आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा नको!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एखादा खेळ वर्षातून एकदाच खेळायचा आणि त्याला खेळ म्हणायचे,’ असे आमच्या बालबुद्धीलाही कधी सुचले नव्हते. मात्र, आपले राजकारणी दहीहंडीनिमित्त साज-या होणा-या गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा विचार करीत आहेत. यंदा 29 ऑगस्टला गोपालकाला आहे. त्याच्या काही दिवस अगोदर यासंदर्भातील घोषणाही राज्य सरकार करण्याची शक्यता आहे. सण, उत्सव म्हटला की लोकप्रियता आलीच. दिवसेंदिवस या उत्सवप्रियतेचा आवाका व्यापक होतो. पूर्वी प्रामुख्याने मुंबई-ठाण्यात रचल्या जाणा-या गोविंदांच्या थरांचा थरार म्हणूनच आता गावोगावी, खेडोपाडी वाढीस लागला आहे. मुंबई-ठाण्याच्या सीमा ओलांडून गोविंदांचे जत्थे आता नाशिक, पुणे अशा शहरांसह अनेक गावांत दिसू लागले आहेत. पैसे लावून दहीहंडी फोडण्याचे व दहीहंडीची उंची पैशागणिक वाढवायची हेच आता त्यामागचे सूत्र झाले आहे.


एखाद्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्याविषयी समग्र विचार व्हायला हवा. तसे पाहिले तर गोविंदांच्या थरारात साहस असतेच. पण खेळ व धार्मिक कृती यांची कुठेतरी गल्लत होत आहे. आपल्याकडील माध्यमे व राजकीय वर्तुळाने गोविंदा उचलून धरल्यामुळे त्याची लोकप्रियता वाढीस लागली व ती वाढतेच आहे. पण प्रचंड जनसमुदाय गोळा होतो व त्याची लागण वाढत चालल्याने धार्मिक उत्सवातील एका कृतीला साहसी ‘खेळाचा’ दर्जा देणे यात आपण काही गल्लत तर करत नाही ना, याचा परखडपणे निरपेक्ष विचार करायला हवा.


या विश्वात सर्वाधिक बलाढ्य काय असेल तर तो निसर्ग. निसर्ग जेवढा बलाढ्य आहे तेवढाच अनिश्चित आणि लहरी आहे. म्हणूनच सर्वशक्तिमान निसर्गावर मात करण्याची, त्याच्याशी झुंजण्याची ऊर्मी मानवी मनात आपसूकच निर्माण होते. या आंतरिक ऊर्मीतूनच साहसी खेळांचा जन्म झाला आहे. अनेक साहसीवीर तर एकट्याने घराबाहेर पडतात व अत्युच्च पर्वतशिखरे व महाकाय सागर एकट्याने उल्लंघतात.


पॅराजंपिंग, पॅराग्लायडिंग, स्कायडायव्हिंग, फ्री फॉल असे हवेत खेळले जाणारे हवाई साहसी खेळ, गिर्यारोहण, माउंटन बायकिंग (सायकलिंग), स्कीइंग असे जमिनीवर खेळले जाणारे साहसी खेळ अथवा रिव्हर राफ्टिंग, सर्फिंग, स्कुबा डायव्हिंग असे पाण्यात खेळले जाणारे साहसी खेळ हे सारे आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातात. कारण त्यामागील ऊर्मी-निसर्गाशी लढण्याची व त्याचा लहरीपणा अंगावर घेण्याची खुमखुमी असते. या अर्थाने दहीहंडीच्या खेळामागे निसर्गाशी लढण्याची आंतरिक ऊर्मी नसते. ना तो निसर्गाच्या भव्यदिव्य प्रांगणात खेळला जातो. बदलते हवामान, वा-याचा वेग, पडणारे हिम, पाण्याचा प्रवाह, लाटांचा मारा, थंडी, जीवघेणे उतार, अशा निसर्गातील अनेक घटकांशी झुंज घेत निसर्गाला एक क्षण तरी नमवण्यासाठी हे साहसी वीर धडपडतात, ध्यास घेतात. अशा अपरंपार कष्टातून जेव्हा इप्सित साध्य होते तेव्हा मानवी क्षमतेच्या नव्या कक्षांचा साक्षात्कार होतो. एकंदरच मानवी जीवनाला व समाजाला नवीन उंची प्राप्त होते. दहीहंडीतून असे काही साधण्याचा उद्देशच नसतो, म्हणून साहसी खेळांपासून हा प्रकार खूप दूर आहे.


