आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई वार्तापत्र : पोटनिवडणुकीच्या पोटात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकणच्या जनमानसात प्रचंड नाराजी असतानाही राणे विरुद्ध शिवसेना या सामन्यात राणेंनी मुलाला विधानसभेत निवडून आणले. त्यामुळे राणे संपले असा निष्कर्ष काढणे किंवा त्यांना निवृत्तीचा सल्ला देणे घाईचे ठरेल. राणे हे लढवय्ये असल्याने ते स्वस्थ बसतील वा निवृत्ती स्वीकारतील, ही शक्यता दिसत नाही.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील अाणि शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक गेल्या आठवड्यात पार पडली आणि या आठवड्यात त्याचा निकाल आला. दोन्ही निकाल अपेक्षितच लागले. दोन्ही विजयी उमेदवार हे निधन झालेल्या उमेदवारांच्या पत्नी असल्याने त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा लाभ मिळाला. या लाटेमुळे आपल्या पतीपेक्षाही अधिक मताधिक्याने सुमनताई पाटील आणि तृप्ती सावंत या निवडून आल्या. दु:खात काही सुख शोधावे, तसे विधानसभेत महिलांचा टक्काही वाढला.

भारतीय जनमानस भावनिक आणि सहानुभूतीच्या लाटेला अधिक महत्त्व देते, हे जगजाहीर आहे. एकीकडे राजकारण व राजकीय नेते यांच्याबद्दल कमालीची कटुता निर्माण होत असताना दुसरीकडे चांगले काम करणा-या नेत्याने आपल्यासाठी घेतलेले कष्ट आणि केलेली विकासकामे यांची जाण ठेवून त्या उपकाराची परतफेड करण्याची कृतज्ञता बाळगतो, हे चित्रही सुखावह आहे. गेल्या वर्षी एिप्रलमध्ये लोकसभा निवडणूक झाली तेव्हा त्यासोबत राज्य विधानसभेच्या एका जागेची पोटनिवडणूकही झाली. लोकसभेत राज्यात सर्वत्र काँग्रेसचा धुव्वा उडाला असताना बुलडाणा जिल्ह्यातील या मतदारसंघात दिवंगत आमदार सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. या विधानसभा मतदारसंघातील लोकांनी लोकसभेसाठी मात्र भाजप-सेनेच्या उमेदवाराला पसंती दिली. सहानुभूतीच्या लाटेचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी याहून वेगळे उदाहरण नाही. या लाटेसमोर तेव्हा मोदी लाटही फिकी पडली.

फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आजवर तीन विद्यमान आमदारांचे निधन झाले. नांदेड जिल्ह्यातील गोविंद राठोड, आर. आर. पाटील आणि बाळा सावंत. यापैकी पाटील आणि राठोड यांच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीची फारशी चर्चा झाली नाही. कारण तेथे कुणी दिग्गज नेता रिंगणात नव्हता. मात्र, वांद्रे याला अपवाद ठरले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आक्रमक नेते नारायण राणे हे स्वत: या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची व लक्षवेधी ठरली. वाघाला त्याच्या गुहेत जाऊन ललकारण्याची जोखीम राणेंनी पत्करली, तेव्हाच अनेकांनी त्यांच्या राजकीय शहाणपणावर शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, बेधडक आणि बेदरकार वृत्तीच्या राणेंनी ही जोखीम फार विचारपूर्वक घेतली होती. काँग्रेस पक्षाने प्रस्ताव दिल्याने आपण रिंगणात उतरल्याचे राणे दर्शवित असले तरी प्रत्यक्षात या जागेवर लढण्याची इच्छा त्यांनीच व्यक्त केली होती. या मतदारसंघातील ८४ हजार मुस्लिम मतदार, कोकणातील रहिवासी, शासकीय कर्मचारी यांच्यावर त्यांची भिस्त होती. राणेंसारखा आक्रमक, प्रशासनाच्या खाचाखोचा माहीत असलेला नेता विरोधी बाकावर असणे ही खरे तर सरकारसाठी डोकेदुखी ठरली असती. राज्याचे मुख्यमंत्रिपद, महसूलमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविल्याने वरिष्ठ सनदी अधिकारी ते कनिष्ठ अधिकारी यांच्यात त्यांची समांतर गुप्तचर यंत्रणाच कार्यरत आहे. त्यामुळेच ते विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सरकारची एक श्वेतपत्रिका येण्याआधी त्या पत्रिकेत काय आहे, याची माहिती मिळवून त्याचे खंडन करणारी पुस्तिका रातोरात तयार करून ही पत्रिका सादर होताच काळी पत्रिका वाटली होती. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय निर्विवाद असला तरी काँग्रेसलाही या निकालाने काही सकारात्मक संकेत दिले आहेत. काँग्रेसची कोअर मतपेढी असलेल्या मुस्लिम मतांना गेल्या वेळेस एमआयएम या नवख्या पक्षाने सुरुंग लावला होता. राज्यभरात मुस्लिम जनाधार एमआयएमकडे सरकल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली होती. वांद्रे निवडणुकीत हा मतदार काही प्रमाणात का होईना पुन्हा काँग्रेसकडे वळला. एमआयएमबद्दल मुस्लिमांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे, याचे हे संकेत आहेत. राणे मैदानात उतरले नसते तर २०१४ मध्ये केवळ १२ हजार मते मिळवू शकलेल्या काँग्रेसला १२ हजार मतेही मिळाली असती की नाही, याची खात्री देणे कठीण आहे. याउलट राणेंनी ताकद लावल्याने काँग्रेसचे मत तब्बल २१ हजारांनी वाढले. सत्तेत असलेल्या पक्षाविरुद्ध अवघ्या सहा महिन्यांत ३३ हजारांनी मतदान करणे हा सरकारसाठीही चिंतनाचा विषय व्हायला हवा. शिवसेनेची ताकद, मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग या मतदारसंघात राहत असतानाही ६० टक्के मतदारांना मतासाठी बाहेर काढण्यात सेना-भाजप अपयशी ठरली. राणेंना हरवायचेच या त्वेषाने शिवसैनिक या विजयासाठी जबाबदारी सांभाळणारे अनिल परब यांनी जिवाचे रान केले होते. भाजप-सेनेचे सरकार असताना येथे पराभव झाला असता तर सरकारची अब्रू गेली असती. भाजप-सेना एकत्र आल्याने हा विजय मिळाला. राणेंनी उद्धव ठाकरेंसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले. त्यामुळे सेनेला मुंबईतील कोकणातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेते यांना मैदानात उतरवावे लागले. परबांच्या नियोजनाने सेनेची अब्रू वाचली असली, तरी पराभवाची शक्यता समोर दिसत असतानाही लढून आपल्या पक्षाकडे २१ हजार अधिक मते खेचून आणणा-या राणेंनाही सलाम करायलाच हवा. राणे यांच्या राजकीय कारकीर्दीवर हिंसाचार, खून यांचे कलंक लागले आहेत. गुंडगिरी, दहशत यामुळे त्यांच्याविरुद्ध कोकणच्या जनमानसात प्रचंड नाराजी आहे. तरीही राणे विरुद्ध शिवसेना या सामन्यात राणेंनी आपल्या मुलाला विधानसभेत निवडून आणले. त्यामुळे राणे संपले, असा निष्कर्ष काढणे किंवा त्यांना निवृत्तीचा सल्ला देणे घाईघाईचे ठरेल. राणे हे लढवय्ये वृत्तीचे असल्याने ते स्वस्थ बसतील वा निवृत्ती स्वीकारतील, ही शक्यता दिसत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर गलितगात्र झालेल्या काँग्रेसला या कामगिरीने नवे बळ, नवा अात्मविश्वास दिला आहे. एकेकाळी अशोक चव्हाण आणि राणे यांच्यात घनघोर संघर्ष झाला. मात्र, आता हे दोन्ही नेते वांद्रे निवडणुकीच्या निमित्ताने जवळ आलेत. काँग्रेसचे सर्व गट एकत्र आले तरी एक मोठी ताकद ते उभारू शकतात. याचा लाभ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसला होऊ शकतो. मुंबईचा विकास आराखडा भाजप-सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने तयार केला असून त्यावरून जनतेच्या सर्व गटात नाराजी आहे. भाजप-सेनेत या निवडणुकीच्या वेळेस अंतर्गत भांडणे होण्याची शक्यता असून त्याचा लाभ काँग्रेसला काही प्रमाणात मिळू शकतो.
बातम्या आणखी आहेत...