आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Dispute In Maharashtra, Raj Thackeray Vs Ajit Pawar

घड्याळाने दिला इंजिनाला धक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची राळ नेहमीच उडवली जाते. मात्र आरोपांनंतर व्यथित होऊन रस्त्यावर उतरून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न काँग्रेस वा राष्ट्रवादीकडून क्वचितच केला गेला. या सगळ्यात पुढे शिवसेना होती आणि आता ती जागा नवीन महाराष्ट्र बनवण्यास सज्ज झालेल्या राज ठाकरे यांच्या नवनिर्माणात व्यग्र असलेल्या सेनेने घेतली असल्याचेच चित्र गेल्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात दिसून आले. मात्र मनसेला प्रथमच रस्त्यावर उतरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आणि मनसेच्या इंजिनाला चांगलाच धक्का दिला.
राज ठाकरे यांनी नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘राजकारण करण्यासाठी लवकर उठावे लागते’ असे वक्तव्य करीत राज ठाकरे यांच्या उशिरा उठण्यावर बोचरी टीका केली होती. अर्थात राज ठाकरे यांनी त्याला त्यांच्या शब्दांत योग्यरीत्या उत्तरही दिले होते. मात्र राज ठाकरे शरद पवारांचे हे वक्तव्य विसरू शकले नाहीत आणि कधी विसरणारही नाहीत, असेच त्यांच्या सोलापूरमधील भाषणावरूनही दिसून आले. महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी एकहाती सत्ता प्राप्त करण्याचे आवाहन करीत संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे. खेडमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका, कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर टीका करतानाच ‘आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर महाग पडेल’ असा इशारा दिला. यावर अजित पवार अणि गृहमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी सोलापूरमधील भाषणात पुन्हा एकदा अजित पवार यांना टार्गेट केले. मात्र या वेळी राज ठाकरे यांची भाषा अत्यंत वाईट होती. राज ठाकरे हे आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे आजपर्यंत जाणवले होते; परंतु सोलापूरमधील भाषणात त्त्यांनी बाळासाहेबांची दुहेरी अर्थाचे शब्द वापरण्याची शैली उचलत अजित पवारांवर टीका केली. राज ठाकरे यांच्याकडे राज्यातील सुशिक्षित तरुण-तरुणी मोठ्या आशेने पाहत आहेत. राज यांचे वक्तव्य आणि वेगळा महाराष्ट्र तयार करण्याचे त्यांचे स्वप्न तरुणाईला भावले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे तरुणांचा ओढा वाढू लागला आहे. परंतु त्यांची सोलापूरमधील शिवराळ भाषा आजच्या तरुणाईला मुळीच आवडलेली नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणाºया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही भाषा आवडली नाही आणि त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात निदर्शने करण्याचे ठरवले. केवळ निदर्शनेच केली नाहीत तर राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेकही केली. रात्री ही बातमी आल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणार हे निश्चित झाले. त्याच रात्री मुंबईतून 50-100 गाड्या भरून मनसैनिक अहमदनगरकडे नेण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु राज ठाकरे यांनी असे न करण्यास सांगितल्याने मोठा संघर्ष टळला. मात्र मुंबई, ठाणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली असे सगळीकडे त्याचे पडसाद उमटले आणि अजित पवार यांचा पुतळा जाळण्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यालये फोडण्यापर्यंत मजल गेली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून राज ठाकरे यांनीच आपल्या कार्यकर्त्यंाना शांत राहण्याचा सल्ला देत जालना येथील सभेत याबाबत बोलू असे सांगितले. राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या आंदोलनामुळे अगोदरच प्राध्यापकांच्या संपामुळे अडचणीत आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे संकट उभे राहिले होते. परंतु राष्ट्रवादी आणि मनसे नेत्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केल्याने मोठा संघर्ष टळला.
राडा संस्कृतीतील तरुण फक्त शिवसेनेत आणि मनसेतच आहेत असे नाही तर ते राष्ट्रवादीमध्येही मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु ते या दोन पक्षांप्रमाणे सर्रास रस्त्यावर उतरत नाहीत. त्यांना जे करायचे असते ते अगदी गुपचूप आणि नकळत करतात असे सांगितले जाते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला कॉर्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचीच साथ धरली होती. यात त्यांना सत्तेची ऊबही चाखायला मिळाली. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हलक्या शब्दांत टीका होताच या तरुणांनी रस्त्यावर उतरण्याचे ठरवले आणि राज ठाकरे यांना पहिला धक्का बसला. याचे कारण एवढेच की, आजवर शिवसेना वा मनसेच्या नेत्यांनी टीका केल्यानंतर त्याला रस्त्यावर उतरून कोणी आव्हान दिले नव्हते.
राष्ट्रवादीने मनसेला आव्हान दिल्यानंतर पुढे-मागे आपल्यालाही आव्हान मिळू शकते ही बाब लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या लहान भावाच्या मदतीला धावले. खरे तर टाळीसाठी उद्धव ठाकरे यांनी पुढे केलेला हात राज ठाकरे यांनी केवळ नाकारलाच नाही तर अत्यंत कटू भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. तरीही उद्धव ठाकरे यांनी राज यांना समर्थन देत पोलिस संरक्षण न घेता रस्त्यावर उतरा असे आव्हान राष्ट्रवादीला दिले. एकूणच घड्याळाच्या सेकंदकाट्यांनी रस्त्यावर उतरून इंजिनाला धक्का दिल्याने केवळ इंजिनच नव्हे, तर धनुष्यबाणही घायाळ झाल्याचे चित्र या एकूण प्रकरणावरून दिसले.