आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅकेज इंडस्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात बाकीचे उद्योग संकटात असताना व एमआयडीसीतील उद्योग धडाधड बंद होत असताना पॅकेज इंडस्ट्री मात्र जोरात आहे. कारण या इंडस्ट्रीत काहीच नवनिर्माण करायचे नसते. उलटपक्षी जे काही चांगले लागलेले आहे ते गुंडाळायचे असते. गुंडाळणे हा मराठी माणसाचा आवडता उद्योग आहे. कुठलीही गोष्ट तो चटकन गुंडाळतो. पॅकेज इंडस्ट्रीत नेमके हेच करायचे असल्याने सध्या राज्य सरकारनेही हा उद्योग अंगीकृत केला आहे. तसा सरकारातील अनेक मंत्र्यांचा हा आवडता छंद आहे. प्रत्येक जण एकमेकाला गुंडाळण्याच्या प्रयत्नात असतो...


पॅकेज हा अक्सीर इलाज झाला आहे. ‘सब रोगों की एक ही दवा,’ असा हा नामी इलाज आहे. त्यामुळे काहीही झाले की पॅकेज जाहीर करून टाकायचे, असे सरकारने ठरवून टाकले आहे. विशेषत: वेगळ्या विदर्भाचे आंदोलन पेटले की हायकमांड प्रत्येक नेत्याला वेगवेगळे भेटीला बोलावते. त्यात प्रत्येकाला वेगवेगळे पॅकेज दिले जाते. मग प्रत्येक जण वेगवेगळे बोलतो आणि आंदोलन गुंडाळले जाते. आता तेलंगणानंतर काँग्रेसी नेत्यांना वेगळ्या विदर्भाच्या उचक्या लागत आहेत. त्या पॅकेजसाठीच हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘लाठी -गोली खायेंगे, इंदिरा जी को लायेंगे’ म्हणत पोलिसांच्या लाठ्या खाणारे खासदार विलास मुत्तेमवार विदर्भाच्या आंदोलनात लाठ्या खायला तयार नाहीत. कारण त्यांना सत्तासुंदरीची सोबत हवी आहे. एकवेळ मायावती मुलायमसिंगांना राखी बांधेल, मोदीच पंतप्रधान असे नितीशकुमार म्हणतील; पण वैदर्भीय काँग्रेसी नेते सत्तेशिवाय राहणार नाहीत...


संपूर्ण विदर्भात अतिवृष्टी झाली. शेती खरवडून गेली. घरे पडली, संसार वाहून गेले. बाबा आणि दादा पाहणी करण्यासाठी आले आणि मुंबईला परत जाऊन पॅकेज दिले. आपलेही हात पॅकेजचेच असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी अशोक चव्हाण, कै. विलासराव देशमुख यांनी विदर्भाला पॅकेज दिले. त्यानंतर दस्तूरखुद्द पंतप्रधान आणि क्रिकेटची शेती करणारे राष्‍ट्रवादी नेते शरद पवार विदर्भाच्या दौ-यावर आले. त्यांनीही पॅकेज जाहीर केले. आता दादा व बाबांनी चौथे पॅकेज जाहीर केले आहे. यापूर्वीच्या पॅकेजची नीट अंमलबजावणी झाली असती तर या पॅकेजची गरज पडली नसती. पण तसे केले असते तर नवे पॅकेज जाहीर करता आले नसते.


राज्य सरकारजवळ वेगवेगळी पॅकेजेस आहेत. रस्ते, विमान, रेल्वे अपघातात मरण पावलेल्यांसाठी वेगवेगळ्या मदतीची पॅकेजेस आहे. जीवात्मा सर्वांमध्ये सारखाच असला आणि ‘सर्वांभूती परमेश्वर’ असे संतांनी कितीही सांगितले असले तरी सरकार पॅकेज देताना ते वेगवेगळे देते.
पक्ष्यांची अंडी डोक्यावर पडताच ते
अभिषेक झाल्याचा आनंद मनवतात
आणि मृत पक्ष्यांच्या पिसांवरून
मृतकांचे आकडे जाहीर करतात...
नंतर पॅकेज जाहीर होते. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यापेक्षा वेगवेगळे पॅकेज देणे सरकारने आता बंद केले पाहिजे. नाहीतर जनता निवडणुकीत नेत्यांना कायमस्वरूपी घरी बसण्याचे पॅकेज दिल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.