आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बा भीमा... (दीर्घ कविता)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मण्या ओवणारी आई म्हणते
ही तुझी पाटी पेन्सिल
गिरव धडा बाबासाहेबांचा
सुरूवात कर..
आ आंबेडकरांचा
अन् गिरव त्यासोबतच
घ घामाचा
क कष्टाचा
ल लढ्याचा
स संघर्षाचा...

आता शाळेत बसतात एकाच बाकावर
डॉक्टर, इंजीनिअर अन् सफाई कामागाराची मूलं
शिकतात तेच सारखे धडे
येतो फी-माफीचा फॉर्म
येतो अफजलखानाचा धडा
फिरफिरतात नजरा
बाकं मग इकडून तिकडे सरसरतात
बुक्याचा मार खाऊन मुका
आटपतं वंदे मातरम अन् घास म्हणून पाणी डोळ्यातलं
गिळलं जातं आतल्याआत...
बा भीमा...
एकांतात असताना मी करतो विचार
आज तू असतास तर..
तू फक्त नऊ कोटी जीवांनांच नसतं दिलं अभयदान
तू उगारली असती तुझी वज्रमुठ
अन् सांगितलं असतं ठणकावून
इराक, इराण, सिरीया, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, रेड कॉरीडॉर
नाहीयेत नावं फक्त युद्धांची
तिथं जमा होऊन येतेय रास मढ्यांची
तू जोडून पाहीली असती ती आपल्याच देशातल्या मढ्यांशी
तू जोडून सांगितला असतास दूवा वैश्विक शोषितांचा
अन् उगारला असतास यल्गार सार्वभौम मुक्तीचा

बा भीमा... तू असतास तर ...
लागला नसता वेळ अंधश्रद्धा विरोधी कायद्याला
अन् वाचलेही असते दाभोळकर, पानसरे अन् कलबुर्गी
कायदे – न्याय वगैरे तूझ्यासाठी हातचा खेळच
त्यांना जन्माला घालताना तू शिकवलास थॉट
जगभरातील शोषितांना समान धाग्यावर आणण्याचा
अन् पवित्रा निर्णायक बंडाचा

म्हणूनच...
ते घाबरताहेत तुला अन् तुझ्या सावलीलाही
ते भितात तुझ्या रोखठोक तर्जनीला
जी दिशानिर्देश करतेय सामाजिक न्यायाकडे
जी खुणावतेय प्रगतीच्या मार्गांना
जी सांगतेय विचार स्वतःकडून स्वतंत्रतेकडे
जी चेतवतेय यल्गार
जी रंगवतेय कॅनव्हास लढ्याचा
जी दाखवतेय रस्ता सूर्याचा
ते घाबरताहेत तुला
कारण तू एकच पूर्ण सूर्य
ज्याच्या हातातल्या एका पुस्तकानं
त्यांना रोखून धरलं 68 वर्ष
त्यांना बांधलंय अनंतकाळासाठी
म्हणून रचतायेत ते कट
तुला बांधतायेत स्मारकात

बा भीमा...
सगळ्यांनाच माहीत असतं
26/11, 7/11, 6/12
पण बाथे टाकलं जातं विस्मृतीत
भेद पाळला जातो शिवाशिवीचा रमाबाई नगराशी
नी खर्डा, जवखेडा, शिर्डी, फरिदाबाद ब्रेकिंग पुरतं वापरलं जातं
अन् त्यांचा अट्टाहास फक्त स्टेटस अपडेटचा...

