आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज- आम्ही काय दादांकडून घेणार व तुम्हांला देणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग नऊ वेळा राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केलेले विक्रमवीर जयंत पाटील सध्या ग्रामविकासाच्या कामात गुंग आहेत. नुकताच त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा झाला. पर्यावरण संतुलित योजनेच्या यशामुळे मिळालेलं समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होतं. या अभियानाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपये आपण गावागावांना देऊ शकल्याचा अभिमान त्यांनी भाषणातून व्यक्त केला. आजरा पंचायत समितीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी मात्र आमदार के. पी. पाटील यांनी त्यांना चिमटा काढला. जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आजर्‍याच्या दौर्‍यावर आले होते तेव्हा त्यांनी या शहराच्या विकासासाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यांच्या तुलनेत जयंतरावपण काय कमी आहेत, अशातला भाग नाही, असा टोला त्यांनी लगावला. पण जयंतराव हेदेखील कच्च्या गुरूचे चेले नसल्याने त्यांनी आपल्या भाषणात याला त्याच भाषेत उत्तर दिले. आपण काय दादांएवढे मोठे नाही आणि अजितदादाच अर्थमंत्री असल्याने त्यांच्याकडूनच पैसे घेऊन मी तुम्हाला देणार आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले. एकदा सांगली महानगरपालिकेच्या राजकारणात सगळीकडून तोंड पोळल्यानंतर आता ताकसुद्धा फुंकून पिण्याची भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.

टोळ - धाड
साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गावाबाहेर पडले की वाहनचालकाला भीती वाटायची ती वाटमारी करणार्‍यांची, आता आहे ती टोल नाक्याची. कुठलेही गाव सोडले रे सोडले की टोल नाका आलाच म्हणून समजा. औरंगाबाद - पुणे मार्गावर तर गंमतच आहे. तब्बल 5 टोल नाके आहेत 220 कि. मी.साठी प्रत्येक टोल नाक्यावर अधिकृत टोल वसुलीसोबत प्रत्येक लेनमध्ये एक तृतीयपंथी आवर्जून उभा असतो. वाहन थांबताच तो टाळी वाजवतो आणि नाका आल्याची वर्र्दी देतो. आत कोणी झोपले असेल तर त्याला उठवण्याचे महान कार्य एका टाळीने होते, उठलेला व्यक्ती ही चडफडत आला वाटत नाका म्हणत एखादी शिवी हसडतो टाळी कानावर पडताच तो ‘मिनी टोल’ देऊन खर्‍या टोलसाठी सज्ज व्हायचे. पुढे पोप्कोर्ण, मिनरल वॉटर विकणारे खिजवातात. सरतेशेवटी टोल नाक्याचा उर्मट कर्मचारी छदमीपणे हसत आता कसं सापडलातच्या अविर्भावात पावती फाडतो. (टाळी न वाजवता) एका नाक्यावर कित्येक जणांना रोजगार देण्याचे हे महान कार्य शासन करीत आहे. आता महिला, युवक आघाडीप्रमाणे तृतीयपंथी आघाडी ही प्रत्येक पक्षाने स्थापन करावी. मतपेटीकडे लक्ष ठेवून हालचाली करणार्‍या नेत्यासाठी हा आगळा वेगळा प्रयोग मतदानात 1 /2 टक्के वाढ करून देईल, यात शंका नाही.

आक्रमक अतिभव्य महायुती आणि महायुती
निवडणुका जवळ येत आहेत, तसे अधूनमधून महायुती होणार की, नाही याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न लाभाचे पद असणार्‍यांकडून जाणीवपूर्वक करण्यात येतो....पण ठोस काही होत नाही. मात्र, गेल्या आठवड्यात एका वादग्रस्त विषयावर एक अतिभव्य युती उदयास आली. फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा म्हणून सर्वच पक्ष व नेते एकत्र आले व हळू आवाजात एक एक करून राजीनाम्याची मागणी केलीदेखील. सुरुवात केली अर्थातच सीनियर पवार साहेबांनी. त्यांचा मोलाचा वाटा काही ठिकाणी निश्चितच आहे, जसे सहकार, साखर कारखाने, कृषी व क्रिकेट म्हणजे या क्षेत्रात पवार साहेबांनी दिलेले मत अंतिम मानले जाते, त्यांचे एखादे वाक्य म्हणजे इतरांसाठी इशारा असतो की, आखाड्यात जमा व षड्डू ठोकायला सुरुवात करा. खिडकीतून डोळे मारण्याची ही एक वेगळी पद्धत युुतीसाठी देव पाण्यात ठेवणारांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. कुठलेही प्रकरण यशस्वीपणे हाताळण्याची सीनियर पवार साहेबांची ही हातोटी शिकायची की, महायुती अस्तित्वात येण्यासाठीसुद्धा पवार साहेबांना पडद्यामागून हालचाली कराव्या लागतात हे पाहाणे आगामी काळत रंजक ठरेल.

जयंत पाटलांची डोकेदुखी
सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्वाची मनीषा बाळगणार्‍या ग्रामिणविकासमंत्री जयंत पाटील यांना सध्या स्वकीयांच्या कुरघोड्यांचाच सामना करावा लागत आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे महापौर इद्रिस नायकवडी यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून लावल्यानंतर आता मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू झाली आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष इब्राहीम चौधरी यांच्यावर अविश्वास ठराव मांडून त्यांना बाजूला केल्याने त्यांनी आता पश्रांतर्गत विरोधकांशी बैठकीतच भांडण काढले. अंतर्गत भांडणे मिटवण्यासाठी जयंत पाटील यांना मध्यस्थी करावी लागली. महापालिकेची निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली असताना जयंत पाटील यांना या अंतर्गत कुरघोड्या परवडणारया नाहीत. एरवी दुसर्‍या पक्षांत भांडणे लावून गंमत बघत बसणार्‍या राष्ट्रवादीच्या या नेत्याला सध्या आपल्याच पश्रातील बंडाळ्यांनी हैराण केले आहे.