आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Padmashri Milind Kamble Article In Divya Marathi

कणा: पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे \'सीमेमुळे सीमोल्लंघन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी सीमासह पद्मश्री मिलिंद कांबळे - Divya Marathi
पत्नी सीमासह पद्मश्री मिलिंद कांबळे
जातीपातीची, भेदाभेदाची झळ कधी पोहोचली नाही, तरीही दलितहितासाठी पुढाकार..
शिक्षणात प्रगती करत नोकरीत आरक्षणाला नकार..
मागास जातींमधील अंतर्गत तटबंदी मोडत मागास आंतरजातीय विवाह..
शतकांपासून दाबून ठेवलेल्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिक्कीची स्थापना..
ही सगळी उदाहरणे आहेत सीमोल्लंघन करण्याची..
पद्मश्री मिलिंद कांबळे हे या वाटेवरचे प्रवासी आणि यात त्यांची सहप्रवासी म्हणजे पत्नी सीमा..


मिलिंद प्रल्हाद कांबळे यांची कारकीर्द पाहिली, दलित समाजासाठीचे त्यांचे कार्य पाहिले की अनेकांना त्यांच्यावर पूर्वी फार अन्याय झाला असावा, असा गैरसमज होतो. मात्र, वस्तुस्थिती अगदी उलट आहे. अहमदपूर तालुक्यातील चोबळी हे त्यांचे जन्मगाव. गावावर आर्य समाजी विचारांचा पगडा आहे. त्यामुळे जातीपातीचा भेद कधी गावाला शिवला नाही. विशेष म्हणजे १९५० मध्ये अण्णाराव पाटील यांनी आपल्या शेतातील विहीर सगळ्यांसाठी खुली केली होती.

जात आडवी आली नाही
मिलिंद यांच्या आजोबांचे निधन वडील चौथीमध्ये असताना झाले. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे गावातील लिंगायत समाजाचे मान्यवर विश्वनाथ पाटील यांनी प्रल्हाद यांच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्या घरात ठेवून घेतले. तर शिरुर ताजबंद या गावी मराठा समाजाच्या बाळासाहेब जाधव यांनी सातवीपासून पुढचे शिक्षण पूर्ण केले. दुसरीकडे मिलिंद यांचा जवळचा मित्र रवींद्र देशमुख ब्राह्मण समाजाचा. शिकताना सर्व मुलांचे जेवण एकत्र व्हायचे. एकूणच काय तर कांबळे कुटुंबाला कधीही जातीपातीचे चटके बसले नाहीत. आजही गावात गेलो की टीएन कांबळे आणि अण्णाराव पाटील ही चुलत्यांची दोन घरे असल्याचे कांबळे सांगतात.

बदलांचा अनुभव
वडील शिक्षक असल्याने मिलिंद यांना बदलीच्या ठिकाणी राहावे लागे. दहावीपर्यंतच्या शिक्षणात ग्रामीण, निमशहरी, शहरी वातावरण अनुभवायला मिळाले. वेगवेगळे मित्र मिळाले. लातूरमध्ये शिक्षणासाठीची दोन वर्षे शहरी वातावरण आणि सामाजिक बदल समजता आले. नांदेड येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्येही अभ्यासात चांगली प्रगती राहिली. पण मिलिंद यांच्यातील कार्यकर्ता तेव्हाही त्यांना खुणावत होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत काम सुरू केले. पुढे मुंबईमध्ये विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर संघटनेत सक्रिय राहिले. या दरम्यानच त्यांची भेट सीमा कदम यांच्याशी झाली.

विचारपूर्वक विवाह
बाय चान्स परिषदेत आलेल्या सीमा यांचे परिषदेतून व्यक्तिमत्त्व घडत गेले, सामाजिक कार्याची ओढही वाढली. घरात कोणतेही सामाजिक कार्याचे वातवरण नसल्याने पुढे हे कार्य सुरू ठेवण्यासाठी जोडीदार तरी अशा विचारांचा असावा, अशी त्यांची भूमिका होती. इकडे पुण्यात स्थायिक झालेल्या मिलिंद यांच्या मनातही तेच सुरू होते. विचार जुळले तशी मनेही जुळली आणि तब्बल आठ वर्षांनंतर दोघांची पुन्हा भेट झाली, ती कायम एकत्र राहण्याच्या विचारानेच. पण हा विचार आणि वास्तव यात खूप मोठी दरी होती.

अंतर्गत तटबंदी भेदली
कांबळे मातंग, तर सीमा बौद्ध. तरीही हे लग्न करणे सोपे नव्हते. ‘सवर्ण आणि इतर जातींमध्ये विवाह होतात. मात्र, अनुसुचित जातीमध्ये इंटरकास्ट फार कमी. हे इन बिट्वीन शेड्यूल कास्ट होते. यामध्ये अंतर्गत तटबंदी फार मजबूत असते’, असे कांबळे सांगतात. त्याचा या दोघांनाही फटका बसला. मुंबईमध्ये लग्नासाठी बौद्ध पंचायतीची परवानगी लागते. मुलगा हिंदू मातंग असल्याने बौद्ध पंचायतीने परवानगी नाकारल्याचेही कांबळे सांगतात.

