आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मृतात्म्यास वर्षभराने संदेश, तोही ट्विटरवरून...!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल वेबसाइट्सच्या माध्यमातून अरब देशांत क्रांतीची लाट आल्याचे तुम्ही ऐकले, वाचले असेलच; पण एखाद्या आत्म्याला ट्विटरवरून संदेश दिल्याचे तुम्ही ऐकले नसेल. हा संदेश पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे चिरंजीव आणि पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी 4 जानेवारी 2012 रोजी ट्विटरवरून दिला आहे. यात म्हटले आहे की, ‘सलमान तासीर, आम्हाला माफ करा, लोकांना माफ करा. कारण जेव्हा बोलणे अपेक्षित होते तेव्हा लोक गप्प राहिले.’ सलमान तासीर हे जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत पंजाबचे राज्यपाल होते. मुशर्रफ यांची राजवट संपली आणि पीपल्स पार्टीचे सरकार आले तेव्हाही ते पंजाबचे राज्यपाल होते. खरे म्हणजे ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राज्यपालपदावर होते.
ते फैज अहमद फैज यांच्या सख्ख्या मावशीचे सुपुत्र होते. पंजाबमधील साहित्यिक वर्तुळाशी त्यांचा जुना दोस्ताना होता. ते एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक होते. त्यांनी मातीला जरी हात लावला तरी तिचे सोने होत असे. त्यांनी पाकिस्तानमध्ये अत्यंत यशस्वी व्यावसायिक संस्था स्थापन केल्या. आपल्या यशाकडे वळूनही न पाहता त्यांची आगेकूच सुरू होती. राजकारणावर त्यांचे प्रेम होते. ते राजकारणाच्या मैदानात उतरले आणि येथेही यशस्वी झाले. राजकारण करताना त्यांनी तत्त्वांचा फार बाऊ केला नाही आणि काळाच्या गरजेनुसार त्यांनी आपले वर्तन ठेवले. याच कारणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त ठरले. हुकूमशहाला सक्त विरोध करणाºया माझ्यासारख्या लोकांना कळतच नव्हते की लोकशाही पसंत असल्याचा दावा करूनही जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत ते राज्यपाल कसे झाले? मला हेही कळले नाही की, मुशर्रफ यांची सत्ता गेल्यानंतर आणि त्यांनी देश सोडल्यानंतर सलमान तासीर यांची पीपल्स पार्टीशी इतकी जवळीक कशी वाढली आणि ते पूर्वीचाच दबदबा कायम ठेवून पंजाबवर कसे राज्य करीत राहिले? 2008 मध्ये मियाँ नवाझ शरीफ यांच्या पक्षाला पंजाबमध्ये विजय मिळाला आणि त्यांनी तेथे सत्ता स्थापन केली तेव्हा सलमान तासीर यांनी त्या राजवटीला स्वस्थता लाभू दिली नाही.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या पैलूंमुळे देशातील एक मोठा वर्ग त्यांच्यावर टीका करीत असे. सलमान तासीर यांनी राज्यपालाच्या कार्यालयाची दारे पीपल्स पार्टीच्या कारकुनांसाठी सताड उघडली आणि कधीच हा विचार केला नाही की, राज्यपालाची भूमिका नि:पक्ष असते. या कारणांमुळे ते वादग्रस्त ठरले असले तरी त्यांच्यात काही चांगले गुणही होते. यातील एक म्हणजे त्यांनी नेहमीच अल्पसंख्याकांना उघड साथ दिली आणि पंजाबमध्ये कुठे एखाद्या ख्रिश्चन किंवा हिंदूवर अन्याय झाल्यास ते लगेच तेथे धावून जात आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करीत. 4 जानेवारी 2011 रोजी दिवसाढवळ्या त्यांचा खून याच कारणामुळे झाला.
नोव्हेंबर 2010 मध्ये आसिया नूरीन या ख्रिश्चन महिलेला अटक झाली. तिचे कुण्या मुस्लिम महिलेशी वैयक्तिक कारणांवरून भांडण झाले होते. भांडण वाढले तेव्हा त्या मुस्लिम महिलेने आसिया बीबीवर जो आरोप ठेवला त्यामुळे तिला अटक झाली. तिच्यावर देशद्रोहाच्या कायद्यानुसार खटला चालवण्यात आला आणि तिला मृत्युदंड ठोठावण्यात आला. यामागे आपसातील भांडण असल्याचे तासीर यांना माहीत होते. त्यामुळे ही शिक्षा चुकीची आहे, असे त्यांचे मत होते. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्याशी बोलून आसिया बीबीची सुटका करावी, असे त्यांच्या मनात होते. याच विचाराने ते शेखपुरा तुरुंगात गेले. तेथे आसिया बीबी कैद होती.
ती शिकलेली नसल्यामुळे अध्यक्षांकडे केलेल्या माफीच्या अर्जावर सही करू शकत नव्हती. तासीर यांनी त्या अर्जावर तिचा अंगठा घेतला आणि ते अध्यक्षांकडे गेले. या अर्जाकडे अध्यक्षांनी बरेच दिवस दुर्लक्ष केले आणि कशीबशी सही करताच इस्लामाबादमधील गजबजलेल्या भागातील एका हॉटेलबाहेर येताना सरकारी सुरक्षारक्षकांनी तासीर यांची हत्या केली.
त्यांच्या खुन्याला तत्काळ अटक करण्यात आली. त्याने तेथे सर्वांसमोर गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, या माणसाने पे्रषितांचा अपमान केल्याने मी त्याचा खून केला. कारण ही माझी धार्मिक जबाबदारी होती. पाहता पाहता तो खुनी धार्मिक टोळ्यांचा हीरो झाला आणि सगळा देश गप्प बसला. लोकांना वाटले होते की, ज्या पीपल्स पार्टीची सलमान तासीर यांनी नेहमीच हिरीरीने बाजू घेतली ते लोक त्यांच्या बाजूने बोलतील आणि लोकांना सत्य काय ते सांगतील; पण तेही गप्प राहिले आणि त्यांनी आपल्या राज्यपालाच्या खुनाबाबत कुठलाही विरोध प्रकट केला नाही.
4 जानेवारी रोजी तासीर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झाले. पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध लेखकाने लिहिले की, तासीर या जगात नाहीत यावर आजही विश्वास बसत नाही. पाकिस्तानमध्ये त्यांच्याइतका सुशिक्षित, माणुसकी आणि ध्येयासाठी आपला जीव पणाला लावणारा राजकारणी झालाच नाही. काही विद्वान मात्र आजही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करीत आहेत; पण त्यांच्या पीपल्स पार्टीनेच त्यांना जी वागणूक दिली त्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे?

5 जानेवारी रोजी सलमान तासीर यांच्या नावे बिलावल भुट्टो यांचा ट्विटरवरील संदेश वाचून मला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की, वर्षभरानंतर बिलावल यांना त्यांची आठवण आली असली तरी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एखादा छोटासा कार्यक्रमही ते घेऊ शकले नाहीत. सलमान तासीर यांच्या आत्म्याची क्षमा मागण्याची आणि लाज वाटण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.