आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilima Gundi Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

‘मी मराठीचा.. मराठी माझी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रमाण मराठी आणि तिचे सार्वजनिक रूप यांच्यात सध्या खूप तफावत आढळून येते. आपल्या गावात फेरफटका मारला की, या संदर्भातले वास्तव चित्र समोर येते. रस्त्यावरच्या दुकानांच्या पाट्यांकडे आणि जाहिरातींकडे नजर टाकली तरी आज सार्वजनिक क्षेत्रात मराठी किती अंग चोरून वावरत आहे, याचा अनुभव येतो.

‘शर्टिंग, सुटिंग व रेडिमेड फ्रेश स्टॉकवर फ्लॅट डिस्काउंट’ अशी जाहिरात वाचताना ‘व’ आणि ‘वर’ अशा अव्ययांपुरती मराठी उरली असून, तिच्या अगाध शब्दसंपत्तीकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे कटू सत्य लक्षात येते. ‘होलसेल दराने किरकोळ विक्री’ हेही असेच इंम्राठी रूप! ‘घाऊक’ दराने म्हणायला काय हरकत होती, कोण जाणे! ‘ज्ञानेश्वर फ्लोअर मिल’ ‘लक्ष्मीरोडचा राजा’ (एक गणपती) वगैरे पाट्या वाचतानाही हा भाषासंकरच नव्हे, तर संस्कृतिसंकर अनुभवायला येतो. ज्या ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात मराठीची मोठी बाजू संस्कृत पंडितांसमोर उचलून धरली आणि तिला मान्यता मिळवून दिली, त्यांच्या नावाने साधी पिठाची गिरणीही मराठीत मानाने राहू शकत नाही!

निरस्ता हा शब्द ‘रोड’साठी सुचत नाही. आपल्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या पैठणीची जाहिरातही अशीच लफ्फाभर इंग्रजी विशेषणे वापरून वाचायला मिळते. काय तर ‘डिझायनर ब्रोकेड पैठणी!’ इंग्रजीप्रमाणेच हिंदीचाही मारा सार्वजनिक क्षेत्रातील मराठीचा वावर पाहताना दिसतो. आपली पूर्वापार ओळखीची मेंदी सर्वत्र ‘मेहेंदी’ या हिंदी रूपातच दिसते. दुकानातील मालाच्या नावांच्या पाट्या वाचणे हा निव्वळ करमणुकीचा उद्योग ठरावा, अशी स्थिती आहे. ‘शाबुदाणा’ (साबूदाणाऐवजी), ‘उत्कृष्ट मिठाई’ ही त्याची नमुनेदार उदाहरणे! ‘उत्कृष्ट’ हे विशेषण ‘ट’चा ‘ठ’ केला की, अधिक प्रभावी बनते, असा समज (!) असावा.

प्रमाणलेखनाच्या नियमांची तर जागोजागी ऐशीच्या तैशी झालेली दिसते. ‘ईमारत’, ‘तिची मदत’, ‘सुद्रुढ’, ‘गृहपयोगी वस्तू’, ‘रद्दीतील आखीव कागद’, ‘इंन्स्टिट्यूट’ ही काही वेचक उदाहरणे देता येतील. -हस्व-दीर्घाबाबत समभाव, अनुस्वार आणि रफार यांचा स्वैर विहार, विशेषण-विशेष्य यांच्यात अंतर, या गोष्टीही दृष्टीआड करणे शक्य होणार नाही इतक्या प्रमाणात नजरेला टोचतात! अशात कु ठे तरी ‘उपाहारगृह’ असे विशुद्ध रूप दिसले की, अगदी मन भरून येते. सगळ्यात गंमत म्हणजे दुकानावरच्या किंवा रस्त्यावरच्या पाट्या देवनागरीत लिहिल्या की त्या मराठीत लिहिल्या आहेत, असा अल्पसंतुष्टपणा आपण अंगी बाणवला आहे. त्यामुळे रोमन लिपीऐवजी देवनागरी लिपीचा आश्रय घेऊन इंग्रजी सर्वत्र मिरवत आहे. आपली भाषा ही गोष्ट आपल्या श्वासोच्छ्वासाइतकी आपल्या जगण्याशी निगडित आहे, याचे आपल्या समाजाला विस्मरण झालेले आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे येथील रस्त्यावर ‘लेनची शिस्त पाळा’ असले फलक दिसतात. आपल्या भाषा संचालनालयाने विविध ज्ञानक्षेत्रासाठी तयार केलेले अनेक परिभाषाकोश नुसते पडूनच असावेत. ते शब्द लोकांच्या ओठांवर कधी खेळणार? प्रत्येक भाषेची स्वत:ची अशी एक शिस्त असते.

