आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pradanya Daya Pawar Article About Bhalchandra Nemade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखकराव न झालेला लेखक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. भालचंद्र नेमाडे सरांनी स्वत:चा कधीही लेखकराव होऊ दिला नाही. ते प्रस्थापित व्यवस्थेला कधीही शरण गेले नाहीत. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान अतिशय मोठे आहे. साठोत्तरी काळात मराठीमध्ये प्रस्थापित, रीतिवादी साहित्याचे जे स्तोम माजलेले होते त्याला छेद देणारे लेखन डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले. त्यांच्या या लेखनामुळे बहुजनातील लेखकांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर ग्रामीण, कष्टकरी, वंिचतवर्गातील लेखक मोठ्या प्रमाणावर लिहिते झाले. मराठी साहित्यात प्रस्थापितांची जी मक्तेदारी निर्माण झाली होती ती मोडून काढण्याचे काम त्यामुळे झाले. या सगळ्या उलथापालथीचा उगम हा डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या प्रत्ययकारी लेखनात आहे.

आजच्या लेखकांना नेमाडेंशी संवाद साधताना मनावर कोणतेही दडपण येत नाही. नेमाडे सरांनी त्यांच्या समकालीन व आजच्या लेखकांशी उत्कृष्ट सहजसंवाद राखला आहे. कोणत्याही विषयांवर सरांशी अगदी मनमोकळेपणाने चर्चा करता येते असा माझा अनुभव आहे. डॉ. भालचंद्र नेमाडे यांची मते अत्यंत अभ्यासू व ठाम असतात. "उत्कट जीवघेण्या धगीवर' हा माझा कवितासंग्रह वाचल्यानंतर डॉ. नेमाडे यांनी जळगावच्या अशोक कोतवालांना एक पत्र लिहिले. या पत्रामध्ये या कवितासंग्रहाबद्दल नेमाडे सरांनी कौतुकाने भरभरून लिहिले होते. अशोक कोतवालांनी नेमाडेंच्या या पत्राची झेरॉक्स प्रत मला काही दिवसांनंतर पाठविली. "दृश्यांचा ढोबळ समुद्र' हा माझा कवितासंग्रह दोन वर्षांपूर्वी पॉप्युलर प्रकाशनने प्रसिद्ध केला. त्या कवितासंग्रहाचा ब्लर्ब हा डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिला आहे. यात सरांनी माझ्या कवितेविषयी कौतुकाने लिहिले आहे. हा माझ्या साहित्यजीवनातील महत्त्वाचा क्षण होता. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी आजवर व्यक्त केलेल्या सगळ्याच मतांशी मी अर्थात सहमत नाही.
प्रज्ञा दया पवार
कवयित्री, मुंबई