आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pramod Chunchuwar About Maharashtra Politics, Divya Marathi

मुंबई वार्तापत्र: बुडते जहाज आणि धृतराष्ट्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुका जसजशा तोंडावर येताहेत तसतशा राजकीय हालचालींचा वेग वाढलाय. काँग्रेस आघाडीचे गेली 15 वर्षे सत्तेच्या पाण्यावर तरंगणारे जहाज येत्या विधानसभा निवडणुकीत बुडेल आणि विरोधी पक्षांचे पराभवाच्या गाळात रुतून बसलेले जहाज या वेळेस सत्तेच्या पाण्यावर तरंगू लागेल, असे चित्र सध्या तरी दिसतेय. अर्थात, विरोधकांची पुन्हा सत्ता आली तर तो विरोधकांच्या कर्तृत्वाचा भाग नसेल. सत्ताधार्‍यांनी निष्क्रिय, असंवेदनशील व भ्रष्ट कारभाराचा कळस गाठल्याने हे परिवर्तन घडून येऊ शकते.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस आघाडीच्या जहाजाला पहिल्यांदा मोठी भगदाडे पडली. त्यानंतर आपले जहाज बुडणार हे लक्षात आल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची धावपळ सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत काय होणार, याचा अंदाज आल्याने काही हुशार नेते व कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वीच पक्षांतरे करून शिवसेना-भाजपमध्ये जाऊन स्वत:ला सुरक्षित केले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चा सुरू झालीय ती पहिल्या वा दुसर्‍या फळीतील नेत्यांची. आयुष्य काँग्रेसी विचारात काढलेल्या दत्ता मेघेंनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कारण आपल्या मुलांचे भवितव्य. राष्ट्रवादीतील झुंजार नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि आता चर्चा आहे ते नारायण राणे यांची. राणे भाजपत जाणार, अशी चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चाही झाल्याचे कळते. मात्र शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे राणेंना भाजपत नो एंट्रीचा सिग्नल मिळाला. त्यामुळे भडकलेल्या राणेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या वस्त्रहरणाचा इशारा दिला.

मंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर ठाम असलेले राणे हे पुढे काय करणार, हे गूढ कायम आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्यासमोर एकतर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत काँग्रेसमध्येच राहणे किंवा स्वत:चा नवा पक्ष स्थापन करणे असे दोनच पर्याय आहेत. मनसेने शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत देण्यास सुरुवात केल्याने मनसेसोबत आघाडीचा प्रयोग राणेंना करता येईल का, याबद्दल शंकाच आहे. 2008 मध्ये जेव्हा अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केले तेव्हा आपल्याला मुख्यमंत्री केले नाही म्हणून राणेंनी थयथयाट केला होता. काँग्रेस पक्षात येऊन अवघी तीन वर्षे होताच आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळावे हा आग्रहच मुळात अवास्तववादी राजकीय महत्त्वाकांक्षेचा भाग होता. राणे यांच्या आगमनाने कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे बळ वाढले असले तरी विधानसभा वा लोकसभेत त्यांचा फारसा उपयोग झाला असे म्हणता येणार नाही. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र नीलेश राणे हे निवडून आले असले तरी त्यासाठी अखेरच्या क्षणी राणेंना शिवसेनेतील स्थानिक नेत्यांचीच कशी मदत घ्यावी लागली आणि त्यासाठी काय काय करावे लागले याची कल्पना या परिसरातील सर्वांना आहे. 2009 च्या निवडणुकीत सुरेश प्रभूंऐवजी शिवसेनेच्या स्थानिक नेत्याला संधी मिळाली असती तर तेव्हाच चित्र वेगळे राहिले असते. केंद्रात काँग्रेस सरकार आल्यानंतर विधानसभा निवडणूक झाली तेव्हा कणकवली या पारंपरिक मतदारसंघात रवींद्र फाटक या आपल्याच माणसाला राणे निवडून आणू शकले नाहीत. जवळच्यांनी दगाफटका केल्याचे राणे सांगत असले तरी असा दगाफटका प्रत्येकच नेत्याबाबत होत असतो. 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही रायगड, मावळ अशा जागांवर काँग्रेस आघाडीचा पराभव झाला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांत विधानसभेच्या 11 जागा असताना राणे वगळता काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. याचा अर्थ लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, केवळ राणे कुटुंबातील सदस्य वगळता अन्य कुणालाही लाभ झाला नाही, हे दिसून येते. यानंतर 2012 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे मैदानातील सेनापतीही राणेच होते. त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी काढलेल्या स्वाभिमानी संघटनेने तेव्हा महापालिकेतील शिवसेना-भाजपचे गैरव्यवहार आक्रमकपणे चव्हाट्यावर आणण्याचे चांगले काम केले होते. पाण्याचे टँकरमाफिया कसे मुंबईत राज्य करतात हेसुद्धा नितेश यांनी मुंबईकरांना दाखवून दिले. ही महापालिका निवडणूक काँग्रेसने जिंकली तर त्याचे श्रेय राणेंना जाईल आणि ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाची दावेदारी करू लागतील, ही धास्ती काँग्रेस नेत्यांना वाटू लागली. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व संपून जाईल, असे शिवसेनाप्रेमींना डिवचणारे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी हेतुपुरस्सरपणे केले. यामुळे भ्रष्टाचाराची बजबजपुरी, खड्ड्यांचे साम्राज्य, तुंबलेली गटारे यांच्यामुळे त्रस्त असूनही बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असल्याचा भावनिक प्रचार वरचढ ठरला आणि त्यांच्या हयातीत महापालिकेवर दुसर्‍या पक्षाची सत्ता बघण्याचे दु:ख त्यांना सहन करावे लागू नये म्हणून अखेर मुंबईकरांनी सेना-भाजपच्या पारड्यात मते टाकली. कल्याण-डोंबिवली महापालिकेची जबाबदारीही राणेंकडे देण्यात आली होती. तेथेही काँग्रेसची सत्ता आणण्यात ते अपयशी ठरले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात काँग्रेसविरोधी सुनामी लाट वाहत होती. या लाटेत वसंतदादा पाटलांचे नातू प्रतीक, नंदुरबारचे माणिकराव गावित यांच्यासह जवळपास संपूर्ण काँग्रेस वाहून गेली. अनेक मंत्री स्वत: किंवा त्यांचे पुत्र पराभूत झाले. मात्र कुणीही मुख्यमंत्री वा काँग्रेस नेत्यांवर आपले काम न केल्याची जाहीर आगपाखड केली नाही. खरे तर काँग्रेसविरोधी लाटेमुळेच नीलेश राणेंचा पराभव झाला, असा सोयीस्कर पवित्रा घेऊन राणेंना हा आपला पराभव नसल्याचे चित्र निर्माण करण्याची राजकीय खेळी खेळता आली असती. काँग्रेसच्या नेत्यांनी आपले काम केले नाही, असे म्हणणारे राणे यांना स्वत:च्या विधानसभा मतदारसंघातही आपल्या मुलाला आघाडी मिळवून देता आली नाही. मात्र संयम व समंजसपणा यांचा अभाव असलेले राणे नेहमीप्रमाणे आक्रस्ताळी भूमिका घेत आहेत.

राणेंचे कोकणातील राजकीय सामर्थ्य संपलेले आहे. हे वास्तव काँग्रेसच्या लक्षात आले असले तरी राणे हे मान्य करायला तयार नाहीत. एकेकाळी लोकनेता असलेले राणे अद्यापही भूतकाळात रमलेले आहेत. पुत्र नीलेश आणि नितेश यांच्या राजकीय भवितव्याने चिंतित झालेला हा नेता आता पुत्रप्रेमाने अंध झालेला धृतराष्ट्र झाला आहे. त्यामुळेच शिवसेना सोडून त्यांच्यासोबत आलेले बहुसंख्य नेते त्यांना एकतर सोडून गेलेत किंवा त्या मार्गावर आहेत. भुजबळांच्या राजकीय वजन घटण्याला असेच पुत्र व कुटुंबप्रेम कारणीभूत ठरले. त्यांचे राजकारण सुरुवातीला ओबीसींचे, नंतर माळ्यांचे अखेरीस केवळ भुजबळ कुटुंबापुरते मर्यादित झाले. त्यामुळे त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच त्यांचे किशोर कन्हेरे, बनसोडेसारखे निष्ठावंतही सेनेत दाखल झालेत. एकेकाळी जाणते राजे म्हणवले जाणारे शरद पवारही आता सुप्रिया सुळे व अजित पवारांपुरते मर्यादित होत धृतराष्ट्र होण्याच्या मार्गावर आहेत. महाभारतात केवळ एकच धृतराष्ट्र होता. राज्याच्या राजकारणात एवढ्या मोठ्या प्रमाणात धृतराष्ट्रांची संख्या वाढल्याने केवढे मोठे महाभारत घडेल, याची कल्पना आपण करू शकतो. राणे हे आपला निर्णय सोमवारी जाहीर करणार आहेत. हा निर्णय जाहीर करताना ते लोकनेत्याच्या भूमिकेत जाऊन निर्णय घेतात की धृतराष्ट्राच्या, हाच खरा प्रश्न ठरणार आहे.