आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीतील नवा हिंदकेसरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वप्न आहे. त्यासाठी अलीकडेच त्यांनी भाकरी फिरवून काही मंत्र्यांना बाहेर काढले व नव्या मंत्र्यांना आणले. प्रदेशाध्यक्ष बदलले. बडे-बडे कलंकित मंत्री आहे तेथेच राहिल्याने लोक म्हणाले, चतकोरच फिरवली... लोकसभेसाठी उमेदवार म्हणून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील प्रभृतींचे नाव प्रोजेक्ट करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याकरिता भरपूर निधी देण्यात आला. जाणत्या राजाचे या पट्ट्यातील दौरे वाढले. तरीसुद्धा राष्ट्रवादीला लोळवत सांगलीतला फड काँग्रेसनेच मारला.


येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुका काँग्रेसबरोबरच लढवायच्या आहेत, असे पवारांनी बजावले आहे. वास्तविक देशात व राज्यात तुझ्या अंगावर अधिक चिखल की माझ्या? असे हे दोन्ही पक्ष परस्परांना विचारत 501 साबणाची मागणी करत आहेत. बुडायचे असेल तर एकत्रच बुडूया, अशी उभयपक्षांची भावना असावी. शरद पवार राज्याचे चारदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते काँग्रेसचे होते; पण दरखेपेला काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटली. पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँगेसला 1९९0 मध्ये 141 आणि 1९९5 मध्ये 100 जागा मिळाल्या. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली 1९८5 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला निवडणुकीत जेवढे यश मिळाले होते तेवढेही 1९९0 च्या निवडणुकीत पवार देऊ शकले नाहीत. रयतेच्या राजाच्या नेतृत्वाचा परीसस्पर्श होताच काँग्रेसला बहुमत मिळणे तर दूरच, पण त्याची आमदार संख्याही घटली. नंतर राज्यात पहिल्याप्रथम युतीचा भगवाही फडकला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीला जाऊन स्थानिक प्रश्नांवर बोलण्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण-नारायण राणे-पतंगराव कदम-माणिकराव ठाकरे यांची थट्टा केली. आपल्या भागात येऊन पतंगरावांबद्दल बाहेरचे कुणी वाट्टेल तसे बोलले, हे स्थानिकांना रुचले नाही. या टीकेला उत्तर देण्याचे टाळून पतंगरावांनी प्रगल्भता दाखवली. पण निकालानंतर ते म्हणाले की, अजितदादांनी यापुढेही अशी टीका सुरू ठेवली तर 2014 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांबाबत मला चिंता वाटते! एकूण अजितदादांनी काकांप्रमाणेच काँग्रेसची वाट लावण्याचा चंग बांधला; परंतु प्रत्यक्षात सांगलीत राष्ट्रवादीचाच खुर्दा झाला.


परंपरागत दुश्मनी हे सांगलीतील राजकारणाचे वैशिष्ट्य. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून 1८ जुलै 1९७८ रोजी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दोन आठवड्यांत त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून शंकरराव चव्हाण यांचा अर्थमंत्री व राजारामबापू पाटील यांचा माहिती व प्रसिद्धी खात्याचे मंत्री म्हणून समावेश केला. वसंतदादा व राजारामबापू यांचे राजकीय वैर. दादांना दगा देणा-या पवारांनी बापूंना पुलोद सरकारात घेतले. शंकरराव व वसंतदादा यांचे नाते अहिनकुलासारखे. 1९७७ मध्ये दादा मुख्यमंत्री झाले तेव्हा शंकररावांनी बाहेर पडून स्वत:चा पक्ष (मस्काँ) काढला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडवून देशात जनता पक्षाचे सरकार आले होते. दादांशी जमत नसलेल्या राजारामबापूंनी चक्क जनता पक्षात प्रवेश केला.


1९७८ मध्ये निवडणुका लागल्या तेव्हा सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदारसंघातून जनता पक्षातर्फे बापू उभे राहिले. बापू विजयी झाले तर तो आपल्यावरचा जीवघेणा राजकीय वार असेल हे ध्यानात ठेवून दादांनी हालचाली सुरू केल्या. खरे तर बापूंची तेथील लोकप्रियता प्रचंड. त्यामुळे काँग्रेसमधील लहान-मोठे नेतेही त्यांच्याबरोबर जनता पक्षात गेले होते. दादांनी विलासराव शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी दिली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एकजूट बांधण्यासाठी सभा, मेळावे घेतले. प्रचाराचे रान उठवले आणि शिंदेंना विजयी केले. महाराष्ट्रभर गाजलेल्या या निवडणुकीत शिंदेंच्या रूपाने वसंतदादांनी बाजी मारली.
दादांची पुण्याई या वेळीही कामास आली. दादांच्या घराण्यास जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न राजारामबापूंचे सुपुत्र जयंत पाटील यांच्या अंगाशी आला. सांगली महापालिकेच्या या चौथ्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली याचे एक कारण म्हणजे हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागची लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढले. काँग्रेसतर्फे प्रतीक पाटील (केंद्रीय कोळसा राज्यमंत्री) उभे होते. परंतु त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री अजितदादा घोरपडेंना अपक्ष म्हणून खडे करून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न जयंत पाटील गटाकडून करण्यात आला. राजारामबापू ज्याप्रमाणे जनता पक्षात जाऊन जनसंघाबरोबर बसले त्याप्रमाणे 200८ मध्ये जयंत पाटील यांनी भाजप, जनता दल, शेकाप वगैरेंसमवेत महाआघाडी स्थापून सांगलीतील सत्ता हस्तगत केली. या महाआघाडीच्या गैरकारभाराला जनता विटली होती. सांगली-मिरज दंगलीत कोणत्या प्रवृत्ती होत्या, ते जनतेला ठाऊक आहे. या दंगलीमुळे भाजपला ताकद मिळाली. अशा पक्षासमवेत मांडीला मांडी लावून बसणारे लोक धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करत होते.


जयंत पाटील यांनी राज्याच्या अर्थखात्याची सूत्रे कार्यक्षमतेने सांभाळली; परंतु सांगली पालिकेत अंदाधुंदी होती. महाआघाडीही फुटली. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. परंतु गुत्तेवाले, गुंड यांना या वेळी राष्ट्रवादीने पालिकेची उमेदवारी दिल्याचे आरोप झाले. प्रचारापासून गृहमंत्री आर. आर. पाटील तथा आबा यांना दूर ठेवण्यात आले. राष्ट्रवादीत एकोपा नाही. उलट मदन पाटील, प्रतीक पाटील, पतंगराव यांनी एकत्रितपणे काम केले. पतंगरावांच्या चिरंजीवांना पुण्यातून लोकसभा लढवायची असल्यास प्रतीकची मदत होऊ शकते.


पतंगरावांना मनासारखे खातेही मिळेना, अशी रेवडी अजितदादांनी उडवली होती. पण त्यांना मनासारखी पालिका मिळाली! जयंतराव काँग्रेसमध्ये जाणार, अशी हूल उठवली गेली. राजारामबापूंनीही आपल्या मूळ पक्षाचा त्याग केला होता. जयंतरावांची शक्ती घटल्याने त्यांना लोकसभा लढवण्यास कदाचित भाग पाडलेही जाणार नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सोडायचेही कारण राहणार नाही. एकीकडे वसंतदादा गट आणि राष्ट्रवादीत अजितदादा गट यांच्याशी झुंजतच जयंत पाटील यांना पुढील वाटचाल करावी लागेल.