आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
चिंतन करण्यासारखा प्रश्न
आपल्या देशात दोन प्रसिद्ध घोषणा आहेत - ‘... संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं’ आणि दुसरी - ‘... आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं.’ या दोन्ही घोषणांमध्ये फरक एकच की, एका घोषणेत ‘संघर्ष’ करताना साथ देण्याचे म्हटले आहे, तर दुस-या घोषणेत ‘पुढे जाताना’ ज्याला साधारणपणे पोस्ट आणि पोस्टिंग वगैरे म्हटले जाते, अशा स्थितीत साथ देणार असल्याचे सांगितले जाते. जयपूर येथे झालेल्या
काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींना उपाध्यक्ष केल्याचे जाहीर होताच घोषणा सुरू झाल्या - ‘राहुलजी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।’ अखेरीस एका ज्येष्ठ नेत्याने न राहवून म्हटले की, सगळा संघर्ष राहुलजी करणार असतील, तर मग तुम्ही काय कराल? खरोखरच चिंतन करण्यासारखा प्रश्न आहे.
टॅलेंट हंट
सुशीलकुमार शिंदे यांची वैयक्तिक काही चूक झालेली नाही. गृह मंत्रालयाचे काम बहुतांशी कोळशाच्या खाणीप्रमाणे आहे; पण प्रत्येक वेळा गृहमंत्री हे सिद्ध करण्याचा प्रयत्न नक्कीच करतात की, खाणीची काहीही चूक नसून जी काही काजळी आहे, ते त्यांचे वैयक्तिक टॅलेंट आहे. संघ आणि भाजपचा दहशतवादाशी संबंंध जोडून शिंदे यांनी वादंग उभे केले आणि लगेचच आपले विधान वृत्तपत्रांतील बातम्यांवर आधारलेले असल्याचे सांगत कोलांटी उडी मारली. या टॅलेंटेड नेत्याच्या विधानावर काय उत्तर द्यावे, या संभ्र्रमात आरएसएस पडले होते. काहीच सुचले नाही त्यामुळे राम माधव म्हणाले की, शिंदेंनी मंत्रालय सोडून वृत्तनिवेदक व्हावे.
उपाध्यक्षांची प्रभावळ
एक तर भाजपने कोणतेही चिंतन केलेले नाही किंवा शिबिरही लावलेले नाही. दुसरे म्हणजे भाजपमध्ये किती तरी उपाध्यक्ष असतात. तिसरे म्हणजे तेथे अध्यक्षांच्या खालोखाल महासचिवांना अधिकार असतात. बहुधा याच कारणांमुळे भाजपच्या नेत्यांना राहुल गांधी उपाध्यक्ष झाल्यावर होत असलेल्या या आनंदोत्सवाचे कारण उमजलेले दिसत नाही. यावर एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, अर्जुनसिंह काँग्रेसचे उपाध्यक्ष होते, तेव्हा कमलापती त्रिपाठी कार्यकारी अध्यक्ष होते. अर्जुनसिंह एखाद्या राज्याचा दौरा करण्यासाठी विमानतळावर पोहोचत तेव्हा त्यांना घेण्यासाठी शेकडो गाड्या विमानतळावर पोहोचत. मात्र, कमलापती त्रिपाठी अशा दौ-या साठी पोहोचत तेव्हा त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांना टॅक्सी शोधावी लागत असे. ही असते उपाध्यक्षांची प्रभावळ. भाजपला हे उमजत नाहीये.
घोर दीदीगिरी
काँग्रेस जयपूरमध्ये चिंतन करत असताना, काँग्रेसचे पूर्वीचे चिंतक आणि विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोलकात्यात कामांमध्ये गढून गेले होते. अगदी त्यांच्या पूर्वीच्या सवयीप्रमाणेच. या कालावधीत त्यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जींशी दोन वेळा भेट झाली. दुसरी भेट झाली नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनानिमित्त. या कार्यक्रमादरम्यान प्रणव मुखर्जींना सुमारे अर्धा-पाऊण किलोमीटर पायपीट करावी लागली. कारण ठाऊक आहे, ममता दीदींचा हट्ट. दीदींचा तसा आदेशच होता आणि वंगभूमीमध्ये शक्तीचा आदेश कोण मोडणार?