मधला मार्ग ..
हिंदू विवाह केला तर सीमा यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बौद्ध पंचायतीने घेतला. मुलाने बौद्ध होण्याचे बंधनही त्यांनी घातले. तर मिलिंद यांच्या घरच्यांनी हिंदू पद्धतीने विवाहाचा आग्रह धरला. त्यामुळे सर्व स्तरांवर आणि सर्व जातींमध्ये जातीयवाद किती खोलवर रुजला आहे हे त्यांना कळले. यातून कांबळे यांनी मधला मार्ग काढला. दोन्ही पद्धतींनी विवाह नाही केला तर ? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याला हरकत नाही, असे उत्तर मिळाले आणि एक वर्षाच्या संघर्षाला यश आले. १० मे १९९५ रोजी सीमा आणि मिलिंद यांचे बांद्र्याच्या कोर्टात लग्न झाले. विनोद तावडे आणि वर्षा पवार साक्षीदार म्हणून उभे राहिले.

आरक्षणही नको नि नोकरीही नको
शिक्षण आणि आरक्षणाच्या भरवशावर पीडब्ल्यूडी, पाटबंधारेला सहज नोकरी मिळू शकली असती; पण हा मार्ग त्यांनी पत्करला नाही. स्वाभाविकच वडील नाराज झाले. पण आरक्षणातून नोकरी नको. शिवाय मला खुल्या मार्केटमध्ये जाण्याची इच्छा असल्याचे त्यांनी वडिलांना सांगितले. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्याची भूमिका घेण्यासाठी स्वतःचे विश्व निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले.

स्वप्न आणि साथ
सिव्हिलचा डिप्लोमा असल्याने कांबळे यांनी झोपे- म्हाळगी असोसिएट्स, मंत्री कन्स्ट्रक्शन, मिश्रा असोसिएट्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांतून उमेदवारी केली. एका ठेकेदाराच्या आयुष्यात खूप चढ-उतार येतात. मात्र, लग्नानंतर एमए बीएड झालेल्या सीमा पुण्यात आल्याबरोबर त्यांना शिक्षिकेची नोकरी लागली. त्यामुळे ६०० रुपये महिन्यात संसार सुरू झाला. त्यातील ३०० रुपये हप्त्यावर घेतलेल्या गृहोपयोगी वस्तूंसाठी जायचे. पण यामुळे भाजी- भाकरीची व्यवस्था झाल्याचे कांबळे भूतकाळ आठवत सांगतात. अनेकदा अडचणींमुळे खचलेलो असताना व्यवसाय सोडण्याचा विचार यायचा. मात्र, सीमा धीर द्यायची. अडचणींच्या मागे अपॉर्च्युनिटी येते हे ती नेहमी सांगते.

बारामतीकरांना ‘पाजले पाणी’
मिळवलेल्या अनुभवातून ‘मिलिंद कांबळे सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉँट्रॅक्टर्स’ ही संस्था रजिस्टर केली. पहिले काम मिळाले ते कॉलेजची संरक्षक भिंत उभारण्याचे. मात्र, ८७ हजारांचे हे काम करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मित्रांकडून जुळवाजुळव करून त्यांनी पहिले काम पूर्ण केले. याच काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. यातील काही मोठी कामे मिश्रा असोसिएट्सने घेतली. त्यांचा सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून कांबले यांनी पिंपळगाव डाव्या कालव्याचे काम पूर्ण केले. मिश्रा यांचा विश्वास संपादन केल्याने इतर मोठी कामेही त्यांना मिळाली. याचा उल्लेख करताना नियतकालिक आउटलूकने ‘बारामतीकरांना पाणी पाजणारा माणूस’ असा गमतीने उल्लेख केला होता. मिश्रा यांचा विश्वास जिंकल्याने कांबळे त्यांचे डायरेक्टर बनले.

वेबसाइट आणि झपाटलेपण
हळूहळू व्यवसायात चांगला जम बसत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या कांबळे यांनी त्यांच्यावर एक खूप मोठी वेबसाइट बनवण्याचे ठरवले. तब्बल ७ हजार पाने आणि हजारावर छायाचित्रांसह संपूर्ण माहितीयुक्त वेबसाइट तयार करण्यासाठी त्यांनी आपला व्यवसायही बंद केला. सर्व जमापुंजी आणि कर्ज घेऊन काम पूर्ण झाले, अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केले, लिम्का बुकमध्ये नावही गेले; पण काही महिन्यांनी एक संकट आले...

