आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महान उद्योजकांकडून प्रेरणा: लक्ष्य उपयुक्तता ; म्हणून थाई ली अमेरिकेत नंबर वन !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थाई ली, सीईओ आणि सहसंस्थापक, एसएचआय इंटरनॅशनल - Divya Marathi
थाई ली, सीईओ आणि सहसंस्थापक, एसएचआय इंटरनॅशनल
थाई ली यांची गणना अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली उद्योजिकांमध्ये होते. विक्रीच्या हिशेबाने त्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. २७ वर्षांपूर्वी त्यांनी स्वत: हा बिझनेस सुरू केला होता. १९८९ मध्ये १० लाख डॉलर्स गुंतवणूक करून कामाला सुरुवात केली. आज त्यांच्या आयटी कंपनीची विक्री ७.५ अब्जांपेक्षा अधिक आहे. यांच्या ग्राहकांमध्ये बोइंग आणि एटी अँड टीसारख्या कंपन्यांचा समावेश होतो. एसएचआयने एका सॉफ्टवेअर कंपनीसारखी सुरुवात केली होती. आज कंपनी हार्डवेेअरमध्येदेखील आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगचे कामही कंपनी करते. जगभरात कंपनीचे ३५०० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, हाँगकाँगमध्ये कंपनीची २५ पेक्षा अधिक कार्यालये आहेत.  

थाई ली यांचा जन्म थायलंडच्या बँकॉक येथे झाला. लहानपण कोरियामध्ये गेले. किशोरवयातच त्या शिक्षणासाठी अमेरिकेला आल्या. डबल बीए केले. जीवशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली. पदवी शिक्षणानंतर कोरियाला परतल्या. एका ऑटो पार्ट््स कंपनीत काम केले. त्यांना अमेरिकेला जाण्याची इच्छा होती. नोकरी करताना बचत केली आणि एमबीए करण्यासाठी पुन्हा अमेरिका गाठली. हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले. त्यानंतर प्रॉक्टर अँड गँबलमध्ये २ वर्षे नोकरी केली. अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये २ वर्षे नोकरी केली. त्यांचा बिझनेसकडे कल होता. त्यांनी मनाशी खुणगाठ बांधली होती. स्वत: त्यासाठी तयारीदेखील करत होत्या. १९८९ मध्ये लिआे कोगुन यांच्याशी विवाह केला. लिआे वकील होते. न्यूजर्सीतील एक स्ट्रगलिंग सॉफ्टवेअर कंपनी आपला बिझनेस विकू इच्छित होती. कंपनीचे ग्राहक कमी होते. त्यांनी १० लाख डॉलर्समध्ये कंपनी खरेदी केली. त्यांनी यासाठी बचतीतला पैसा वापरला. काही कर्ज घेतले. सॉफ्टवेअर हाऊस इंटरनॅशनल नावाची कंपनी स्थापन केली. त्यांचा विवाह काही टिकू शकला नाही. मात्र, व्यावसायिक भागीदारी कायम राहिली. आजही कोगून कंपनीचे ४०% चे भागीदार आहेत.  आणखी एक रंजक बाब म्हणजे त्यांनी बिझनेस करण्यापूर्वी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले नव्हते. आपण सॉफ्टवेअरचा बिझनेस करू, असेही त्यांना कधी वाटले नव्हते. पर्सनल कॉम्प्युटर्स तेव्हा फार दिसत नसत. नवे तंत्रज्ञान आणि साधने स्वीकारण्याची मानसिकताही नव्हती. त्यांनी मात्र उपकरणांच्या उपयुक्ततेविषयी अधिक सजगता दाखवली.  त्या स्वत: उपयुक्तता तपासून गॅजेट्स खरेदी करत. त्यांची ही वृत्ती बिझनेसमध्ये साहाय्यक ठरली.  
 
एसएचआयने सुरुवातीच्या काळात निर्माण केलेली उत्पादने तंत्रज्ञानाच्या आधारे नव्हती. कस्टमर सर्व्हिसला त्यात प्राधान्य होते. त्यांच्याकडे सुरुवातीला संशोधक नव्हते. पैसा कमी होता. बाजारात उपस्थिती नव्हती. मार्केटिंगची बाजू बळकट नव्हती. शिवाय प्रमोशनदेखील फारसे केले नव्हते. कंपनीला उपयुक्त कसे बनवावे याविषयी ली नेहमी विचार करत असत. त्यांनी कंपनीच्या स्टाफला सांगितले की ग्राहकांना खुश कसे करता येईल याचा विचार करा. नवा बिझनेस आणण्यासाठी सेल्फफोर्स होती. त्यांना ली यांनी सांगितले की, तुम्ही कंपनीचे अध्यक्ष आहात अशा रीतीने काम करा. त्यांची ही कार्यशैली उपयुक्त ठरली. स्टाफमधील प्रत्येक व्यक्तीला त्यामुळे नाविन्यपूर्णतेने काम करण्याची सवय झाली. प्रोत्साहन मिळू लागले. 
 
- १० लाख डॉलर्सच्या कंपनीला २७ वर्षांत ७.५ अब्जांवर पोहोचवले  
- जगभरात २५ पेक्षा अधिक कार्यालये  
- एकूण संपत्ती- १.६ अब्ज डॉलर्स  
- ३५०० पेक्षा अधिक कर्मचारी यांच्या कंपनीत कार्यरत
बातम्या आणखी आहेत...