आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन श्याम रंगी रंगले..!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळजाचा रंग केसातून व्यक्त होणे आवश्यक नसते. आमच्या नेतेमंडळींचे काळीज साफ आहे, पवित्र आहे. ते विशाल आहे, तरुण आहे. पण जे पुरुष आहेत, त्यांच्या काळजाचे नेमके वय त्यांची प्रियतमाही सांगू शकत नाही. विज्ञानानुसार केस म्हणजे मृत पेशींचा समूह असतात. पण तरीही ते जिवंत लोकांच्या वयाचा दाखला बनून मिरवत असतात. नेता हा तरुणच असावा असे गांधीजींनी म्हटले नव्हते. कारण त्यांनी केसांना फार आधीच निरोप दिला होता. म्हणून त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. पण ज्यांच्या डोक्यावर केस आहेत, त्यांच्या भावना फक्त तेच समजू शकतात.

केस काळे असतील, घनदाट असतील तर अधिक चांगले असेही नाही. प्रत्येक निवडणुकीगणिक राहुल गांधी बालंबाल बचावतात. अनुभवी नसल्याची टीका सतत होत असल्याने ते कधी केसांना कलप करत नाहीत. एखाद-दुसरा पांढरा केस राजकारणात अनुभव प्रमाणपत्राची भूमिका बजावतो. त्यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी केसांचा अनोखा ताळमेळ बसवला होता. त्या केसांना कलपही करत आणि एक बट तशीच ठेवत. स्टाइल स्टेटमेंट आणि अनुभवाचे प्रमाणपत्र. अद्याप पूर्ण संमती मिळालेली नाही, पण बहुमत या बाजूचे आहे की, शुभ्रतेची चमक फक्त कपड्यांपुरतीच मर्यादित राहिलेली चांगली, केसांची केसच वेगळी आहे.

चीनच्या एखाद्या नेत्याचे पिकलेले केस पाहिल्याचे आठवते? चीनच्या जनतेनेही अद्याप ते पाहिलेले नाहीत. त्या नेत्यांच्या घरातील भिंतींनाही अमावास्या-पौर्णिमेलाच पिकल्या केसांचे दर्शन होत असेल. केसांना कलप करून वय लपवून ठेवा, असा चिनी नेत्यांवर कम्युनिस्ट पार्टीचा दबावच असतो. या लालभडक देशाचे नेतृत्व फक्त काळे केसच करू शकतात. शहाजहानचा शुभ्र ताजमहाल लाखो हृदयांसाठी प्रेमाचा मुकुटमणी असेल, पण या हुकूमशहांच्या डोक्यावरील मुकुट मात्र काळाच चांगला. एकापाठोपाठ एक हुकूमशहा पदच्युत होऊ लागताच हेअर डायच्या कंपन्यांवर मंदीचे सावट दाटून आले. कारण हे हुकूमशाहा त्यांचे शाही ग्राहक असतात. मुबारक असो, गद्दाफी असो की दुसरा कोणी, सगळेच हुकूमशहा श्यामरंगात रंगून जात आणि मग जनताही त्याच रंगात रंगत असे.

लोकशाहीचा एक फायदा म्हणजे त्यात काळे आणि पांढरे यामध्ये निवडणूक घेता येते. क्लिंटन आणि बुशनंतर आता ओबामा, सगळ्यांचेच केस पिकले. व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्रपतींच्या डोक्याला थोडा व्हाइट कलर बहुधा लागतोच. अर्थव्यवस्थेची चिंता आणि पाकिस्तानशी मैत्री यामुळे भल्याभल्यांचे रंग उडतात. मग तुम्ही अमेरिकी असाल तरीही त्यापासून वाचू शकत नाहीत. आपल्या लोकशाहीचा रंगच वेगळा आहे. येथे मुलगा जयंत याचे केस पांढरे असू शकतात, पण त्याचे वडील अजितसिंग यांच्या केसांचा काळेपणा तेवढाच गडद आहे, जेवढा त्यांचा शर्ट शुभ्र आहे. बेनीप्रसाद वर्मा यांचे केस आणि वाणी यांचा रंग सारखाच. चिदंबरम यांनी हेअर डायवर कर न लावण्याचे गुपित काय असेल ते असो, पण त्यांचे सहकारी त्यांना ब्रँडचे नाव विचारतातच. शिवराजसिंह चौहान, कमलनाथ, सुबोधकांत सहाय.., यादी मोठी आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे केस पगडीखाली असले तरी ते काहीही लपवत नाहीत हे त्यांच्या दाढीवरून लक्षात येतेच.

पण आता संस्कृती बदलते आहे. देशाचा रंगही बदलतो आहे. लोक आता केसांना इलेक्ट्रिक ब्ल्यू, ग्रीन आणि ब्राइट रेड करत आहेत. कॅन्सरकारक रसायनांनी केस रंगवण्याचा असा सपाटा लावला आहे की रंग उतरेल तेव्हा ब्लीच करण्यासाठी डोक्यावर काही शिल्लक असेल की नाही, शंकाच आहे. मध्यंतरी दारुल उलूम देवबंदने एक फतवा जारी केला की, ही रसायने केसांच्या मुळांशी पोहोचून वजू नष्ट करतात, म्हणून मेंदी लावा. या फतव्याने हेअर डाय कंपन्यांचा रंगच उडाला. पण केस आणि दाढी लालसर केशरी पाहून या कंपन्यांनीही मेंदीचे रंग बाजारात आणले. सर्वांनाच ते पसंत पडले. अगदी ओसामा बिन लादेनलासुद्धा. पाच वष्रे घरात बंद असूनही तो नियमितपणे डाय करत असे. त्याचे एन्काउंटर करणार्‍या टीममधील एका सैनिकाने सांगितले की त्याच्या खोलीत बंदुकीची एक गोळीही सापडली नाही, पण हेअर डायचा एक बॉक्स सापडला. खोलीत बंदुकीच्या गोळ्यांचा बॉक्स असता तर केसांना डाय न केलेला लादेन म्हणाला असता,‘ डाय अनदर डे’

देव आपल्याला काळे केस देतो, ते काळेच ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. लालूप्रसाद यादव, सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल यांच्यासारखे निसर्गप्रेमी लोक काळे फासत नाहीत. असो. केस काळे असोत वा नसोत, तोंड काळे होऊ नये, याची काळजी घ्यावी म्हणजे झाले!

नेत्यांच्या केस काळे करण्याच्या मानसिकतेवर कमलेश सिंह यांचे भाष्य