आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे मतदार: उत्सव नागरिकत्वाचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सर्व माध्यमांतूनही याविषयीच्या जाहिराती प्रसृत करीत आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, याबद्दल आवाहन करीत आहे. तरीसुद्धा तेथील अधिका-यांच्या मते हवा तेवढा उत्साह या नोंदणी अभियानात दिसून येत नाही. ज्यांचे नाव मतदार यादीत आधीपासूनच आहे त्यांना आपला पत्ता, वयाची माहिती तसेच मतदार ओळखपत्र व मतदार यादी यातील स्वत:चे छायाचित्र अद्ययावत करायचे असेल अशा व्यक्तींनीही या नोंदणी अभियानात तत्संबंधी फॉर्म भरायचे आहेत. नवीन मतदारांची नोंदणी झालेल्या अंतिम मतदार याद्या येत्या 7 जानेवारी 2014 रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पूर्वी जेव्हा फोटो ओळखपत्र देण्याची पहिली मोहीम होती तेव्हा मोठ्या प्रमाणावर यंत्रणा केंद्रीय निवडणूक आयोगाला उपलब्ध करून दिली असावी, ज्यामुळे दारोदार संपर्क करून नोंदणीचे काम झाले होते. आज तशी यंत्रणा बहुधा आयोगाकडे नसावी. त्यामुळे विशिष्ट अवधी जाहीर करणे आणि त्यानुसार विधानसभा मतदारसंघात काही ठिकाणी नोंदणीची सोय करणे, असे होताना दिसते आहे. असे असल्यामुळे आधीच अशा विषयांत बेताचा उत्साह असलेला मोठा वर्ग, विशेषत: तरुण नव-मतदार येत्या निवडणुकीत मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

आणखी एका गोष्टीमुळे नवमतदार नोंदणीत गतिहीनता आली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आधार कार्ड. सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत फोटो, नाव आणि पत्ता असे एकत्रित असलेले मतदार फोटो ओळखपत्र हे रेशन, गॅस, बँक, रेल्वे आरक्षण अशा विविध ठिकाणी वापरावे लागणारे ‘आयडेंटिटी प्रूफ’ होते. तसे वाहन चालवण्याचा परवाना वा पासपोर्ट जरी ग्राह्य धरला जात असला तरी या दोन्ही गोष्टी असण्याचे प्रमाण सर्वसाधारण मतदारांत अत्यल्प होते. आज आधार कार्डामुळे ती गरज संपून गेलीय आणि त्याचा थेट फटका मतदार नोंदणीच्या उत्साहाला बसलेला दिसतो.
आणखी एका गोष्टीचा संबंध नवमतदार नोंदणीच्या औदासीन्याशी संबंधित आहे आणि तो म्हणजे ‘राजकीय पक्ष’ नावाच्या रचनेत झपाट्याने झालेला बदल. सुमारे 20-25 वर्षांपूर्वीपर्यंत अनेक राजकीय पक्षांचे बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे चांगले जाळे असायचे. ती रचना पक्ष म्हणून काम करणारी होती. अनेकदा स्थानिक स्तरावर नवमतदारांची नोंदणी हे कार्यकर्ते उत्साहाने आणि आपणहून करायचे. आज पक्ष नावाची रचना त्या-त्या उमेदवाराभोवती, नेत्याभोवती फिरणारी झाली.

पक्ष म्हणून बांधिलकी मानणारा ‘कार्यकर्ता’ नावाचा प्राणी दिसेनासा झाला. ज्यांचा केडर-बेस्ड असा नावलौकिक होता, अशांचीही स्थिती थोड्याफार फरकाने तशीच झाली. याचाही एक अपरिहार्य परिणाम या नोंदणीवर होताना दिसतो आहे. नोंदणी इच्छुक नवमतदार आणि नोंदणी प्रक्रिया यांच्यादरम्यान ‘निवडणूक आयोगाची वेबसाइट’ हाच एकमेव आणि खात्रीशीर दुवा उरला आहे.


