आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएसआर फंडातून आदर्श ग्राम; मराठी पाऊल देशासाठी दिशादर्शक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये हिवरे बाजारची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी आदर्श गाव अभियान जाहीर करताना अमिताभ बच्चन, रतन टाटा, आनंद महिंद्रा यांच्यासोबत ग्रामसभांचा प्रतिनिधी म्हणून निमंत्रित केले. या दोन्ही घटना माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत’, असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. २०१८ पर्यंत राज्यातील हजार गावांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने उद्योजकांच्या सहभागातून आदर्श ग्राम अभियान सुरू केले अाहे. त्याच्या सल्लागार समितीवर निवड झालेल्या पवारांशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद.
प्रश्न : अभियानाकडे कसे बघता?
पवार: महाराष्ट्राने देशाला रोजगार हमी कायदा, निर्मल ग्राम अभियान अन् पाणलोट विकासाची चळवळ दिली. त्याच धर्तीवर सीएसआर फंडातून आदर्श ग्राम विकासाचे अभियान हे महाराष्ट्राचे पाऊल संपूर्ण देशासाठी दखलपात्र ठरेल, असा विश्वास अाहे.

प्रश्न: ग्रामीण विकास आणि आदर्श ग्राम यात फरक काय?
पवार: ग्रामविकास, जलसंधारण, कृषी, वने, शिक्षण, आरोग्य ही खाती स्वतंत्रपणे काम करत असतात. त्यांचा समन्वय नसतो. दुसरीकडे उद्योग क्षेत्रांकडून केली जाणारी कामेही काही ठरावीक भागातच झाली. संपूर्ण गाव हे युनिट धरून हे अभियान अाहे.
प्रश्न: ग्रामविकासासाठी पुरेसा निधी शासनाकडे नाही का?
पवार: निधीची कमतरता नाही, तर पैशांचा विनियोग योग्य प्रकारे होत नाही. या अभियानाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल. उद्योग क्षेत्र त्यांचा निधी थेट मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करतील. मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतील. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समित्या काम करतील.
प्रश्न: एक हजार गावांची निवड कशी होणार ?
पवार: मानवी विकास निर्देशांकामध्ये मागे असणाऱ्या तसेच २५ टक्के आदिवासी गावांचा अभियानात समावेश केला जाईल. आज राज्यातील ५२ टक्के गावे दुष्काळी, ८२ टक्के शेती कोरडवाहू आहे. अशी विकासापासून वंचित गावे निवडली जातील. ५० टक्के गावे उद्योग संस्था, तर ५० टक्के गावे शासन निवडेल.
प्रश्न: मग ग्रामविकास खाते काय करेल?
पवार: ग्रामविकास खातेच नव्हे, तर यात सर्वच खात्यांच्या कामांचा समावेश आहे. यात जलयुक्त शिवार, संयुक्त वन व्यवस्थापन, नद्या संवर्धन, सांडपाणी नियोजन, प्राथमिक शिक्षण सुधारणा, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण पाणीपुरवठा आदी सर्व अभियानांची यात सांगड घालण्यात आली.
प्रश्न: प्रत्यक्ष काम कसे होईल?
पवार: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कार्यकारिणीची स्थापना करण्यात येईल. त्यात १० कोटींपेक्षा जास्त निधी देणाऱ्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, शासन, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असतील. सीएसआरमधून जेवढा निधी संकलित होईल, तेवढाच निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यात घातला जाईल.
प्रश्न: मग ग्रामसभांनी काय करायचे?
पवार: ग्रामसभांनी सुचवलेले जिल्हाधिकारी पुढे सुचवणार. त्याशिवाय या हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो नियुक्त केले जातील. त्यांची निवड, प्रशिक्षण याबाबत मुंबईच्या आयआयटीतर्फे आखणी केली जात आहे.
प्रश्न: गावांच्या संसाधनांवर उद्योग क्षेत्राचे वर्चस्व निर्माण होण्याचा धोका नाही का?
पवार: वर्षाखेरीस स्वतंत्र यंत्रणांद्वारे आर्थिक, सामाजिक ऑडिट होणार आहे. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हिवरे बाजारसारखी आदर्श गावे उभी राहिली; पण आता ती संधी राज्यातील एक हजार गावांना मिळेल. हिवरेबाजारचे यशस्वी नियोजन हा याचा आधार असणार आहे.

बच्चन, आमिर, सचिनचा सहभाग :
ज्येष्ठअभिनेते अमिताभ बच्चन यांचाही अभियानात सहभाग असणार आहे. सिनेअभिनेते आमिर खान आणि सचिन तेंडुलकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी या अभियानात निमंत्रित केले आहे. सहभागी होण्याबाबत त्यांनी त्यांची संमती कळविली आहे.

उद्याेगांकडून स्वागत
ग्रामीण विकासासाठी शासन, उद्योजक एकत्र येण्याची देशात पहिलीच वेळ आहे. उद्योजक म्हणून सीएसआरमधून लोकोपयोगी कामे करत असतो. आता आदर्श ग्राम विकास अभियानाच्या माध्यमातूनही आम्हाला महत्त्वाचा सहभाग देता येणार आहे. उद्योग क्षेत्राने याचे स्वागत केले आहे. हे स्वतंत्र आणि संयुक्त अभियान असणार आहे. सरकार फक्त पूरक भूमिका निभावणार आहे. राजकुमारधूत, उद्योजक.

नेतृत्वाचे अाव्हान
ग्रामीण विकासासाठी शासन, उद्योजक, समाज या सर्व घटकांना एकत्र आणणे अभिनंदनीय आहे. ग्रामीण विकास ही संकल्पना निधी ओतून, सरकारी आदेश काढून एखादी योजना राबवावी तशी नाही. यात गाव हे केंद्रभूत हवे. गाव सक्षम करावे, गावाचा सहभाग घ्यावा लागेल, गावातून तसे नेतृत्व उभे करावे लागेल. हे या अभियानापुढचे आव्हान आहे. डॉ.अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते.
बातम्या आणखी आहेत...