आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनिर्माणाचे ‘राज’; कॉँग्रेसशी वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरात सध्या चार विधानसभा मतदारसंघ आहेत. पूर्वी दोनच विधानसभा मतदारसंघ होते. त्यात एक शिवसेनेकडे तर मुख्य शहरातील मतदारसंघ कॉँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र गेल्या निवडणुकीच्या वेळी पुनर्रचनेत चार मतदारसंघ तयार झाले. यात कॉँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघावर मुसंडी मारत मनसेने झेंडा फडकवला. शिवसेनेला पारंपरिक मतदारसंघ कायम राखण्यात यश आले. मनसेने महापालिका निवडणुकीत पुन्हा भरारी घेत शिवसेनेला धोबीपछाड देत पालिकेचीही सत्ता मिळवली. मनसेने केवळ कॉँग्रेसच नव्हे तर शिवसेनेलाही शह दिला. दुसरीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आक्रमक नेतृत्वाने जिल्ह्यात राष्‍ट्रवादीचा झेंडा असताना शहरातील त्यांचा प्रभावही मर्यादित ठेवण्यात मनसेला यश आले. कॉँग्रेस, राष्‍ट्रवादी व शिवसेना या तिन्ही प्रस्थापित पक्षांना शह देत मनसेचे इंजिन सुसाट निघाले. मात्र सत्ता मिळाल्यानंतर इंजिनच्या वेगाला ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे. पालिकेची सत्ता मिळून सोळा महिने झाले तरी नवनिर्माणाचा पाळणा हलताना दिसत नाही.


राज ठाकरे यांनी सत्ता मिळाल्यानंतर दर महिन्याला नाशिकमध्ये दौरा करून विकास करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दौ-यातून फलनिष्पत्ती होत नसल्याने त्यांचीच चीडचीड वाढत असल्याचे दिसतेय. म्हणूनच की काय, पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जाण्याचेऐवजी ते चहापान-अनौपचारिक गप्पांच्या नावाने कसेबसे प्रसारमाध्यमांचा ‘सामना’ करताना दिसतात. अडचणीचा प्रश्न आला की, उडवाउडवी करतात किंवा थेट जय महाराष्‍ट्र म्हणत हात जोडून ते निरोप घेतात. त्यामुळे नाशिककरांच्या मनातील नवनिर्माणाविषयीच्या प्रश्नांची उत्तरेही मिळेनाशी झालीयत. टोलच्या झोलविषयी मनसेने उघड भूमिका घेतल्याने राज्यात प्रतिसाद मिळाला. मात्र याच मुद्द्यावर वर्षभरानंतर बोलताना मात्र राज सावध झाल्याचे दिसले. मनसेच्या आंदोलनानंतरही सरकार हलत नसल्याचे बघून राज यांनी न्यायालयात धाव घेतली. आता न्यायालयाकडून केस बोर्डवर येत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त करून राज यांनी आपणही सर्वसामान्यांप्रमाणेच व्यवस्थेशी संघर्ष करणारे आहोत हे दाखवून दिले. त्यामुळे नवनिर्माणासारख्या बाता केवळ लक्ष वेधण्याचे आयुध असल्याचे दिसत आहे. एकीकडे नाशिक दौ-यातून हाती काही लागत नाही व दुसरीकडे टीका होत असल्याचे बघून गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विकासकामांचा धडाकाच उडाला.

मात्र राज ठाकरे नाशिक सोडत नाहीत तोच कॉँग्रेसच्या माजी आमदार तसेच माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी ही कामे जुनीच असल्याचे सांगत आपल्या काळात भूमिपूजन झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे जुन्याच कामांचे नव्याने भूमिपूजन केल्याने नवनिर्माण नव्हे तर पुनर्निर्माण म्हणायची वेळ आली. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडीने प्रत्येक जिल्ह्याला विशेष निधी दिला. त्यात बच्छावांनी अनेक कामांचे भूमिपूजन केले. मात्र आचारसंहितेमुळे कामे झालीच नाहीत. हा शिल्लक निधी मनसेच्या आमदारांना मिळाल्यामुळे त्यातून कामे सुरू झाली. मुळात राज यांच्या दौ-यामागचा अर्थच उमगलेला नाही. दौ-याची सुरुवात गंगापूर धरणाच्या पूजनाने झाली. मात्र याच धरणाचे पूजन तसे पाहिले तर महापौर व स्थायी समिती सभापतींच्या अखत्यारीतील बाब असल्याने खुद्द त्यासाठी राज यांनी हजेरी लावावी व येईपर्यंत समस्त पदाधिकारी, नगरसेवकांना ताटकळवण्याची बाबही रुचली नाही. एकीकडे राज यांच्याकडून असलेल्या आशांचे रूपांतर निराशेत होताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या बालेकिल्ल्यात पुन्हा भगवा फडकवण्यासाठी पावले उचलली. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकरांकडून चांगली बांधणी सुरू असताना ठाकरे यांनी वॉर्डप्रमुखांशी संवाद साधून नवीन बळ देण्याचा प्रयत्न केला. राजप्रमाणे उद्धव यांचे व्यक्तिमत्व, वक्तृत्व फर्डे नसले तरी उद्धव सध्या कासवगतीने मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे भविष्यात ही ससा-कासवाची शर्यत ठरल्यास आश्चर्य वाटू नये.