आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतंगरावांचा ‘बाळ’ हट्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली राजकीय संस्कृती ही ‘वारसावादी’ आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पूर्वी राजे-महाराजांच्या काळात गादीचा वारसदार म्हणून राजपुत्राचीच निवड केली जायची, तसे आताचे राज्यकर्ते आपल्या महान कार्याचा (?) वारसदार म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी यांनाच गादीवर बसवण्याचा हट्ट धरतात.


महाराष्ट्राच्या राजकारणात वारसावादी घराणी काही कमी नाहीत. त्यापैकीच एक आहे वनमंत्री पतंगराव कदम यांचे घराणे. पतंगराव कदम हे तसे राजकारणात स्वयंभू. त्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता; किंबहुना एका फाटक्या कुटुंबात जन्मलेल्या पतंगरावांनी स्वत:च्या कर्तबगारीवर भारती विद्यापीठाचे विश्व निर्माण केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांचे बंधू मोहनराव कदम यांनीही जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:ची स्पेस निर्माण केली. पतंगराव राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना त्यांच्या मतदारसंघाची सारी धुरा मोहनरावांनीच सांभाळली. मात्र, पतंगरावांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र बाळासाहेब ऊर्फ विश्वजित कदम हेच राजकारणात उतरतील, हे स्पष्ट आहे. पतंगरावांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांना सांगली लोकसभा मतदारसंघाची कॉँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी जंगजंग पछाडले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही, याची खदखद आजही त्यांच्या मनात आहे. सांगलीतून निवडून आलेले प्रतीक पाटील राहुल गांधी यांच्या कोअर ग्रुपमध्ये गेले आणि मंत्रीही झाले. त्यामुळे या वेळीही लोकसभेची उमेदवारी बाळासाहेबांना मिळण्याच्या आशा धूसर आहेत. म्हणून पतंगरावांनी आता बाळराजांसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुण्यात सध्या बाळासाहेबांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोहन जोशी हे एकमेव स्पर्धक आहेत.


भारती विद्यापीठाचा मुख्य तळ पुण्यात आहे. विश्वजित कदम गेल्या काही वर्षांपासून भारती विद्यापीठाची धुरा सांभाळत आहेत. शिवाय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांचे नेटवर्क वाढवले आहे. त्यांनी या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा ते भिवघाट काढलेल्या पदयात्रेचे गुडविल राहुल गांधींपर्यंत पोहोचवले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे प्रभारी म्हणून पतंगराव कदम यांनी काम पाहिले आहे. शिवाय विश्वजित यांचे सासरे अविनाश भोसले यांची सर्वच पक्षांत ऊठबस आहे, या सा-यांचा विश्वजित यांना फायदा होऊ शकतो.