जमणा-या अमाप गर्दीचे लांगूलचालन व लोकानुनय करण्याने आपण कमकुवत समाज व पिढीच्या पिढी तयार करण्याचे कारखानेच काढले आहेत. म्हणूनच क्रिकेटसारख्या साहेबी खेळाकडे आपला सारा देश वळतो, वेडा होतो, भारावून जातो आणि जागतिक स्पर्धा, ऑलिम्पिक्स, फुटबॉलचे विश्वचषक (ख-या अर्थाने ‘विश्व’चषक), हॉकीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा यात आपली पाटी कोरी राहते. साहसी खेळांतील प्रगतीकडे पाहिले तरी आपल्याला थक्क व्हायला होते. याबाबतीत मानवी क्षमता, त्याची मानसिकता, खेळासाठीचे तंत्रज्ञान, संशोधन व सुरक्षितता यांचा खूप अभ्यास करावा लागतो. साहसी खेळ जिवाची बाजी लावून खेळले जातात. त्यात कोणीही जीव गमावू नये म्हणून उत्तम प्रतीची अनेक जीवरक्षक साधने तयार केली आहेत. गिर्यारोहण, माउंटन बाइकिंग, स्कीइंग इ. साहसी खेळांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना अशा खेळांचा व अशा खेळांसाठी वापरल्या जाणा-या साधनांचा दर्जा व नियम निश्चित करतात. हे नियम काटेकोरपणे पाळण्याकडे सर्वांचाच कल असतो. कारण अन्यथा जीव गमावण्याची शक्यता असते. वेडे साहस करण्याइतके ते उत्साहित होत नाहीत. दहीहंडीतील मनो-यांना खेळ म्हणायचे असेल तर प्रथम त्याचे काही नियम करावे लागतील. गोविंदांचा जीव जाऊ नये, जखमी होऊन अपंगत्व येऊ नये म्हणून काही साधने (उदाहरणार्थ हेल्मेट, एल्बो व नी गार्डसदृश) विकसित करावे लागतील. त्यासाठी पृथक्करण, अभ्यासू व संशोधनवृत्तीला प्रोत्साहन द्यावे लागेल. विशेष म्हणजे पुढे ही साधने वापरण्याची सक्ती व अनिवार्यता करावी लागेल. आपल्या राजकारण्यांनी व माध्यमांनीही दहीहंडीला खेळाचा तोही साहसी खेळाचा दर्जा देण्याची खटपट करण्यापूर्वीच ज्या खेळातील गोविंदांची काळजी घ्यावी त्यांच्यासाठी सुरक्षिततेची साधने विकसित करण्यासाठी व वापरण्यासाठी उत्तेजन द्यावे. अनेक गोविंदा जखमी होतात, प्राणास मुकतात, त्यांची कारणे शोधण्याची अभ्यासू वृत्ती जोपासावी. तोबा गर्दीतून जखमी व्यक्ती अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत लवकरात लवकर कसा पोहोचेल, याचे नियमन करावे. गोविंदांचे जीव वाचवणे, त्यांच्यावरील झालेल्या इलाजांची तजवीज करणे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. एखादा जनसमुदाय एकत्र येऊन धार्मिक उत्सवातील एखाद्या कृतीचा एकत्रित गर्दी करून आनंद घेतो, म्हणून त्या कृत्याला खेळ म्हणण्याचा खटाटोप करण्यापेक्षा राजकारण्यांनी व समाजानेही तार्किक विचार करावा आणि दहीदंडीला साहसी खेळांच्या दर्जाइतपत उंचावण्यापेक्षा तो सुरक्षित खेळ कसा होईल, ते पाहावे.