आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG : रुढी-परंपरांच्या जाचातून स्त्री मुक्त कधी होणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाय डॉली...
खूप दिवस झाले आपण काही बोललोच नाही.. आज तुझ्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत गं... आज मन खूप उदास आहे, आक्रंदत आहे. विचारांची खुप सरमिसळ होतेय... गुंता वाढतोय.... काय करु? मार्च उजाडला की महिलावर्ग मस्त उत्साहात असतो. विविध स्पर्धा, मनोरंजन, विविध स्टॉल्सची रेलचेल, नटणे मुरडणे यांना तर ऊत येतो. कारण तमाम पुरुषवर्गांनी बहाल केलेला वर्षातील फक्त एकदिवस या महिन्यात येतो ना..! पण खरं सांगु, मला या गोष्टीचे अजिबात अप्रूप नाही. मी नेहमीच स्वत:ला 'आजचा दिवस आपलाच' म्हणूनच जगते. पण आज काहीही नकोसे वाटते आहे. आत कुठे तरी निराशा आली आहे. आज काहीही न करता नुसते 'नाहीरे' म्हणून दिवस काढावासा वाटतोय. पण नुसते बसले तरी चैन कुठे पडतेय? म्हणले मग तुझ्याशी बोलले की खूप बरे वाटते, हलके वाटते. आज काल प्रत्यक्ष कुणाशी बोलणे अन् ते ही स्पष्ट म्हणजे कठीणच असते म्हणा. कुणी दुखावले तर जाणार नाही ना माझ्याकडून? ही भीती. कारण अस्मादीक वृश्चिकराशीचे म्हणजे स्पष्ट वक्तव्यामुळे आम्ही (कु)प्रसिद्धच. पण तुझे तसे नाही ही खात्री आहे...म्हणुन तुझ्याशी बोलायला मला कुणाच्या बापाची भीती नाही वाटत.
अग काय झाले माहीत आहे का. आज सकाळी सकाळी समोरच्या घरातून मावशींचा एकदम स्फोट झाल्यासारखा आवाज आला. खुप चिडल्या होत्या आणि आपल्या मुलाला चक्क “रांडीच्या...कळत नाही तुला ? किती वेळा सांगितले तरी ऐकत नाही होय? आता काम झाल्यावर जरा बसेन म्हणले निवांत तर नाही... चालूच आहे तुझे...” असे म्हणत चिडून वर त्याला फटके मारत होत्या. त्या आवाजाबरोबर त्या पोराचा भोकाड पसरलेला आवाज आणि त्या दोघांच्या आवाजाने छोटी मुलगी ही रडू लागली. तिलाही आईच हवी होती.
काय झाले असेल... म्हणून नेहमी प्रमाणे लगेच मी खिडकीतून डोके बाहेर काढलेच. तशी आमची कन्या आणि त्यांचे पिताश्री ही फिस्कारलेच... “ बघा बाई! तुम्ही बघितलेच पाहिजे... आम्हाला चौकशा लागतातच म्हणा... नको तिथे उत्सुकता दाखवायची... बस्स! झाले हं आता... हे तर नेहमीचेच आहे मावशींचे... अतिरेकी पणा.....बंद कर ती खिडकी !”... इती कन्या!
अच्छा म्हणजे लेकीने किती सहजतेने घेतले हे. पण मला मात्र लहान मुलांवर कुणी हात उचलला तरी खूप राग येतो. लहान मुले ही किती निरागस असतात. त्यांना काय कळते आणि मी म्हणते या गोष्टी तरी त्यांच्या डोक्यात शिरतीलच कशा. बिचारा फक्त तिसरीत आहे आणि “शिवू नकोस मला” हे काय कळण्याचे वय आहे? आई ही तिला बिलगल्याशिवाय कळते होय? त्या लेकराचा तिच्या जवळ जाण्याचा हक्क जगात कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही त्यांच्यापासून, प्रत्यक्ष ती आईसुद्धा का असेना.
कोणत्या जगात वावरतात अजून या बायका? 21व्या शतकात वावरतो आपण आणि अजून ही शिवाशीव पाळतात याचे खूप म्हणजे खूप दु:ख होते गं. या गोष्टी अजूनही समाजात काही घरांत दिसून येतं, हे सत्य नाकारता येत नाही. अजुन ही मुलगी ऋतुमती झाली की जाहीरपणे तिच्या ओटीभरणाचा, फोटोचा कार्यक्रम आमच्यासारख्या काही गावातून केला जातो. याचे वैष्यम्य वाटते. या छोट्या छोट्या मुली आजकाल ८/९ व्या वर्षी सुद्धा वयात येऊ लागल्यात (निसर्गाचा शापच म्हणा) त्या अशा बाजुला बसतात. त्यांना गादीवर झोपू देत नाहीत. जेवण भिका-यासारखे वाढले जाते. शी!!!!!!! नाही अजुन वर्णन करु शकत मी....
स्त्री कुठल्या कुठे पोहचली आहे आज, याची यादी मी देणार नाही कारण ते सर्वांना माहित आहेच. पण जे पुर्वीचे हे स्त्रियांचे वाईट दिवस आहेत ते मात्र 'देवी', 'पोलिओ' सारखे संपायला हवेतच. अगं पुर्वीचे दिवस वेगळे होते. स्त्रियांना प्रचंड प्रमाणात अंगमेहनतीची कामे असत. या ४ दिवसांत तिला पूर्ण शारीरिक विश्रांती मिळावी यासाठी हा उपाय योजला गेला होता. शिवाय हायजिन म्हणून तिला ही काही गोष्टी पाळाव्या लागत. पण आता त्या गोष्टी आजकाल काही आवश्यक नाहीत. पण त्यांना सांगायला, गेले की आमच्यात नाही चालत म्हणून मलाच गप्प करतात. पण एक-दोन ठिकाणी मी सांगून सांगून या प्रथा बंद करायला भाग पाडले आहे. पुढेही माझे प्रयत्न चालुच राहतील.
