आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झुकझुक झुकझुक प्रभूंची स्वारी (दिल्ली वार्तापत्र)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राथमिक गरजांकडे डोळेझाक करून रेल्वे विद्यापीठाचे स्वप्न पाहणारे सुरेश प्रभू यांची सुपरफास्ट एक्स्प्रेस केव्हाच रुळावरून घसरली आहे. प्रभू जर पावला नाही तर त्याची िनंदा करण्याची भारतीयांची मानसिकता आहे. सुरेश प्रभूंबाबत हे होण्याची शक्यता बळावली आहे.

‘रेल्वेच्या नवीन प्रकल्पांसाठी भूमी अधिग्रहणाचे िवघ्न असते. त्यामुळे सध्याच्या क्षमतेमध्येच येत्या पाच वर्षांत आम्ही रेल्वेचा कायापालट करू. दुहेरी, तिहेरी व चौपदरीही रेल्वेरुळांचा विस्तार करू, रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर देऊ, धीम्या गतीच्या रेल्वे जलदगती करू, भारतीयांचा प्रवास सुखाचा करू, कमी वेळेत गावाला पोहोचवू, रेल्वेमध्ये सुरक्षा आणि न भुतो न भविष्यती अशी स्वच्छता ठेवू, उत्तम पद्धतीची शौचालये डब्यांमध्ये देऊ. त्यामुळे रेल्वे डब्यात नैसर्गिक विधीसाठी जाताना नाकावर रुमाल ठेवून जावे लागणार नाही किंवा शौचालयाचा अवतार पाहून जागेवर परत यावे लागणार नाही. खाद्य पदार्थ सात्त्विक मिळतील याचीही काळजी घेऊ. सध्या आहे त्याच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करू. म्हणजे वेळही कमी लागेल आणि कमी खर्चामध्ये सुंदर बदल घडवून आणता येईल. काँग्रेसच्या काळात गाड्या विलंबाने धावायच्या, आता त्या वेळेवरच धावतील. मालगाड्यांचे वेळापत्रक कोसळले आहे. त्यात काटेकोरपणा आणू.’ दि. २६ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सुपरफास्ट सुधारणा तथा घोषणा एक्स्प्रेस लोकसभेत थांबण्याचे नावही घेत नव्हती. शिवसेनेचे संस्कार झाले असले, तरी भाजपमध्ये संधी मिळते काय यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे प्रभू हे उद्धव ठाकरेंना थांगपत्ताही लागू न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू बनले. शिवसेनला वाकुल्या दाखवत प्रभूंची स्वारी पूर्ण शक्तिनिशी रेल्वेवर आरूढ झाली आणि जेवढे सैरभैर पळता येईल तेवढे पळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संग लाभलेले सुरेश प्रभूही रेल्वे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तुफान गतीने नवे स्वप्न रंगवत होते, परंतु आपले बोलणे हे फेकण्यासारखेच आहे याचा त्यांना लगेच साक्षात्कारही झाला. एक सज्जन व्यक्ती म्हणून नाव कमावलेल्या सुरेश प्रभूंना खऱ्या ‘प्रभू’ची म्हणजे देवाची आठवण झाली. क्षणातच ते लोकसभेत छताकडे पाहत (त्यांना आकाशात असलेल्या प्रभूकडे कटाक्ष टाकायचा होता) म्हणाले, हे प्रभू, मी हे सगळे बोलून तर गेलो, परंतु हे होणार कसे? सुरेश प्रभूंनी खऱ्या प्रभूला प्रश्न केल्यानंतर लगेच त्यांच्या लक्षात आले की ही एक अंधश्रद्धा आहे. प्रभू काही कोणाच्या प्रश्नाला असे उत्तर देत बसत नसतात. आता आपण स्वत:च प्रभू आहोत आणि जे याआधी कोणीही करून दाखवले नाही ते करून दाखवू! त्यांच्या मुखातून ज्या गोष्टी करण्याचे आश्वासन दिले जात होते त्यामागचे कारण आणि त्यांच्यात असलेला प्रचंड आत्मविश्वास त्यांनी सदनापुढे मांडला. अडचणीत सापडले की महात्मा गांधींना मध्ये उतरवायचे ही सवय काँग्रेसवाल्यांची आहे, परंतु काँग्रेसकडून मोदींनी सरकार हिसकावून घेतले. त्यासोबतच महात्मा गांधींनाही बळजबरीने आपल्या तंबूत आणले. आपल्या घरातील महात्मा गांधी केव्हा हरवलेत हे काँग्रेसच्या नेत्यांना कळलेही नाही. अत्यंत चतुर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींचा खुबीने वापर केला आणि आपल्या शिष्यांनाही ‘गांधी कसा वापरावा?’ याचे प्रशिक्षण दिले. अन्य मंत्र्यांनी मोदींची ही बाब किती मनावर घेतली हा विषय संशोधनाचा असला, तरी परपक्षातून आयात केलेले सुरेश प्रभू "महात्मा गांधी की जय' हे म्हणायला विसरले नाहीत. ते मोदींचे पहिले आज्ञाधारक मंत्री ठरलेत. गांधीजी भारतात आले त्यास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि या शताब्दी वर्षानिमित्त रेल्वेकडून देशाला सुंदर भेट मिळायला पाहिजे या विश्वासाने काम करत या विभागात बदल घडवून आणायचा असल्याचे त्यांनी सदनाला सांगितले. जुनी स्थिती अत्यंत वाईट असली तरी परिस्थिती बदलू शकते. त्यावर मार्ग शोधले जाऊ शकतात. एवढा मोठा देश आहे, एवढे मोठे रेल्वेचे जाळे आहे, साधनसंपती आहे, मनुष्यबळ आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे अत्यंत प्रभावशाली राजकीय बळ असताना रेल्वेचा पुनर्जन्म होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरेश प्रभू यांनी रेल्वेचा अर्थसंकल्प मांडायला आज तीन महिने पूर्ण झालेत, तर ते रेल्वेमंत्री होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. प्रभूंकडे रेल्वेचे मंत्रिपद येण्याची चर्चा सुरू झाली तेव्हाच हा देवमाणूस नक्कीच रेल्वेमध्ये चमत्कार करेल, असे वाटत होते. सामान्य नागरिकांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या. आता या विभागात आधीसारखा गोंधळ होणार नाही, अशी खात्री बाळगून देशभरातील खासदार ‘हे प्रभू आमच्या मतदारसंघात वर्षानुवर्षे रखडलेला प्रकल्प मार्गी लावून द्या’ म्हणून विनंती करायला लागले. सुरुवातीला होयबा म्हणून मान हलवणारे प्रभू हे केवळ मानच हलवत राहतात. त्याचे पुढे काहीही होत नाही, याचा प्रत्यय लोकप्रतिनिधींना येवू लागला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात खासदार जेव्हा प्रश्न विचारायला लागले, तेव्हा प्रभुंच्या उत्तरामुळे अनेकांचे डोळे पांढरे व्हायला लागले. पैसेच नाहीत, तर करायचे कुठून, असे उत्तर मिळायला लागले.

