आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रक्रिया : देशाच्या प्रगतीचा मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत सुरू असलेली राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रक्रिया सध्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. युद्धनीती, दहशतवाद, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था, वर्णभेद आदी राष्ट्रीय विषयांवर जनतेसमोर होणारे प्रत्यक्ष उमेदवारांचे वादविवाद हा या निवडणूक प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार उमेदवारांनी मांडलेल्या मुद्द्यांनंतर आपले मत निश्चित करत असतात. या सर्व गोष्टी भारताच्या तरुणाईला आकर्षित करत आहेत.

असं आपल्याही देशात घडावं, असं आजच्या पिढीला वाटतं. गुंडगिरी करून निवडून येणारे, पिढ्यानुपिढ्या आपली गादी चालविणारे चौथी नापास बाहुबली नेते नको आहेत. तरुणाई परिवर्तन घडवू पाहतेय. म्हणूनच कदाचित त्यांनी मोदींना मोठ्या आशेनं निवडून आणलं.
आपल्या देशातील निवडणूक प्रक्रिया अतिशय जटिल आहे. मात्र पंतप्रधान या निवडणूक प्रक्रियेत सकारात्मक परिवर्तन घडाविण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. राष्ट्रपतींनीही त्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. एवढेच नव्हे, तर या परिवर्तनाच्या धोरणास पाठिंबा देण्याचा मानसही त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवला आहे.

आपल्या देशाच्या राष्ट्रपतींनी एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यावर इतकी स्पष्ट भूमिका जाहीरपणे घेण्याची ही पहिलीच वेळ दिसतेय. परंतु देशातल्या तरुणाईला हा निवडणूक प्रक्रियेतील बदल केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यापुरता मर्यादित नको आहे. त्या निवडणुकीत पारदर्शकता हवी आहे. उमेदवारांची सर्वांगीण क्षमता पडताळून पाहण्याची सुविधा हवी आहे. अशा प्रकारच्या परिवर्तनाने देशातील मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होईल. कारण मतदार उत्साहाने अशा निवडणुकीत सहभागी होतील. चांगले उमेदवार निवडून येतील. देशाचे धोरण अधिक लोकाभिमुख होईल आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीला नक्कीच मोठा हातभार लागेल.

ओमकार शौचे, २३
मासमीडिया, वायसीएमओयु, महाराष्ट्र इंजिनिअरिंग, एमईटी कॉलेज, नाशिक
बातम्या आणखी आहेत...