आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Day Picnic Spot At Nashik, Latest News In Marathi, Divyamarathi

OnE DAy PicNic@NASIK: पर्यटनासह तीर्थाटनासाठी लाखो भाविकांचे अनोखे श्रद्धास्थान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभले आहे. नाशिकच्या भूमीला देव-देवतांचा आशीर्वाद तर लाभला आहेच याशिवाय निसर्गानेही दोन्ही हातांनी भरभरून दिले आहे. त्यामुळे विविधांगांनी नटलेला नाशिक जिल्हा अवघ्या महाराष्‍ट्राच्या संस्कृती आणि समृद्धीचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

पावसाळा तसेच हिवाळ्यात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच भाविक येतात. बदलांच्या प्रवाहात जिल्ह्यातील अनेक धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांनी आजही आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. या वैशिष्ट्यामुळे नाशिक हा जिल्हा पर्यटनासह तीर्थाटनासाठी लाखो भाविकांचे अनोखे श्रद्धास्थान बनले आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी 'सिंहस्थ'क्षेत्र म्हणून नाशिकला मानाचे स्थान लाभले आहे. दर 12 वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत.

'दक्षिण गंगा' म्हणून संबोधल्या जाणार्‍या गोदावरी नदीच्या काठावर नाशिक शहर वसले आहे. सह्याद्री आणि सातपुडा पर्वत रांगेचा समृद्ध वारसा लाभलेल्या नाशिक सर्वाधिक गड, किल्ले आहेत. राज्यातील सर्वाधिक उंच किल्ला 'साल्हेर' हा देखील नाशिकमध्येच आहे. 135 किलोमीटरच्या परीघात अनेक वैशिष्ट्ये जपणारे जवळपास 60 किल्ले असून ते पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि खान्देशसह राज्यभरातील हजारो ट्रेकर्सला खुणावतात. ऑगस्टमधील श्रावणसरी तर कधी उघडदीपीतील ऊन-पावसाचा खेळ पर्यटकांना मोहून टाकतो. हिरवळीने बहरलेले उंच शिखरे आणि डोंगरकड्यावरुन कोसळणारे धबधबे आल्हाददायी परिसरात स्वच्छंदपणे विहरताना पर्यटकांना निराळाच आनंद मिळतो.

आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेले 'सप्तश्रृंगी गड', त्र्यंबकेश्वरमधील 12 ज्योतिलिंर्गांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगिरी फेरी मार्ग, इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी आणि कावनई तीर्थक्षेत्र, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, नाशिक शहरालगत असलेले श्री क्षेत्र सर्वतीर्थ टाकेदसह जिल्ह्यातील विविधतेने नटलेली प्रेक्षणीय स्थळे राज्याच्या विविध भागांमधूनच नव्हे तर परराज्य आणि परदेशातील पर्यटकांचा ओढा नाशिकच्या समृद्धीत अधिकच भर टाकणारा आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, मोगल साम्राज्याच्या काळात 'गुलाबांचे शहर' नाशिकचे नाव पडले होते गुलशनाबाद'!