आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनासाठी लढणारा कवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामदेव ढसाळ यांची कविता केवळ त्यांच्या जगण्याच्या परिप्रेक्ष्यापुरतीच नाही, तर त्यांच्या स्थित्यंतराच्या, परिवर्तनाच्या चळवळीचा एक अविभाज्य भाग होती. त्यांची कविता मुळात ‘मी’चा आवाज आहे, जो त्यांनी ‘आम्ही’मध्ये मिसळवून टाकला, जो त्यांनी पुढे ‘आम्ही’च्याही पलीकडे जाऊन व्यापक पातळीवर मानवी समूहामध्ये रुजवला हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य गोलपिठापासून ‘निर्वाणाआधीची पीडा’ वा ‘चिंध्यांची देवी व इतर कविता’ या काव्यसंग्रहापर्यंत दिसून येते. त्यांच्या जाण्यानं जणू घरातलाच माणूस गेला आहे.
1972 मध्ये त्यांचा ‘गोलपिठा’ कवितासंग्रह आला आणि त्यातील झंझावाताने, आशयाने, त्यातल्या अभिव्यक्तीने सगळ्यांचे डोळे खाडकन उघडले. या कवितासंग्रहाने प्रस्थापित साहित्य व्यवहाराने जगण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा यात निर्माण केलेलं फार मोठं अंतर मोडीत काढलं, म्हणजे जगण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा ही एकच असते हेच ढसाळांनी ठासून सांगितलं. स्वत: ढसाळ म्हणायचे, जग दोन भागांमध्ये विभागलं गेलंय. एक घमेल्याचं जग व दुसरं डबोल्याचं जग. ढसाळांनी घमेल्याचं जग उजेडात त्यांच्याच भाषेनिशी आणलं आहे. प्रस्थापित, अभिजनांच्या भाषेला वाकवत, नवीन पेरणी करीत त्यातून नवीन भाषा निर्माण करीत त्यांनी कविता रचली असं मला वाटतं. आपण त्यांच्या ‘गोलपिठा’बद्दल प्रकर्षाने बोलतो, पण त्यांचा ‘मूर्ख म्हाता-याने डोंगर हलवला’सारखा जो कवितासंग्रह आहे, ज्यात प्रखर राजकीय जाणिवेची कविता ही संकल्पना विशेषत्वाने आढळते. ‘या सत्तेत जीव रमत नाही’सारख्या कवितासंग्रहातही हीच जाणीव प्रखर दिसते. हक्कांसाठी, परिवर्तनासाठी सगळ्या प्रकारच्या लढाया लढल्या पाहिजेत, असं ढसाळांचं म्हणणं होतं. त्यात त्यांनी कवितेलाही सामावून घेतलं आहे. स्त्रियांनाही त्यांनी या चळवळीत सामावून घेतलं. अगदी आईलाही त्यांनी पारंपरिक भूमिकेतून पाहिलेलं नाही. व्यवस्थेची बळी असतानाही स्त्रीला त्यांनी व्यवस्थापरिवर्तनाची एक माध्यम मानले.