आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनजीओंचा कंपनी चेहरा : 10 वर्षे, 25 हजार कंपन्या, अब्जावधी निधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक्स्चेंजर या बहुराष्ट्रीय कंपनीचे एमडी राहिलेले सुदेश राघवन आणि मेटलाइफ इन्शुरन्सचे माजी सीएफओ जॉयदीप मुखर्जींसारखे अनेक लोक गुंतवणूकदारांच्या त्या यादीत आहेत, जे स्वत:च्या बळावर समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काही वारंवार निधीची गरज भासणारी एनजीओ चालवत नाहीत तर समाजसेवेसाठी कंपन्या चालवत असलेल्या तरुणांवर गुंतवणुकीच्या रूपाने विश्वास टाकत आहेत. सोशल बिझनेसच्या या नवीन क्षेत्रात एक दशकात उलाढाल, सेवा आणि बदलाच्या अनेक यशकथा रचल्या आहेत.

बंगळुरूमधील दैनंदिन कचर्‍याचे उदाहरण. इंडस्ट्रियल डिझायनर पूनमबीर कस्तुरी यांनी चार सहकार्‍यांसोबत सुरुवात केली होती. घरातून निघणारा जैविक कचरा गोळा करण्याची मोहीम. त्यांनी खास पद्धतीच्या थ्री टियर कुंड्या तयार केल्या. लोकांना समजावून सांगितले. मग शहरात विक्री केली. पहिल्या वर्षी झाला दोन लाखांचा व्यवसाय. सहा वर्षांनंतर डेली डम्प पीबीके वेस्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचा एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. वार्षिक उलाढाल 48 लाख रुपये. कचरा व्यवस्थापनात साह्यभूत 15 घरगुती उत्पादने 15 हजार घरांत पोहोचली. दररोज 10 हजार किलो कचर्‍याचे व्यवस्थापन. आकर्षक वेबसाइट. ऑनलाइन बुकिंग!

डेली-डम्पच्या टीमने असे काही केले की जे एनजीओसारखे काम असूनही एकदम वेगळे होते. ते शहरातील समस्या घेऊन ठोस बिझनेस प्लॅनसह 10 लाख रुपयांच्या प्रारंभिक भांडवलाच्या बळावर बाजारात उतरले. धाटणीपलीकडचे प्रयोग केले. कचर्‍याची समस्या सुटली. कुंड्यांच्या विक्रीमुळे गावातील कुंभारांची कमाईही वाढली. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या अंकुर कॅपिटलने त्यांचे काम पाहिले आणि 50 लाख रुपये डेली-डम्पमध्ये टाकले. त्यामुळे कामात गती आली. यासारख्या सोशल बिझनेस ब्रँडचे यश राघवन आणि मुखर्जींसारख्या गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवणारे ठरले. त्यामुळे ते पिशव्या उघडून बसले आहेत. ‘आमच्याकडे 35 कोटी रुपये क्षमतेचे 15 गुंतवणूकदार आहेत. हे दान नाही तर गुंतवणूक आहे,’ असे अंकुर कॅपिटलच्या बिझनेस हेड ऋतू वर्मा सांगतात.

एका अंदाजानुसार, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, कृषी सल्ला, किरकोळ बाजार आणि घनकचरा व्यवस्थापनात सुमारे 25 हजार सोशल बिझनेस कंपन्या सक्रिय आहेत. कॉर्पोरेट जगात उच्च पदावर कार्यरत असलेले किंवा निवृत्त झालेले अधिकारी त्यांचे गुंतवणूकदार आहेत. त्यांना नफ्याची चिंता नाही. ते सामाजिक-आर्थिक परिवर्तनामध्ये उत्कृष्ट भूमिका बजावणार्‍या संघटना अथवा कंपन्यांवर डाव लावायला तयार आहेत. गुंतवणूकदारांचे हे नेटवर्क झपाट्याने वाढत चालले आहे. मूळ कर्नाटकच्या ‘इनोव्हेंट’ ग्रुपमध्ये 4500 गुंतवणूकदार सदस्य आहेत. गुंतवणुकीसाठी कोणाला कधी आणि कोणती कंपनी आवडेल, हे कुणालाच माहीत नाही. अनेक परदेशी कंपन्याही या रांगेत आहेत. मुंबईवर्षभरापूर्वी अमेरिकेतील एलियोस फाउंडेशनने 25 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी हैदराबादमधील सुदीक्षा नॉलेज सोल्युशन लि. निवडले. सुदीक्षाने गरीब झोपडपट्टय़ांमध्ये तीन वर्षांच्या मुलांसाठी अशा शाळा उघडल्या, ज्या कमी उत्पन्न असलेल्या वर्गाला परवडेल अशा शुल्कात उत्कृष्ट शिक्षण देतील. 2010 मध्ये सुदीक्षाची सुरुवात केली भोपाळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट (आयआयएफएम)मध्ये पदव्युत्तर झालेले नवीन कुमार आणि निमिशा मित्तल यांनी. एलियोस फाउंडेशनला सुदीक्षाचा अहवाल इनोव्हेंटकडून मिळाला. ग्राउंड रिपोर्ट, पब्लिप फीडबॅक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर गुंतवणुकीचा निर्णय झाला. त्यानंतर सुदीक्षाच्या शाळांची संख्या वाढून 18 वर पोहोचली. इनोव्हेंटचे संचालक दिग्विजय शुक्ला म्हणाले की, या विस्तारामुळे इतर गुंतवणूकदार आकर्षित होतील. भविष्यात जास्त भांडवल लागेल. परताव्यांबाबत सध्या तरी सगळे अनिश्चित आहे.

