मरियम यांच्यामुळेच नवाझ शरीफ हे जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या लष्करी राजवटीतून तुरुंगाबाहेर येऊ शकले. त्यावेळी मरियम यांचा फोन घेण्यास पाकिस्तानमध्ये कोणीही तयार नव्हते. तेव्हा मरियम यांनी सौदी अरेबियाच्या राजांशी चर्चा केली. त्यांनी मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली आणि अखेर शरीफ कुटुंबीयांना सौदीत निर्वासितांचे आयुष्य जगण्याची मंजुरी मिळाली. शरीफ कुटुंबीय २००७ मध्ये पाकमध्ये येऊ शकले. पाकमध्ये तीन वेळा निवडणुकीद्वारे सत्तेत येणारे शरीफ हे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लोक मरियम यांच्या हिमतीला दाद देतात.
शरीफ भलेही शक्तिशाली असोत आणि शरीफ कुटुंबीय प्रतिष्ठित असो, पण मरियम यांचा मार्ग सोपा नव्हता. मग तो वैद्यकीय प्रवेशाचा मुद्दा असो की, पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान युवक कार्यक्रम असो किंवा मग लंडनमध्ये फ्लॅट घेणे असो, सर्व बाबी त्यांच्या हातातून निसटल्या. शरीफ यांनी मरियम यांना एडवर्ड वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला. मुलगी डॉक्टर होईल, असा त्यांचा विचार होता. पण वादामुळे मरियम यांना तेथून काढावे लागले आणि इंग्रजी साहित्यात एम. ए. करावे लागले. वडील पंतप्रधान झाल्यानंतर त्या युवक कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. अखेर लाहोर उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर मरियम यांना ते पदही सोडावे लागले. आता पनामा गेट प्रकरण समोर आहे.
जगातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असलेल्या लंडन मेफेअरमध्ये मरियम यांचे चार फ्लॅट होते, अशी कबुली नवाझ यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. मनी लाँड्रिंग झाली, असे मानले जात आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
जन्म - २८ ऑक्टोबर १९७३.
वडील - नवाझ शरीफ, आई : कुलसुम, दोन भाऊ, एक बहीण : अस्मां.
शिक्षण- लाहोरच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण, पंजाब विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी.
कुटुंबीय- पती सफदर अवान, मुलगा जुनैद, दोन मुली मेहरू, महनूर
चर्चेत का?- पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात पनामा लीक प्रकरणी त्यांच्या विरोधातील सुनावणी पूर्ण, लोकांना निकालाची प्रतीक्षा.