सोकावलाय काळ
अन् सोकावलेयत त्याचे मक्तेदार
त्यांनी माणसाला बनवलंय हैवान
त्यांना मजा घ्यायचीये माणूस हरल्याची
अन् गाडलेल्या माणूसकीची
तुझ्या घटनेची खेळी खेळून
त्यांनी खुन्याला केलं प्रधान
सत्यमेव जयते.. बहुजन हिताय.. बहुजन सुखाय
बिरूद मिरवणारं आसन
खुनी हाताचा सहन करतंय अपमान
मग तिथं राष्ट्रगीत ठरलंच 52 सेकंदापुरतीची राष्ट्रभक्ती
नी बीफ नाकारण्याचा अट्टाहास ठरला पवित्र नी देशभक्ती
तर नवल त्यात काय ?
तोंडी लावायला कॉर्पोरेटचे दरवाजे उघडलेय थोडेसे
कारण अफर्मेटिव्ह अक्शन नसतोच डिक्शनरीत
भांडवलदारांना हवीय फक्त
त्यांच्या सोयीनं परवडणारी श्रमशक्ती...
श्रमाची बोली कमी जीवाहून
रिकाम्या पोटानं कष्टणाऱ्यांसाठी
विचारांपेक्षा मोठी असते रगती
ती रगती जीवंत रहायला दिवसाचं बळ देते
ही काँन्स्पिरसी दिसत नाही भुकेल्या डोळ्यांना
भूक मात करते विचारांवर
नी आम्ही बनतो लुंपेन
पोटाची भूक करत जाते हलाल जीवंत माणसांना
चिरत जाते दगडाचंही काळीज लेकीबाळांसाठी
तसं पोट असतंच भूकाळलेल्या राक्षसांचं आगार
दोन वेळच्या भाकरीत गुंतवून करून टाकलाय आमचा बूर्झ्वा
पण, खरंच आमच्याठाई तेवढंही औदार्य नाही
की यावं फिरून तुझ्या पायी, मागावी माफी
करावा कबूल गुन्हा
की मानली भाकरी मोठी स्वाभिमानापेक्षा
की हरलो आम्ही अर्थकारणाच्या गणितात
नी निष्प्रभ ठरलो जात-वर्गांच्या दऱ्या सांधायला
नव-ब्राह्मण म्हणतील मला असहिष्णू
फिकीर नाही
जर हवी असेल सर्वांनाच सहिष्णूता
त्यांनी सिद्ध करावी स्वतःची मानवता
रोखून धरावेत हिऱ्यांचे दागीने
ज्यात मला दिसतात फक्त शस्त्रधारी
अन् लहानपण हरवलेली काळी मुलं
भोकं पाडावी लेवीश क्रुजर्सना जी नासवतात पर्यावरण
फोडून टाका स्टॉक मार्केटच्या रेड्याचे वृषण
जो संपत्तीच्या असमान वाटपाचं प्रतिक
टेस्टेस्टेरॉनसारख नेतोय वाढवत
उद्धवस्त करून टाका ते सारे मॉल्स आणि चकाकती उंची दुकाने
जिथे कधी काळी वसत होता कामगार
आता त्याची थडगी सुद्धा बेसमेंटमध्ये विरलीयेत
बंद करा विकत घेणं प्लेबॉय अन् सबस्क्राईब करणं पॉर्न साईट
जी आहेत महाद्वारं स्त्री-शोषणाची
एक तरी दगड भिरकावून मारा त्या मल्टिनॅशनल्सवर
ज्यांनी चोरल्या नद्याच्या नद्या, आणि जमीनी, डोंगर आणि हवा
टांगलं शेतकऱ्यांना फासावर
उद्धवस्त केली सुपीक जमीन जीएम फुडनं
आणि हडप केलं कामागारांचं वेतन
या साथीला, तुरूंग फोडायला
ज्यात कैद आहेत कित्येक पूर्वास्पृश्य फक्त
जातीची कैद भोगत पुन्हा पुन्हा ट्रायलची वाट पाहत...
बा भीमा
मला माहीतीये ह्यात ते येणार नाहीत कुणी
त्यांचा अपराधबोध छळतोय त्यांना
गिल्ट काँन्शीयसनेस
मी म्हटलं आंबेडकरी त्यांनी म्हटलं महारच
मी म्हटलं संविधानवादी त्यांनी म्हंटलं नक्षली
मी म्हटलं स्वतःला पुरोगामी त्यांनी म्हटलं जातीयवादी

हो आम्ही हरणार नाही, थांबणार नाही...
तुझी प्रेरणा चेतवतेय
अन् राहील निरंतर
मनात आणलं अस्तंस तर तू घेऊ शकला अस्तास सूड
तुझ्या सहस्त्रांतील दुश्मनांचा
पण तू दरियादिल बादशहा
दुश्मनाच्या ओंजळीतही टाकलंस दान प्रेमाचं

बा भीमा...
6 डिसेंबर 2015 ला भरलाय पुन्हा सोहळा कृतज्ञतेचा
पण तुझ्या जागेवर उभा राहणारा सूर्य़ जन्माला येणं आता शक्य नाही
तूझ्या निग्रही छायेखाली नांदणारे असंख्य समुद्र
वाकवत राहतीलच या तुफानी संकटांना
बाबा, तुझी लेकरं साधीभोळी
संत, महामानव, युगंधर यांपेक्षाही तू
खूप काही सर्वांसाठी
तुझा शब्द न शब्द जागवतो ऊर्जा
वादळात झाडं उन्मळून पडावी
एवढी शक्ती भरत जाते हातांत
ही हवा, पाणी, जमीन, वारा, आकाश सारं काही
गदगदून जातं फक्त तुझ्या असण्यानं...
गदगदून जातं फक्त तुझ्या असण्यानं...
कवी - वैभव छाया...
बातम्या आणखी आहेत...