पुन्हा सीमाचे सहकार्य
मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेल्या वेबसाइटच्या सर्व्हरचे ५५ हजार रुपये देणे बाकी होते. ते देण्यासाठी पैसै कुठून आणायचे, हा प्रश्न होता. ही अडचण सीमा यांनी आणि त्यांची अडचण सहकारी मधुकर फडके यांनी ओळखली. त्यांनी तातडीने शाळेतील पतपेढीतून कर्ज मंजूर करून देण्यासाठी मदत केली. त्यामुळे परिश्रम आणि प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना संकट पत्नीने पार केले.
...और कारवॉँ बढता गया
औद्योगिक क्षेत्रात आता फिक्की, सीआयआयबरोबरच आता डिक्कीचेही नाव घेतले जाते. बजेटपूर्वी संघटनेचे विचार लक्षात घेतले जातात. संपूर्ण भारतभर आणि इतर सात देशांमध्येही संघटनेच्या शाखा सुरू झाल्यात. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणातून दलितोद्धाराचे, मागासलेपणाचा शिक्का पुसण्याचे सूत्र काम करत असल्याचे चित्र आहे.
.. आणि फॉर्च्यून
२००५ मध्ये ‘फॉर्च्यून कन्स्ट्रक्शन’ ही कंपनी स्थापन केली. मी भान ठेवून योजना आखतो आणि बेभान होऊन त्या पूर्ण करतो, असे कांबळे अभिमानाने सांगतात. प्रगती करायची असेल तर आव्हानांचा सामना करावाच लागतो, ही त्यांची भूमिका. याचाच परिणाम म्हणजे आतापर्यंतचे यश. यातून त्यांनी राजकारणात प्रवेश करत २००७ मध्ये नगरसेवकपद भूषवले. मात्र, २०१० मध्ये त्यांनी वेगळ्या स्वप्नांकडे लक्ष केंद्रित केले आणि डिक्कीला नवसंजीवनी मिळाली.
मैत्रीण मैत्रेयी
व्यग्रतेमुळे कांबळे यांची मुलगी मैत्रेयी हिला आई-वडिलांचा खूप वेळ मिळत नाही. आरक्षण नाकारून अॅडमिशन करण्यासाठीचे प्रयत्न असोत की वडिलांच्या कामाचा भार, मैत्रेयी समजूतदारपणे सगळ्या गोष्टी सांभाळते. ती मुलगी कमी आणि मैत्रीण जास्त असल्याप्रमाणे आई-वडिलांशी वागते. सामाजिक जाणिवा पालकांकडून घेतानाच सेल्फी कशी काढावी, हे ती वडिलांना आवर्जून शिकवते.
डिक्कीचा प्रवास
१४ एप्रिल २००५ रोजी मिलिंद कांबळे यांनी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ची स्थापना करून भारतीय उद्योगाच्या इतिहासात मैलाचा दगड रोवला. दलित उद्योजक तयार करणे, उद्योजकांना बळ देणे, यातून आर्थिक प्रगती करून दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी डिक्कीची स्थापना करण्यात आली. मात्र, सुरुवातीची पाच वर्षे संघर्षाची, अविश्वासाची, भटकंतीची, संशोधनाची आणि हळूहळू मिळणाऱ्या सहकार्याची होती. मात्र, २०१० मध्ये पुण्यात आयोजित दलित उद्योजकांच्या प्रदर्शनीने डिक्की प्रकाशझोतात आली. त्यानंतर २०११ मध्ये मुंबईचे दलित संमेलन मैलाचा दगड ठरले. रतन टाटा, आदि गोदरेज यांच्यासारख्या बड्या उद्योजकांच्या उपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधले. अमेरिकेतील ब्लॅक इंडस्ट्रीसाठी हेन्री फोर्डने केलेल्या घोषणेप्रमाणेच टाटा यांनीही ५ ते १० टक्के सुटे भाग दलित उद्योजकांकडून घेण्याची घोषणा केली.
मी एकटा शून्य
सामाजिककार्यातील कोणतीही स्थिती असो, सीमाची सोबत नसती तर काय झाले असते, असे वाटते. सामाजिक कार्य करताना समजूतदार पत्नीची साथ असणे किती गरजेचे असते हे माझ्याकडे पाहून कोणीही समजून घ्यावे. मिलिंदकांबळे
त्याचे झपाटलेपण माझे बळ
काहीतरीवेगळे करण्याची दोघांमधील इच्छा पाहून आम्ही एकत्र आलो. त्याला माझा आधार वाटतो; पण त्या आधारासाठीचे बळ हे त्याचा प्रामाणिकपणा आणि झपाटलेपण आहे. काही चांगले घडत आहे याचेच समाधान आहे. सीमाकांबळे

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मिलिंद कांबळे यांच्या वाटेवरचे प्रवासी ...