मराठीमध्ये शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येत असतात. (खरे तर ‘शब्दयोगी’ - युज् - जोडणे हा अर्थ त्या शब्दातूनच सुचवलेला आहे!) पण, हिंदीच्या प्रभावातून आपल्याकडे ‘दरवाज्यासमोर’ असे लेखन पाहायला मिळते. ‘ताजगी’, ‘असली रंग’, ‘व्यस्त’, ‘विमोचन’, ‘जागा, ग्राहक जागा’, ‘अंताक्षरी’ हा सगळा हिंदीचा प्रभाव आहे. दुसर्‍या भाषेतील अर्थपूर्ण वेगळी छटा असलेले शब्द जरूर स्वीकारावेत, त्याबाबत हिंदीचे ‘योगदान’ मोठे आहे. पण, नुसतीच अर्थशून्य उचलेगिरी आणि तीही हास्यास्पद वाटावी अशी.

भाषेतील शब्दसंपत्तीच्या निर्मितीविषयी अज्ञान असल्यामुळे की काय कोण जाणे सामासिक शब्दांचे अतोनात हाल होत आहेत. ‘संस्कृत भाषेचा अभ्यास कमी झाल्यामुळेही गमती घडत आहेत. ‘चित्रकलाचार्य’ असे विनोदी रूप वाचून मनातल्या मनात हसू येते. ‘चित्रकला+आचार्य’ हा संधी माहीत असणे कसे गृहीत धरायचे? ‘सूतक ताई’, (सूत-कताईऐवजी), ‘अक्षर शहा’ (अक्षरश: ऐवजी) अशी रूपे कानावर पडली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. हे आजचे बदलते भाषिक वास्तव आहे.

रस्त्यावरच्या पाट्या, फलक यावरील लेखन करणार्‍या मंडळींसाठी कार्यशाळांचे आयोजन करून त्यांना प्रमाणलेखनातील नियमांची ओळख करून देणे शक्य आहे. प्रत्येक गावात, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या पातळीवर एक ‘भाषातज्ज्ञ’ हे सरकारी पद निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी मराठीच्या लेखन नियमांचे होणारे वस्त्रहरण थांबवण्याचे काम त्या पदावरील अधिकार्‍यांकडे सुपूर्द करायला हवे. तसेच अमराठी मंडळींसाठी पायाभूत मराठीच्या अभ्यासक्रमाचे आयोजन करायला हवे. त्यासाठीचे प्रमाणपत्र, पदविका देणारे छोट्या मुदतीचे अभ्यासक्रम आखायला हवेत. विशेषत: इस्पितळे, बँका आदी सार्वजनिक ठिकाणी असणार्‍या अमराठी मंडळींना प्रमाणपत्र पातळीवरील मराठीचा अभ्यासक्रम नोकरीसाठी आवश्यक ठरवला गेला पाहिजे, असे खूप काही करणे शक्य आहे.

मराठीची मान ताठ राहावी, अशी इच्छा असेल तर मराठी बोलताना तिच्या व्याकरणिक रूपांविषयी आपणही दक्ष असायला हवे. (स्वत:च्या रूपाविषयी दक्ष असतो ना!) मराठी माणूस म्हणून जगताना कसलाच गंड असता कामा नये. ‘मी भाषेचा, भाषा माझी’ असे घट्ट नाते जुळायला हवे. ‘मासिक मनोरंजन’च्या पहिल्या दिवाळी अंकात 1909 मध्ये म्हणजे शंभर वर्षांच्याही पूर्वी गंगाधर मोगरे या कवींनी ‘महाराष्ट्रजनविज्ञापना’ नावाचे एक दीर्घ काव्य लिहिले आहे. त्यात मराठीची होणारी अवहेलना थांबावी म्हणून कवीने कळकळीने विनंती केली आहे.
‘अस्तित्वावर तुमच्या भाषेच्या जो चहुकडूनि घाला
पडला संप्रति आहे, कोण तुम्हांविण निवारिता त्याला?
ती आता तरी आम्ही मनावर घेणार आहोत का?’

नीलिमा गुंडी, पुणे
ज्येष्ठ लेखिका
संपर्क : ९८८१०९१९३५