आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई दल : शक्तिवर्धक ठरणारे ॲवॅक्स (पराग पुरोहित)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या भूमीकडे येणारे शत्रूचे क्षेपणास्त्र, विमान यासारख्या धोक्यांचा आगाऊ इशारा देऊ शकणारी यंत्रणा म्हणजेच ‘एअरबाॅर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (ॲवॅक्स)’ ही यंत्रणा बसवलेली विमाने भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने ‘शक्तिवर्धक’ (फोर्स मल्टिप्लायर) ठरत आहेत. अशी विमाने भारतीय हवाई दलात कार्यरत असली तरी त्यांची संख्या पुरेशी नसल्यामुळे भारत, इस्रायल आणि रशिया यांच्यातील त्रिपक्षीय कराराद्वारे आणखी दोन ॲवॅक्स यंत्रणा बसवलेली विमाने खरेदी करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

भारतीय हवाई दल १९८० पासून ॲवॅक्स विमानांची मागणी करत होते. त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले ते २००४ मध्ये. त्या वेळी ॲवॅक्स यंत्रणा आणि विमाने पुरवण्यासंबंधीचा सुमारे एक अब्ज डॉलर किमतीचा करार भारत, रशिया आणि इस्रायल यांच्यात करण्यात आला. त्यानुसार भारतीय हवाई दलात ॲवॅक्स यंत्रणा बसवलेली तीन विमाने २००९ पासून सामील झाली. त्या करारातील तरतुदींनुसार अशाच प्रकारच्या आणखी दोन यंत्रणा आणि विमाने खरेदी करण्याला आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याआधी फ्रान्सबरोबर ॲवॅक्स यंत्रणा बसवण्यासाठी एअरबस कंपनीकडून दोन ए-३३० विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव २०१५ मध्ये मंजूर झाला होता. मात्र, त्यावर पुढील वाटाघाटींची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातापासून दक्षिण चीन सागरापर्यंत तसेच मध्य आशियापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत, इतक्या अवाढव्य क्षेत्रात भारताच्या हवाई दलाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. म्हणूनच एवढ्या विस्तृत प्रदेशावर टेहळणी करून तेथून राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्यांची आगाऊ सूचना मिळवण्याच्या हेतूने ॲवॅक्स विमाने भारतीय हवाई दलात सामील करण्यात येत आहेत. आपल्या प्रदेशाकडे आकाशातून येणाऱ्या कोणत्याही धोक्याची माहिती ॲवॅक्सच्या मदतीने आधीच मिळणार आहे. फाल्कन ही ॲवॅक्स यंत्रणा इस्रायलकडून खरेदी करण्यात आली असून रशियन बनावटीच्या आयएल-७६ विमानांच्या सुधारित ‘ए-५० ईआय’ या मालवाहू विमानावर ती एकीकृत करण्यात आलेली आहे. शत्रूच्या हवाई हद्दीच्या आणि हवाई सुरक्षा यंत्रणांच्या टप्प्याच्या बाहेर राहून त्याच्या प्रदेशातील हालचाली आणि संदेशवहन टिपण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. त्याच वेळी शत्रूच्या रडारपासून बचाव करण्यासाठीची यंत्रणाही या विमानांमध्ये बसवण्यात आली आहे. ॲवॅक्स विमानांच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाची ‘सामरिक पोच’ मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली आहे.

ॲवॅक्सच्या मदतीने विविध आघाड्यांवर गेलेल्या लढाऊ विमानांमध्ये समन्वय राखणे शक्य होते. तसेच ऐन वेळी उद्भवलेल्या धोक्याची सूचनाही संबंधित लढाऊ विमानांकडे तातडीने प्रसारित करणे शक्य होते. समुद्रसपाटीपासून १२ किलोमीटर उंचीवरून उडू शकणाऱ्या ॲवॅक्स विमानाच्या वर एक तबकडी बसवलेली असते. ही तबकडी म्हणजे या यंत्रणेतील मुख्य रडार असते. या तबकडीचा भार सहन करण्यासाठी आयएल-७६ विमानाच्या सांगाड्याला जास्त मजबूत करावे लागले. या तबकडीतील शक्तिशाली संवेदकांच्या मदतीने पाचशे किलोमीटर दूरवरील सुमारे १०० धोक्यांची एकाच वेळी सूचना मिळू शकते आणि त्यातील निम्म्या लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला चढवता येतो. रडारद्वारे मिळालेल्या माहितीचे विमानातील संगणकांद्वारे विश्लेषण केले जाते. त्यामुळे माहितीच्या विश्लेषणाचे आणि जमिनीवरील नियंत्रण कक्षाकडे तिच्या प्रसारणाचे काम वेगाने पार पडते. संभाव्य हवाई हल्ल्याचे स्वरूप कसे असेल, त्या धोक्याला कशा प्रकारे उत्तर देता येईल, त्या कारवाईचे स्वरूप काय ठेवता येईल अशा प्रकारच्या अनेक बाबींचे नियोजन करणे ॲवॅक्स यंत्रणेच्या मदतीने शक्य होते. या विमानाच्या जेट इंजिनांना हिंदी महासागरातील उष्ण आणि दमट हवामानाला अनुकूल बनवण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार पाहता त्याला १२ ॲवॅक्स विमानांची गरज भासत आहे. त्याचबरोबर भारताने स्वदेशातच ॲवॅक्स यंत्रणा विकसित केली असून सध्या त्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. ब्राझीलच्या मदतीने भारत या स्वदेशी यंत्रणेवर संशोधन करत आहे. मात्र, त्या विमानांचा पल्ला आणि क्षमता आयएल-७६ विमानावरील यंत्रणेपेक्षा कमी असणार आहे. याबरोबरच पाश्चात्त्य देशांकडून ॲवॅक्स विमानांच्या खरेदी करण्यासाठी मागवलेल्या निविदेला केवळ एअरबस कंपनीकडूनच प्रतिसाद मिळाल्यामुळे तिलाच कंत्राट देण्यात आले आहे. संबंधित निविदा ६ विमानांसाठी काढण्यात आलेली असली तरी सध्या २ विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे.
या विमानांवर ‘ॲवॅक्स इंडिया' कार्यक्रमांतर्गत संरक्षण संशोधन व विकास संघटनेमार्फत (डीआरडीओ) विकसित करण्यात येत असलेली नवी रडार यंत्रणा बसवली जाणार आहे. ‘ए-३३०’ या विमानाचा पल्ला आणि कार्यक्षमता आधीच्या आयएल-७६ विमानापेक्षा जास्त आहे. मात्र, ‘ए-३३०’ या विमानाचे सध्याचे आरेखन ॲवॅक्स यंत्रणा बसवण्यासाठी सुयोग्य नाही. ॲवॅक्स यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा भाग असलेला रॅडोम (विमानावर बसवलेला तबकडीच्या आकाराचा रडार) बसवण्यासाठी विमानाच्या मूळच्या आरेखनात बदल करावे लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी इस्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने हवाई दलासाठी ॲवॅक्स विमानांच्या समावेशाला मंजुरी दिलेली आहे. पंतप्रधानांच्या त्या दौऱ्यात या विमानांच्या खरेदीचा मुद्दा चर्चेला असण्याची शक्यता अधिक ठळक झालेली आहे.
Parag12951@gmail.com
बातम्या आणखी आहेत...