रेल्वे मंत्रालयाकडून अनेक वर्षांपासून मंजूर झालेले आणि राज्य सरकारच्या सहभागातून पूर्णत्वास येणारे राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्प निधी नसल्याने रखडले आहेत. अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वडसा-गडचिरोली, वर्धा – यवतमाळ- नांदेड आदी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून मंजुरी मिळाली आहे. सुरेश प्रभू महाराष्ट्रातील रखडलेले रेल्वेचे प्रकल्प मार्गी लावतील अशी अपेक्षा होती. १०६ कि.मी. नागपूर- नागभीड, ३३९ कि.मी. मनमाड- इंदोर, २६६ कि.मी. पुणे-नाशिक, ११२ कि.मी. कराड – चिपळूण, ७० कि.मी. गडचांदूर – आदिलाबाद या मार्गांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या प्रकल्पांना २०१५-१६च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे, परंतु केंद्र सरकारकडे निधी नसल्याचे सांगत रेल्वेने या प्रकल्पाचे काम या वर्षी थांबवून ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सामान्य लोकांना रेल्वेकडून प्राथमिकतेने काय देता येईल याकडे प्रभू दुर्लक्ष करत सुटाबुटातले राजकारण करू पाहत आहेत. ज्या गोष्टी सामान्य लोकांच्या आकलनापलीकडच्या आहेत, त्यावर ते भर देण्याचा प्रयत्न करत आहेत. वांद्रे टर्मिनसला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आल्यास मला त्याचे नामकरण करायला आवडेल अशा प्रतिक्रिया देऊन ते शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा की शिवसेनेकडून अशा प्रकारची कोणतीही मागणी झाली नाही. या विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रेल्वेने गेल्या सहा महिन्यांत काोणती कामे केली हे सांगण्यापेक्षा आम्ही काय काय करणार आहोत याबाबत सुरेश प्रभू माध्यमांना बोलावून सांगत सुटले आहेत. रेल्वेमध्ये आयआरसीटीसीच्या माध्यमातून जेवण दिले जाते. अनेक प्रवाशांनी या जेवणातून किडे-अळ्या दाखवल्या, रेल्वेमंत्र्यांकडे तक्रारीही झाल्यात; त्यात सुधारणा तर झाल्या नाहीतच, परंतु प्रवाशांना घाम फोडणारे जेवणाचे दर तिकिटीवर लिहिण्याचे सौजन्य प्रभूंनी दाखवले आहे.

दिल्लीच्या रेल्वेस्थानकावर सॅमसंगचे अनेक एलसीडी लावण्यात आले आहेत. त्यावर रेल्वेचे वेळापत्रक दाखवायचे असते. ज्या फलाटावर जी गाडी येणार असते तिचे नावच या पडद्यावरून गायब झालेले असते आणि अन्य गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये ‘गाडी विलंबसे चल रही है’ अशी लांबलचक यादी असते. याचाच अर्थ प्रभू गाडीच्या वेळापत्रकाबाबतही चमत्कार दाखवू शकले नाहीत. ३९ घोषणा केल्या, त्यातील ३६ पूर्ण केल्याचा ते डांगोरा पिटतात, त्या या देशातील नागरिकांना अद्याप दिसल्या नाहीत, परंतु त्यांच्याच रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात मंत्र्यांना लुटले जाते, ही बाब ते नजरेआड करीत आहेत. रेल्वे डब्यांमधील शौचालये सुंदर बनतील तेव्हा बनतील, परंतु ती स्वच्छ असू नयेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये नवे बदल घडवून आणू, असे सांगणारी सुरेश प्रभुंची रेल्वे अद्यापही घाणच असेल तर ते मंत्र्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवणारे आहे. प्राथमिक गरजांकडे डाेळेझाक करून रेल्वे विद्यापीठाचे स्वप्न पाहणारे सुरेश प्रभू यांची सुपरफास्ट एक्स्प्रेस केव्हाच रुळावरून घसरली आहे. प्रभू जर पावला नाही, तर त्याची निंदा करण्याची भारतीयांची मानसिकता आहे. सुरेश प्रभूंच्या बाबत हे होण्याची शक्यता बळावली आहे.
बातम्या आणखी आहेत...