दिवस फिरले
एखाद्या गोष्टीत कधी काळी प्रमुख भूमिकेत असलेले कोणी तरी त्या गोष्टीच्या नाट्य रूपांतरणात दर्शकाच्या भूमिकेत दिसले. याच नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर घडलेला हा किस्सा. देशात खासगी कंत्राटदाराने नव्हे, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विकसित केलेल्या विमानतळांपैकी हे एक विमानतळ. गोष्ट खूप मोठी आहे; पण यामध्ये सीताराम येचुरींची भूमिका मोठी आहे. येचुरी या समारंभाला निमंत्रित होते; पण व्यासपीठावर बसलेले नव्हते. समोर दर्शकांमध्ये खुर्चीवर बसले होते. व्यासपीठावर दीदी स्थानापन्न झाल्या होत्या. बाकी आपण सुज्ञ आहात.
कधी अस्मानी, कधी सुलतानी
नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत येऊन राजनाथसिंह यांची सव्वादोन तासांची प्रदीर्घ भेट घेतली. गळाभेट घेण्याचे आणि बंधुभाव प्रदर्शनाचे सर्व सोपस्कार पार पडले. चांगलेच राजकारण झाले. उर्दू भाषेत याला ‘सुल्तानी सियासत’ असे म्हणतात. पण या सुलतानी सियासतचा मार्ग मोकळा कसा झाला आणि यामध्ये ती कारवाई कशी झाली, जी सुलतानीपेक्षा अस्मानी अधिक भासते? सांगतो - जरा लक्ष द्या. गडकरी पुन्हा अध्यक्ष होणे अटळ आहे. मोहन भागवतांपासून सगळ्याच सुलतानांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या घटनेतही बदल करण्यात आला. पण काही सुलतान उदाहरणार्थ यशवंत सिन्हा विरोध करत होते. सिन्हा उमेदवारी अर्ज मागवतात, येथूनच अस्मानीला सुरुवात होते. गडकरी दुस-यांदा निवडणूक न लढण्याचे रात्री जाहीर करतात. निर्णय राजनाथसिंहांच्या बाजूने लागतो; पण ज्या दिवशी निवडणूक होणार आहे, त्या दिवशीच्या संचलनाची पूर्ण रंगीत तालीम झाली आहे. भाजपचे कार्यालय इंडिया गेटच्या अगदी जवळ आहे. सगळे रस्ते बंद होणार आहेत. सगळ्या नेत्यांना सकाळी लवकरच कार्यालयात पोहोचायचे आहे आणि यशवंत सिन्हांना उशीर होतो. अर्ध्या रस्त्यातून त्यांना परतावे लागते. सरते शेवटी मोदी-राजनाथसिंह यांच्या भेटीचा मार्ग मोेकळा होतो. यालाच म्हणतात, ‘अर्धी सुलतानी -अर्धी अस्मानी’.
या क्रमांकाची मदत करा
दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर दिल्ली सरकारने एक हेल्पलाइन नंगर सुरू केला आहे. या क्रमांकाला फार हेल्प मिळू शकली नाही, ही बाब निराळी. हा क्रमांक मदतीशिवाय जेवढा चालला तेवढी त्याची दुर्दशा झाली. मुख्यमंत्री
शीला दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिला या क्रमांकावर गॅस न मिळाल्याची तक्रार करत होत्या, तर काही महिला पती अजून घरी परतला नसल्याची तक्रार करत होत्या. नंबर ठप्प झाला आणि बहुतांश पतिमहाशयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.