एखादा गुंतवणूकदार परदेशात असणे फार आश्चर्यकारक गोष्ट नाही. मात्र, एखाद्या यशस्वी विदेशी कंपनीने उत्कृष्ट सेवांसाठी भारतात पाय पसरणे ही मोठी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाची ‘बेयरफूट पॉवर’ही सौर दिवे आणि मोबाइल चार्जर बनवणारी कंपनी आहे. ऊर्जेच्या संकटाला तोंड देणार्‍या दक्षिण अफ्रिकेतील देशांमध्ये या कंपनीचा मोठा विस्तार आहे. इनोव्हेंटच्या उपक्रमात 2010 मध्ये एका बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशनमध्ये उतरलेल्या शंभर देशी-विदेशी कंपन्यांमध्ये बेयरफूट कंपनीची निवड झाली. तिला भारतात काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. उत्कृष्ट दर्जाच्या सौर उत्पादनांसाठी अडीच कोटींची गुंतवणूक मिळताच बेयरफूटने कर्नाटकपासून सुरुवात केली. सध्या ती तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात वितरकांच्या शोधात आहे. गुंतवणूकदारांच्या मते, स्वस्त आणि टिकाऊ सौर उत्पादनांमुळे विजेचे संकट झेलणार्‍या घरांमध्ये प्रकाश पसरवला, हे कंपनीचे सामाजिक कार्य आहे.

सेंद्रिय कापसाचे टी-शर्ट
सामाजिक परिवर्तन आणि सेवा करण्याच्या भावनेसोबत व्यवसायाची पात्रता असलेल्या तरुणांना या टी-शर्टची भुरळ पडली. व्यापक स्वरूपात प्रभाव पडेल, असे काही त्यांना करायचे होते. ‘आय वियर मी’चेच उदाहरण घ्या. 2011 मध्ये सेंद्रिय कापसापासून कपडे बनवणार्‍या या कंपनीने गेल्या वर्षी 1500 टी-शर्ट विकले. यावर्षी पाच हजार टी-शर्टचे ध्येय समोर ठेवत कंपनीने शॉप फॉर चेंजसोबत करार केला आहे. ऑनलाइन विक्रीसह मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि गंगटोकमध्ये तिचे आउटलेट येणार आहेत. कंपनीचे सर्वेसर्वा अश्विन पालकर यांनी सांगितले की, ‘एकट्या अकोल्यात 2400 शेतकर्‍यांनी सेंद्रिय कापसाची शेती सुरू केली आहे. रासायनिक कापसाच्या तुलनेत सेंद्रिय कापसासाठी अर्धेच भांडवल लागते. फायदा तिपटीपेक्षाही जास्त. गुंतवणूकदारांनी शेतकर्‍यांच्या दृष्टीने आमच्या उपक्रमाची दखल घ्यावी, अशी आमची इच्छा आहे.’

पारंपरिक एनजीओसाठी हा बदल निराशादायक आहे. कारण जास्तीत जास्त गुंतवणूकदार या संस्थांमध्ये फार रस घेत नाहीत. 1982 पासून भिल-भिलाला आदिवासी महिलांच्या सबलीकरणासाठी काम करणार्‍या मध्य प्रदेशातील ढास ग्रामीण विकास केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या सुभद्रा खापर्डे सांगतात, ‘आम्ही कधी नफ्याचा विचारच केला नाही. अलिजापूरमधील ज्या गावात शाळा, रुग्णालये आणि रस्ते नाहीत, अशा 40 गावांत आम्ही काम करत आहोत. ही गावे सेवांचा मोबदलाही देऊ शकत नाहीत. सर्मथ गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीतील एका भागासाठी तरी आमच्या कामाचा विचार करायला हवा.’

एनजीओ आणि गुंतवणूकदारांदरम्यान दुरावासुद्धा आहे. एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, बहुतांश एनजीओंना हे माहीत नसते की, गुंतवणूकदार परिणामकारक सामाजिक बदल पाहूनच पाऊल उचलतात. दसरा फाउंडेशनचे संचालक मानस राठा यांच्या मते, एनजीओंना वर्षानुवर्षे केलेल्या कामाचे मार्केटिंग करण्याची पद्धत शिकून घेणे आवश्यक आहे. अनेक गुंतवणूकदार असे आहेत, ज्यांनी सोशल बिझनेस कंपन्यांसोबत एनजीओलाही निधी दिला आहे. मात्र, कर्तव्यदक्षपणे काम करणार्‍या या संस्थांना आता व्यावसायिक होण्याची गरज आहे.

फरक काय?
एनजीओ, सुमारे 30 लाख सरकारी किंवा बिनसरकारी अनुदानावर विसंबून. वारंवार निधीची गरज. कोणतेही बिझनेस मॉडेल नाही. उत्पादनाची कोणतीच प्रक्रिया नाही. मोफत सेवेचा मूलमंत्र. एका अहवालानुसार 99 टक्के एनजीओचे कामकाज समाधानकारक नाही.

सोशल बिझनेस, सुमारे 25 हजार कंपन्या पूर्णत: बिझनेस मॉडेलच्या आधारावर संचालित कंपन्या. वारंवार निधीची गरज नाही. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर जम बसवणे आणि विस्ताराची क्षमता. प्रभावी परिणाम. चांगल्या सेवा मोफत नव्हे तर परवडतील अशा द्या, हा मूलमंत्र.