आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawab Malik Article About On State Election 2015, NCP, Sharad Pawar

लोकसभा निवडणूक वेगळी, विधानसभा त्यापेक्षाही वेगळी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीला आता राज्यात आपलीच सत्ता आली, अशी रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही स्वप्ने पडू लागली आहेत. स्वप्न कोणीही बघावीत... त्याला आमची काहीच हरकत नाही! पण दिवास्वप्ने बघण्यात काय साध्य होणार आहे, हे महायुतीच जाणे. आधी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे उदाहरण घेऊया. ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच दिवशी गुजरातमध्ये विधानसभेच्या ६ जागांसाठीही निवडणुका पार पडल्या. या सहाही जागांवर लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप पुढे होती. मात्र त्यापैकी ३ जागा विधानसभेत त्यांना गमवाव्या लागल्या. ३० ते ४० हजार मतांच्या फरकाने भाजप उमदेवार पराभूत झाले. जी गोष्ट गुजरातची तीच उत्तराखंडची. भाजपला विधानसभेच्या २ जागा राखता आल्या नाहीत. २००९ मध्ये महाराष्ट्रात बीड लोकसभा मतदारसंघात सहापैकी सहा जागांवर भाजप आघाडीवर होते. पण विधानसभेत ६ पैकी ५ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. पुण्यात शिरूरमध्ये अढळराव पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती ओढवली. राष्ट्रवादीने पाच जागा खेचून आणल्या. यावेळीही तसेच होणार आहे. लोकसभेत महायुतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या असल्या तरी विधानसभेत आघाडीचेच सरकार येणार! सलग चौथ्यांदा आम्हाला जनता कौल देणार, याविषयी शंका नाही. १५ वर्षे आम्ही विकासकामे केली त्याच्या जोरावर जनात आम्हाला निवडून देईल. घोडामैदान जवळच आहे. त्यामुळे महायुतीने अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये...

१० जून १९९९ मध्ये स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला लगेचच लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागले होते. काँग्रेसपासून फारकत घेऊनही आम्ही दोन्ही निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले. त्यावेळी आमचे ८ खासदार निवडून आले होते. तर विधानसभेत त्रिशंकू स्थिती होती. केंद्रात एनडीएचे सरकार सत्तेवर आले त्यावेळी भाजपकडून आम्हाला केंद्रात तसेच राज्यात सत्तेसाठी विचारणा झाली. खरेतर कुठलाही नवीन पक्ष स्वत:च्या विस्तारासाठी सत्ता जवळ करतो, पण आम्ही त्यावेळी आणि आजही धर्मनिरपेक्ष विचारांवर ठाम होतो, आहोत. त्यामुळे केंद्रात आम्ही विरोधी बाकांवर बसणे पसंत केले, तर राज्यात काँग्रेसबरोबर आघाडीचा निर्णय घेऊन सत्ता स्थापली. आमचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारणाबरोबर समाजकारणही झाले पाहिजे, यावर सुरुवातीपासून विश्वास आहे. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, हा द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पवारांनी चालवलाय. आजही राष्ट्रवादी शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांपासून तसूभरही ढळलेला नाही. विकासाबरोबर विचाराच्या लढाईत आम्ही कधीही तडजोड न केल्यामुळेच जनतेने १९९९ नंतर २००५ तसेच २००९ मध्ये आमच्या हाती विश्वासाने सत्ता सोपवली. आमच्या आघाडीने विधानसभेत विजयाची हॅट्‍्‍िटक साजरी केली. आता आमचे लक्ष्य सलग चौथ्यांदा विजयाचे आहे!
लोकसभा निवडणुकीत महागाई, भ्रष्टाचारासंदर्भात अपप्रचार करत भाजप मित्रपक्षांनी सत्ता स्थापन केली असली तरी त्याचवेळी काँग्रेस आघाडीनेही गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांची नीट मांडणी करायला हवी होती. त्यांच्या अपप्रचाराला यूपीएने केलेल्या कामांनी उत्तर द्यायला हवे होते, पण का कोण जाणे, पण आम्ही प्रचारात मागे पडलो. उलट अपेक्षांचे फुगे भरून मोदींनी प्रचाराचे मायाजाल निर्माण केले. त्याकडे नवमतदार आकर्षित झाला... मात्र पुढे काय झाले? हे सारा भारत देश जाणतो. महागाई प्रचंड वाढत चालली असून निवडणुकीत केलेल्या घोषणा बासनात गुंडाळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदूराष्ट्राचा अजेंडा पुढे आणला जातोय. शिवाय धार्मिक तेढ निर्माण करून काही लोक भांडवलदारांना रान मोकळे करून देण्याच्याही प्रयत्नात आहेत. हे खूप धोकादायक आहे. यामुळे गरीब व श्रीमंतीतील दरी वाढू शकते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सतराशे अठरा पगड जात आणि धर्मांची माणसे असलेल्या भारताच्या लोकशाहीला हे पोषक वातावरण नाही... मात्र महाराष्ट्रातील जनता हा सारा प्रकार डोळे उघडे ठेवून बघत आहेत. ते विधानसभा निवडणुकीत शांतपणे मतपेटीतून महायुतीला चोख धडा शिकवतील! प्रचारातील चुकांमधून आघाडी आता बरेच काही शिकली आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही केलेल्या कामांचा दैनिके, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावरून प्रचार प्रसार केला जात आहे. केलेल्या कामांच्या प्रचाराची ही गती पुढच्या काही दिवसांत आणखी जोरात लोकांसमोर आणली जाईल!

शरद पवार चांगला तोडगा काढतील
उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह आमचे सारे नेते सध्या राज्यभर निर्धार मेळावे घेत असून आतापर्यंत २९ जिल्ह्यांमध्ये ते झाले. त्यांस चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच आम्हाला २८८ पैकी १४४ म्हणजे विधानसभेच्या निम्म्या जागांची मागणी आम्ही काँग्रेसकडे केलीय. पक्षाची एकूण ताकद पाहता, आम्ही निम्म्या जागा मागत आहोत. शरद पवार यामधून निश्चितच चांगला तोडगा काढतील. काही जागांसाठी कोणी प्रतिष्ठेचा विषय करत बसत नाही. हे सर्व जाणतात. लवकरच आरपारच्या लढाईला सुरुवात होईल. जातीय पक्ष विरुद्ध धर्म निरपेक्ष पक्ष, अपेक्षांचे फुगे फुगवणारे विरुद्ध खरोखर विकासकामे करणारे अशी घमासान लढाई होईल. आघाडी विरुद्ध महायुतीचा मुकाबला अटीतटीचा होईल त्यात आघाडीची सरशी होणार आहे.
मुंबई. (राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस)