Home »Divya Marathi Special» Navjot Singh Sidhu Knows Life Gimmicks Because Of Swami Vivekanand

विवेकानंदांच्या पुस्तकातून मिळाला जीवन प्रकाश !

राजेश शर्मा | Jan 05, 2013, 23:01 PM IST

  • विवेकानंदांच्या पुस्तकातून मिळाला जीवन प्रकाश !

क्रिकेटपटू असताना नवज्योतसिंग सिद्धूचा रागीट, तापट, लहरी स्वभाव मैदानावरील खेळाडूंपासून ते गॅलरीतील प्रेक्षकांपर्यंत सर्वश्रुत आहे. तो राग आता राहिला नाही. त्याचे प्रेमात रूपांतर झाले. सिद्धू यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला...हा बदल एका दिवसात झाला नाही..हा चमत्कारसुद्धा नव्हता..दररोज तासन्तास केलेल्या ध्यानसाधनेचे हे फळ आहे. रागीट चेहरा आता हास्याने, प्रसन्नतेने उजळला. क्रिकेटपटू ते समालोचक असा प्रवास करणा-या सिद्धूने नागपूर कसोटीदरम्यान आनंदी जीवनाचे गमक सांगितले.


‘मन जिते, जग जिते..’ : ‘1999 मध्ये स्वामी विवेकानंद यांचे एक पुस्तक वाचले. या पुस्तकाने माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. ध्यान साधना करू लागलो. स्वत:चा आत्मशोध घेऊ लागलो. ‘मन जिते, जग जिते..’, ज्याने मन जिंकले, त्याने जग जिंकले. जग जिंकणारा सिकंदर नव्हे. ज्याने स्वत:चे मन जिंकले, तो जगज्जेता, हे लक्षात आले.मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तलावाचे पाणी अस्थिर असेपर्यंत त्याचा तळ दिसत नाही. ते स्थिर झाले की तळ दिसू लागतो. मनाचेही तसेच आहे. मन इकडेतिकडे धावते. अस्थिर मनाला शांत, स्थिर करण्याचा प्रयत्न सुरू झाला, त्याच्या तळाचा ठाव घेण्यासाठी! ज्याने अभ्यासाने, अध्ययनाने मनाला जिंकले, तो सापाचे विष पचवू शकतो, हवेत गती मिळवू शकतो, ब्रह्माशीही भेटू शकतो. अर्थात त्यासाठी गरज आहे ती आत्मसाक्षात्काराची. सेल्फ रिअलायझेशनची’ सिद्धू सांगत होता.


देही मे परम् सुखम् : ध्यानामुळे आत्मविश्वास वाढला. ‘देही मे परम् सुखम्’..सुख आपल्या आतच आहे. आपण उगीच त्याचा इतरत्र शोध घेतो. आत्मसाक्षात्काराचा मार्ग मी स्वीकारला. स्वत:च्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कस्तुरी आपल्या आतमध्येच असल्याचे समजले. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होणार नाही, तोपर्यंत देह त्यागणार नाही, हे मी ठरवले.


काय केले साध्य : ‘दुनिया मे सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग...’..कोण काय बोलणार, ही भीती नाहीशी झाली की सर्व भय संपले. कशाचीच भीती राहिली नाही. आता माझ्यावर कोणत्याही परिस्थितीचा फरक पडत नाही. आनंद आणि दु:खातही मी एकाच मुद्रेत राहतो. मी सम झालो आहे. दृष्टी बदलली. ‘नजरे बदलो, नजारे बदलेंगे..’ सृष्टीला बदलू पाहणा-यांनी आपली दृष्टी बदलावी. माझी दृष्टी बदलली, सृष्टीही बदलली. विचाराने माणूस मोठा होता, ओजस्वी होतो. हे सर्व मी ध्यानाने मिळवले. मी म्हणी, वाक्यप्रचाराची पुस्तके वाचली नाही. ध्यानाने सर्व आत्मसात झाले. स्वत:कडूच शिकलो.

किमान आठ तास साधना

विवेकानंद, शंकर हे माझे गुरू आहेत. गायत्री मंत्र म्हणत मी ध्यानसाधना करतो. तासन्तास करतो. पायाचा रक्तप्रवाह थांबतो..कळत नाही..खूप सरावाने हे मी मिळवले. एका दिवसात हा बदल झाला नाही. मी सकाळी साडेतीन वाजता उठतो आणि ध्यानसाधना करतो. साधारणपणे दररोज आठ ते साडेआठपर्यंत साधना करतो. वेळ मिळाला तर नऊ, दहासुद्धा होतात. मला परमशांतीचा शोध आहे. ही स्वत:मध्येच आहे. याचा शोध घेतोय. आत्ममंथन सागरमंथनाप्रमाणे आहे. जितके मंथन होईल, तितके अमृत बाहेर येईल.

असे झाले फायदे

० झोप, जीवनाचा अर्थ समजला.
० छोटे, मोठे दुखणे, रोग नाहीसे झाले.
० प्रचंड प्रमाणात ऊर्जा वाढली.
० भीती नाहीशी झाली.
० स्वभाव शांत झाला. राग नियंत्रणात आला.
० राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर मागे पडले. प्रेम, आनंदाने विजय मिळवला.

Next Article

Recommended