डॉली आज मला सावित्री बाई फुलेंची खूप आठवण येते आहे गं. त्यांच्या मुळेच मी आज इतके मोकळे बोलू शकते, लिहु शकते, मत मांडू शकते.
काय म्हणतेस? त्या आहेत इथेच?... ग्रेट...
खरचं हॅट्स ऑफ सावित्री ताई तुम्हाला. तुम्ही म्हणजे २०व्या शतकातील फार मोठे गिफ्ट आहात आम्हा महिलांना. तुम्ही हाल सोसले आणि फळे आम्ही चाखतो आहोत. अर्थात तुमचीच ती इच्छा होती म्हणा... आज आम्ही शिकलो सवरलो, कुटुंबाची काळजी घेत सामाजिक जबाबदारीचे ही भान ठेवायला शिकलो आहोत, ताई! आपल्या काही भगिनींनी तर इतकी प्रगती केली आहे की विचारुच नका. काही जणींनी अंतराळात मुक्काम करुन फार मोठी कामगिरीही केली आहे आणि अजुनही करत आहेत. तर काही देशाच्या उच्चस्थ पदाच्या मानकरी ही झाल्यात. एवढेच नाही तर गाड्या, विमाने, मेट्रो,रेल्वे, काय काय नाही चालवत? ताई खरचं आज तुम्ही हव्या होत्या. तुम्ही लावलेल्या रोपट्याचे किती मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले ते तुम्ही बघायलाच हवे असे वाटते. अर्थात तुम्ही इथे आमच्या आसपास असल्याचे जाणवतेच आम्हाला. तरी ही तुमच्याशी बोलायचा मोह नाही आवरु शकले.
ताई या वटवृक्षाखाली मात्र ब-याच काही घटना ही घडतात हो. अजूनही काही चालीरिती, प्रथा या आम्हा बायकांच्या पिच्छा सोडत नाहीत बघा. मघाशी सांगितलेच मी अजून ही काही ठिकाणी कडक सोवळे-ओवळे पाळावे लागते. अंधश्रद्धाच्या नावाखाली काही कुप्रथांना सामोरे ही जावे लागते आहे. तर अजूनही काहींच्या नशिबी हुंडाबळी, अत्याचार,बलात्कार, विनयभंग, या घटना या एकेक पारंब्यांना लटकत आहेत. नव्हे तर या पारंब्यांना या घटनेशी सामोरे जावे लागत आहे. काही काही पारंब्या या जाड आहेत, तर काही पातळ; पण त्या आहेत हे सत्य आहे. वासनांचा चिखल तुडवण्यासाठी म्हणून ही काही पारंब्यांची शिकार केली जाते. .मग त्या पारंब्या कोवळ्या आहेत की जुन्या हे ही पाहिले जात नाही. मग या पारंब्या आक्रोश करतात तेव्हा फक्त पानांची सळसळ होते. क्षणभर वारे सुटते आणि मग सारं काही शांत होतं. पुन्हा नवीन पारंब्याच्या शोधात शिकारी भटकत येतोच.
ताई हे कुठे थांबणार हो?... आपण जेव्हा स्त्रीला उंब-याबाहेर श्वास घ्यायला शिकवत होतात तेव्हा हे आपल्या ध्यानी ही आले नसेल नाही का?
ताई आता तर या पारंब्यांची नुसती चाहुल जरी लागली तरी ती उपटुन टाकुन देतात हो! त्यावेळी किती वेदना होतात आम्हाला. त्या वेदनांची चाहुल जरी लागली तरी आमचे आतडे तुटते, विदीर्ण होते. एवढा मोठा झालेला हा वृक्षसुद्धा हुंदके देऊन देऊन रडतो. आतुन पोखरला जातो. आक्रंदन चालूच असते आमचे. पण आमच्या दु:खाचे साधे पडसाद ही त्यांना ऐकु येऊ नयेत हे आमचे दुर्देव !
त्यातुन ही काही पारंब्या नको त्या ठिकाणी उगवल्याच, तर त्यांना फुलण्याआधीच मीठ चारुन पाणी तोडतात आणि वर दुधाचा अभिषेक करतात. म्हणजे विषबाधेने तिचा मृत्यू अटळच... शिवाय पुराव्या आभावी घडल्याने तेरी भी चुप और मेरी भी चुप!... असे आणि किती किती गोष्टी घडत आहेत ताई. काय सांगू तुम्हाला? यांना कसे कळत नाही की नवीन नवीन पारंब्या उगवल्या, वाढल्याशिवाय ही सृष्टी कशी बहरेल? कशी फुलेल? जर असेच घडत राहिले तर त्यांचा नाश होईलच शिवाय त्यामुळे एक दिवस आमचा हा वटवृक्षाचा डोलाराच कोसळून भुईसपाट होइल आणि मग ताई परत शुन्यातुन सुरुवात करावी लागेल... परत तुम्हाला नव्याने जन्म घ्यावा लागेल....
मात्र ताई त्यावेळी नक्की विचार करुन काही निर्णय घ्यावे आपण असे मला वाटते. तरी ही ती वेळ परत येऊ नये अशीच आमची तुमची सर्वांची इच्छा आहे... हे नक्की!
ताई आज तुमची आठवण झाली आणि तुमच्याशी संवादही साधता आला, ते ही आमच्या या डॉलीमुळेच हं..!
अग बाई! किती वेळ गेला ते समजलेच नाही की गं...
चल बाय! परत भेटूचं...