आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाडा महापालिकेचा; तयारी विधानसभेची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची यावेळची निवडणूक दोन्ही काँग्र्रेसच्या प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीच्या निकालाचा राज्याच्या राजकारणावर थेट परिणाम होणार नसला तरी राज्याच्या नेत्यांना आपली शस्त्रे पाजळण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. महापालिका स्थापनेपूर्वीपासून सांगली आणि मिरज या दोन्ही नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होत्या. कुपवाड ही ग्रामपंचायत होती आणि ती माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्र्रेस आणि जनता दलाच्या संयुक्तपणे ताब्यात होती. 1998 ला तिन्ही शहरांची मिळून महापालिका झाली आणि पहिली निवडणूक माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकली. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. मदन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तेव्हापासून (2003 चा अपवाद वगळता) ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली. बदल फक्त एकच झाला 2008 च्या निवडणुकीत मदन पाटील काँग्रेसमध्ये गेले आणि जयंत पाटील यांच्या नेतृृत्वाखाली राष्ट्रवादीसह अनेक पक्षांचे कडबोळे असलेल्या महाआघाडीच्या ताब्यात सत्ता गेली. मात्र, यात सत्ताधारी म्हणून प्रमुख भूमिका राहिली ती राष्ट्रवादी काँग्रेसचीच.


गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहिले. महाआघाडीतील दुसरा प्रमुख पश्र असलेल्या भाजपचे आधी जयंतरावांशी फाटले आणि नंतर त्यांच्या पक्षाच्या महापौर इद्रिस नायकवडी यांनी जयंतरावांना खंडाळ्याचा घाट दाखवला. त्यामुळे या वेळी सारीच समीकरणे बदलली. गेल्या वेळी मदन पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सारे एक झाले आता जयंत पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप, राजू शेट्टी, जनता दल नुरा कुस्ती खेळत आहे. सध्याच्या एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला तर इथे कोणालाच बहुमत मिळण्याची शक्यता नाही. लोकभावना काँग्रेससोबत असली तरी जयंत पाटील यांना निवडणुका जिंकण्याचे तंत्र अवगत आहे. त्यामुळे 78 पैकी 30 जागा जिंकल्या तरी महाआघाडीच्या चिंध्या करून आणि अपश्रांना सोबत घेऊन जयंत पाटील सत्ता स्थापन करू शकतात. कारण, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने राज्यात अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजप, शिवसेनेशी युतीचा पॅटर्न राबवला आहे. याउलट सत्तेची संधी आल्यास भाजपला सोबत घेताना काँग्र्रेसला दहावेळा विचार करावा लागेल. कारण, पुढीलवर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा प्रमुख विरोधक असेल भाजप. शिवाय सांगली विधानसभा मतदारसंघात तर काँग्रेसला थेट भाजपशीच दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवण्याशिवाय पर्यायच नाही. आता प्रश्न उरतो, राज्य आणि देशाच्या राजकारणात वावरणारे नेते एका गावाच्या निवडणुकीत इतके का इंटरेस्ट घेत आहेत,याचा.

खरे तर पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही. त्यामुळे ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीमच ठरली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच थेटपणे ही निवडणूक असली तरी महापालिका श्रेत्रात भाजपचे दोन आमदार आहेत. त्यांना पुढील निवडणुकीचा प्लॅटफॉर्म तयार करून ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी येथे सभा घेऊन आपली हत्यारे पाजळली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राज्यस्तरावर सुरू असलेली खदखद बाहेर काढण्याची संधी मिळाल्याने या दोन्ही पश्राच्या नेत्यांनी येथे येऊन एकमेकांविरोधात तलवारी उपसल्या आहेत. म्हणूनच या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी मतमोजणी होऊन, मनपाचा निकाल लागेल.