आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच होता चिमणा, तोही उडाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निबिड अरण्यात शिरलेल्या पारध्याने एका विशाल वटवृक्षाखाली जाळे पसरले. जाळ्यावर दाण्यांचे शिंपण केले आणि तो दूरवर जाऊन उभा राहिला. काही वेळाने दाण्यांच्या मोहाला बळी पडत पक्षी जाळ्यावर आले. त्यातच अडकले. यामध्ये एक होता धडधाकट, स्वच्छंदी चिमणा. त्याने जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. पण सोबतचे पक्षी त्यासाठी तयार नव्हते. मग त्याने त्यांच्यावरच चोचीने वार केले. बाकीचे पक्षीही तयारीत होते. त्यांनीही त्याला चारही बाजूंनी घेरत जखमी केले. तशाही अवस्थेत चिमण्याने सर्व ताकद एकवटली.

नखांमध्ये गुंतलेले जाळे तोडले अन् तो उडून गेला. त्याच्या जाण्याने पक्ष्यांना आणि पारध्यालाही ‘हर्ष’वायू झाला. पक्षी म्हणाले, बरे झाले तो गेला. उगाच दांडगाई करत होता. पारधी म्हणाला, नाहीतरी तो बेचवच होता. चिमणा म्हणाला, अशा तुच्छ पक्ष्यांसोबत राहणे मला शक्यच नव्हते. मी कधी एका जागी थांबलो आहे का?
ही आहे आधुनिक पंचतंत्रातील गोष्ट. औरंगाबाद जिल्ह्यात घडलेली. परप्रांतीयांच्या द्वेषाखाली नुकतेच बाळसे धरू लागलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्याचे पडसाद गेल्या आठवड्यात म्हणजे गुरुवारी औरंगाबादेत झालेल्या मेळाव्यात उमटतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. जाधव का बाहेर पडले, त्यांना कोणी बाहेर पडण्यास भाग पाडले, अशा स्वरूपाचे अंतर्गत राजकारण पुढील काळात घडणार नाही, यासाठी काही व्यूहरचना आखली जाणार का, असे प्रश्न निर्माण झाले होते. पण नावात नवनिर्माण असल्याने जुने ते माती आणि नवे तेच सोने असा राज आणि त्यांच्या समर्थकांचा पवित्रा असतो. तो या मेळाव्यातही पाहण्यास मिळाला.

विधिमंडळातील मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या शैलीत जाधवांच्या जाण्याबद्दल हर्ष व्यक्त केला. अर्थात त्यात अजिबात तथ्य नव्हते असे नाही. कारण हर्षवर्धन जाधव यांचे व्यक्तिमत्त्व अति स्वतंत्र आहे. ते कधीच एका जागी स्थिरावत नाहीत. एखाद्या कॉर्पोरेट जगतातील सीईओने नोक-या बदलाव्यात तसे ते एका कंपनीतून दुस-या कंपनीत जात असतात. मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांशी जुळवून, जमवून घेणे, त्यांना आपलेसे करणे त्यांना जमलेच नाही आणि त्यांचा स्वभाव पाहता ते त्यांच्याकडून शक्य झाले असते, असेही वाटत नाही. जाता जाता त्यांनी चिखल उडवला. विधानसभा उमेदवारीसाठी दहा लाख रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला. आमदारकीचे तिकीट विकत घेतल्याची एक प्रकारे कबुलीच त्यांनी देऊन टाकली.

नांदगावकरांनीही मग त्यांच्यावर चिखलफेक केली. मेळावा दुष्काळी परिस्थितीवर आणि मनसेच्या वाटचालीविषयी असला तरी त्यातून मनसेमधील लाखोंची उलाढाल, तिकिटाचा व्यवहार, लाथाळ्या, कागाळ्याच समोर आल्या. महाराष्ट्राचे तख्त काबीज करण्याची भाषा करणा-या पक्षाला हे शोभेसे होते काय, याचा विचार मनसेचे पदाधिकारी करणार नसले तरी लोक निश्चित करत असतात. किमान तरुण मतदार तरी. मराठवाड्यात अजिबात स्थान नसलेल्या पक्षाला एक आमदार मिळणे, त्या आमदाराने स्वपक्षीयांविरुद्ध मोहीम उघडणे, स्वपक्षीयांनी त्या आमदाराला जेरीस आणणे, मग त्याने पक्ष सोडणे आणि तो बाहेर पडल्यावर आरोप-प्रत्यारोपांची धुळवड होणे, हे पक्ष पुढे जाण्याचे लक्षण निश्चितच नाही. कुठल्याही राजकीय पक्षबांधणीच्या सुरुवातीच्या काळात अशा घडामोडी होतात. कार्यकर्ते, पदाधिका-यांच्या मनाची जुळवाजुळव करणे कठीण जाते. पण अशा घटनांमधून नवे काही शिकून पावले टाकणे महत्त्वाचे असते. जुन्या आणि नव्याचा संगम घडवूनच नवीन निर्मिती होते, यावर राज यांनी लक्ष केंद्रित करावे. अन्यथा जाळ्यात अडकलेले सारे पक्षी कधी ना कधी उडून गेलेल्या चिमण्याचा कित्ता गिरवू शकतात. कारण आजकाल पक्ष्यांना कोणतेही जाळे आणि दाणे फार काळ एकाच जागी अडकवून ठेवू शकत नाहीत, ही म्हटले तर भारतीय राजकारणाची वस्तुस्थिती आणि म्हटले तर शोकांतिका आहे.