आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकारावरील औषधे ९० टक्क्यांपर्यंत स्वस्त, संसर्गजन्य आजारांवरील औषधे महागच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्यावर्षभरात देशात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजारांवरील बहुतांश जीवरक्षक औषधांच्या किमतीत मोठी घट झाली आहे. मात्र, क्षयरोग (टीबी), मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांच्या औषधांच्या किमती घटल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर आगामी काळातही तशी शक्यता नाही. या आजारांवरील औषध तयार करण्यात बहुतांश कंपन्या पैसा गुंतवण्यास तयार नाहीत, हे त्यामागचे कारण आहे. विशेष म्हणजे संबंधित आजारांनी आजही अनेकांना जीव गमवावा लागत आहे. संसर्गजन्य आजार नियंत्रणावर काम करणारी फ्रान्सची संस्था ग्लोबल हेल्थ अॅडव्होकेटचे प्रमुख डॉ. बॉबी जॉन म्हणाले, गेल्या आठ वर्षांत टीबी आणि मलेरियासारख्या आजारांवरील उपचार पद्धती फारशी बदलली नाही. या आजारांवरील औषधांच्या संशोधनासाठी बहुतांश कंपन्या पैसा गुंतवण्यास तयार नाहीत हे वास्तव आहे. त्यातून तेवढा फायदा मिळत नाही. संबंधित औषधांसाठी सरकारी संस्थाच प्रयत्नशील अाहेत. परिणामी, येत्या दहा वर्षांमध्येही या औषधांच्या किमती कमी होणार नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कार्यरत औषध नियंत्रण महासंचालक (डीसीजीआय) डॉ. जी. के. सिंह यांचा या विषयाशी संबंध येतो. ते म्हणाले, आमच्या विभागात नव्या औषधासाठी येणारे बहुतांश अर्ज कॅन्सर आणि मधुमेहाशी संबंधित आहेत. टीबी आणि मलेरियासारख्या आजारांसाठी संपूर्ण वर्षभरात एक किंवा दोन अर्ज येतात. इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) किंवा अन्य सरकारी कंपन्या जगातील अन्य देशांसोबत टीबी-मलेरियावरील औषध आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
या औषधांवरील नफा नगण्य असल्यामुळे खासगी कंपन्या गुंतवणुकीस धजावत नाहीत. आमचा विभाग टीबी- मलेरियाच्या नव्या औषधांसाठी अर्ज आल्यास त्याला तत्काळ मंजुरी देण्यास तत्पर असतो, असे सिंह यांनी सांगितले. याप्रकरणी ग्लोबल हेल्थ स्ट्रेटर्जीचे (जीएचएस) प्रकल्प व्यवस्थापक अल्तमश हाशमी म्हणाले, भारतात अद्यापही संसर्गजन्य आजारामुळे हजारोंचे बळी जात आहेत. मात्र, त्याच्या औषधांच्या किमतीत फारसा फरक नाही. या औषधांच्या सध्याच्या किमती खूप कमी आहेत, हेही एक कारण त्यामागे आहे. याशिवाय नवे औषध येत नसल्यामुळे किंमत बदलण्याची शक्यताही धूसर आहे.
कॅन्सरवरीलजुने औषध स्वस्त, मात्र मिळताना अडचणी : राजीवगांधी कॅन्सर रुग्णालयामध्ये ओंकोलॉजी विभागाचे सीनियर कन्सल्टंट डॉ. विनीत तलवार म्हणाले, कॅन्सर उपचारावरील खर्च घटला आहे. औषध कंपन्यांमधील स्पर्धेमुळे औषधे स्वस्त झाली आहेत. याचा थेट फायदा रुग्णांना मिळत आहे. मात्र, त्याचबरोबर कॅन्सरवरील नवीन औषधी भारतातील रुग्णांना मिळण्यात अडचणी येत आहेत.