याबाबतीत शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या ‘लोक’ नावाच्या शब्दाभोवती आपल्या लोकशाहीचे अस्तित्व आहे, असले पाहिजे ते ‘लोक’ म्हणजे आपण सर्व. प्रचलित राजकारण, भ्रष्टाचार, हिंसाचार, शासकीय ढिलाई अशा गोष्टींवर अहमहमिकेने बोलणारा, ठाम मते व्यक्त करणारा सर्वसामान्य माणूस ‘राजकारणी’ आणि ‘राजकीय पक्ष’ यांच्यापासून मनाने दूर गेला आहे. सत्तेवर नसलेले आणि विरोधी पक्षात बसलेले लोकही त्याला ‘त्याचे’ वाटत नाहीत. त्यातून ‘लोक’ एकीकडे आणि ‘तंत्र’ एकीकडे, अशी उभे विभाजन झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्याच्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक असे दोघेही अशा एका तंत्राचे भाग आहेत, ज्याच्यापासून सामान्य नागरिक म्हणून तो अत्यंत दूर गेला आहे. त्या त्या पक्षांचे/ उमेदवारांचे फ्लोअर वोट आणि ऐन वेळी मतदानाला उद्युक्त झालेले काही लोक अशांच्या मतदानाने नेहमीच मतदानाचे प्रमाण जेमतेम 50 टक्क्यांच्या आसपास राहिले आहे. त्यातही शहरी आणि सुशिक्षित भागात ते त्याहूनही खाली घसरले आहे. काहीतरी ‘आऊट ऑफ द वे’ करण्यासाठी वा ‘आऊट ऑफ द टर्न’ पदरात पाडून घेण्यापुरताच लोक आणि राजकारणी असा संबंध येऊ लागला आहे. राजकारणाच्या अशा अवस्थेत घरात 18 वय पूर्ण केलेल्या मुलाला/ मुलीला मतदार म्हणून नोंदणी करण्याची धडपड, पायपीट करण्याचा त्याचा उत्साह मावळला आहे, असे वाटते.


वर उल्लेखलेल्या मुद्द्यांचा एकत्रित विचार करता आपण एक लोकशाही म्हणून एका धोक्याच्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत. सुजाण आणि जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार आहेत, कणा आहेत. राज्य करणा-याला वा तसे करण्यासाठी इच्छुक/उत्सुक असणा-याला एकच भाषा समजते आणि ती म्हणजे मतांची भाषा. ज्या ज्या वेळेला जागरूक मतदारांचा दबाव गट परिणामकारक राहिला तिथे तिथे मतदानाचा कौल बदलल्याची अगणित उदाहरणे आहेत. त्याउलट अनास्थेमुळे मतदान कमी होऊन भ्रष्ट उमेदवार विजयी झाले याचीही उदाहरणे आहेत. एक जागरूक मतदार म्हणून व सुजाण पालक म्हणून माझ्या घरातील सर्व नावे नोंदली आहेत ना? आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्वांनी मतदानाचे कर्तव्य बजावले ना? हे पाहणे आपले काम आहे आणि हे केले नाही तर परिस्थिती खालावण्याला आपण हातभार लावल्यासारखे होईल हेही गंभीरपणे लक्षात घेतले पाहिजे. याबाबतीत ‘हे राजकीय पक्षांचे काम आहे’ असा कंत्राट दिल्यासारखा दृष्टिकोन न ठेवता लोकसहभागातूनही मतदार नोंदणी कार्य अधिक गतिमान होऊ शकते. आपल्या घरातील मूल शाळेत जाऊ लागले की घरोघर एक उत्साहाचे वातावरण असते. अनेक महाविद्यालयांत नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत ‘फ्रेशर्स पार्टी’ने करण्याची प्रथा आहे. अनेक घरात मुलांनी ‘टीन’ वयात प्रवेश केल्यावरचा वाढदिवस विशेष साजरा करण्याची पद्धत आहे. अनेक घरांत व्रतबंध, विद्याव्रत संस्कार अशा प्रकारचे विद्यार्जनाशी जोडलेले कार्यक्रम करण्याची पद्धत आहे. आपले मूल 18 वर्षांचे झाल्यानंतर त्याला मतदाराचा अधिकार, लोकशाही वृत्तीचा संस्कार आणि नागरिकत्वाची जबाबदारी एकत्रितपणे प्रदान करण्याचा हा सोहळाही उत्साहाने घरोघर करण्याची गरज आहे.