लक्षित होता; परंतु योगसाधनेचा हाच वारसा पाश्चात्त्य देशांमार्फत आपल्या देशात येताच आपणही मोठ्या गर्वाने त्याचा स्वीकार केला. या देशाला तुकड्यातुकड्यांत विभाजित करण्यासाठी इंग्रजांनी 'भारत हे कधीच एक अखंड राष्ट्र नव्हते. तो समाज म्हणूनही एक नव्हता. तेथे एकतेसारखी गोष्टच नव्हती.' असा, तर कधी द्रविड व आर्यांच्या भ्रमपूर्ण सिद्धांतांचा अपप्रचार केला. कधी आर्य हे बाहेरून आले असा वितंडवाद, तर भारतात मूळ अशी कोणती जातच नव्हती अशा कथा आपल्या अनेक पिढ्यांच्या मनांवर बिंबवून ते किल्मिष पसरवून गेले. या भ्रामक वातावरणात बाबासाहेबांनी समता-ममतेचा संदेश दिला.
(शब्दांकन : किशोर मकवाना)