आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुल्लडबाजीचा ताप, बहिष्काराचा चाप, 'केले मूठभर, सांगितले हातभर' ब्रँड मोदी तत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची उलटगिणती आता सुरू झाली आहे. आचारसंहिता लागताच राजकीय रणकंदन सुरू होईल. मात्र सरलेल्या आठवड्यात या रणकंदनाची रंगीत तालीम बघायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा यासाठी निमित्त ठरला. मोदींनी नौदलाच्या आयएनएस कोलकाता या अत्याधुनिक बोटीचे जलावतरण केले आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरीही लावली. मात्र नागपूर मेट्रोचे भूमिपूजन आणि मौदा येथील औष्णिक वीज प्रकल्पाचे उद्घाटन या कार्यक्रमावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बहिष्कार टाकण्याची भूम‍िका घेत एका नव्या राजकीय संघर्षाला तोंड फोडले आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार ही जवळपास अशक्य कोटीतील गोष्ट. मात्र ती महाराष्ट्रात घडली.
व्हायब्रंट गुजरात या अनेक वर्षे पद्धतशीरपणे राबिवलेल्या जाहिरात मोहिमेतून ‘केले मूठभर, सांगितले हातभर' या तत्त्वाने ब्रँड मोदी उभा करण्यात आला आणि लोकसभा निवडणुकीत या ब्रँडचाच बाजा वाजवून मतांचा जोगवा मागण्यात आला. काँग्रेसच्या भ्रष्ट आणि धोरण लकव्याची बाधा झालेल्या सरकारला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला चारी मुंड्या चीत करण्याचा संकल्प करून भाजपला निवडून दिले. त्यामुळे भाजपमधील मोदी भक्तांना हा विजय मोदींमुळेच मिळाला, असा गर्व निर्माण झाला. प्रचारसभेत मोदी-मोदींच्या गजराने आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक स्पष्ट बहुमताने मोदींनाही हा विजय म्हणजे आपलीच मर्दुमकी, असे वाटू लागले. हा विजय मोदी लाटेमुळे नसून काँग्रेसिवरोधी लाटेमुळे आहे, असे बोलणारे वा लिहिणारे नेते वा पत्रकार यांना थेट हिंदूविरोधी वा काँग्रेसचे चमचे ठरवले गेले. मोदी भक्तांच्या या फुग्याला पहिली टाचणी लावण्याचे काम स्वत: सरसंघचालक मोहन भागवत यांनीच केले. हा विजय कुणा एकामुळे मिळालेला नसून जनतेला परिवर्तन हवे असल्याने हा विजय मिळाला. यापूर्वीही तेच नेते होते व पक्षसंघटना होती. मग का विजय मिळाला नाही. या सरकारवर लोक उद्या नाराज झालेत तर ते हे सरकारही बदलतीत, अशा शब्दात थेट कुटुंबप्रमुखानेच कान टोचल्यानंतर मात्र आता काही लोकांची भाषा बदलू लागली आहे. मात्र भाजपमधील काही लोकांनी ही मोदी भक्ती जाहीरपणे आणि बटबटीतपणे प्रदर्शित करण्यासाठी भाजपेतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोदी-मोदींचे नारे देत हुल्लडबाजी करण्याचा पवित्रा घेतला. शिस्त वा अनुशासनाचे धडे देत असल्याचे दावे करणाऱ्या संघ परिवाराला साजेशी ही हुल्लडबाजी नव्हती. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आणि त्या-त्या राज्याचे प्रशासकीय प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा असा अपमान केला जाणे योग्य नव्हते. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणात असाच व्यत्यय आणला गेला. हरियाणात मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आणि झारखंड राज्यात हेमंत सोरेन यांच्या भाषणाच्या वेळेसही अशीच नारेबाजी होणे आणि तीनही ठिकाणी हुल्लडबाजांना रोखण्यासाठी मंचावरील पंतप्रधान वा भाजप नेत्यांकडून खास प्रयत्न न होणे, यावरून यामागे भाजपमधील मोदीसमर्थक गटाची खास रणनीती होती, असे दिसते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर गेल्यावर्षीच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनोहर जोशी यांनी टीका केली आणि त्यानंतर दसरा मेळाव्यास जोशी येताच टीव्ही कॅमेऱ्यांसमोर आधीपासूनच जागा पकडून ठेवलेल्या शिवसैनिकांनी जोशींविरुद्ध नारेबाजी सुरू केली. त्यांना थांबवण्याचा लटका प्रयत्न मंचावरील नेत्यांनी केला आणि आधीच ठरल्याप्रमाणे संख्येने २०-३० असणारे हे शिवसैनिक नारेबाजी करीत राहिले. नारेबाजी थांबत नाही, असे चित्र निर्माण करून जोशी यांची मंचावरून हकालपट्टी करण्यात आली. तसाच काहीसा प्रकार गैरभाजप वा काँग्रेसी मुख्यमंत्र्यांसोबत घडत आहे. पंतप्रधानांना बोलू न देणे हा जसा देशाचा अपमान असतो तसाच मुख्यमंत्र्यांना बोलू न देणे हा त्या राज्याचाही अपमान असतो. मवाळ वाटणारे मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतलेली बहिष्काराची आक्रमक भूमिका योग्यच होती, असे म्हणावे लागेल.
सरसंघचालकांनी कान टोचल्यावरही ताळ्यावर न आलेल्या मोदींच्या आंधळ्या भक्तांना असा हिसका देण्याची गरजच होती. या बहिष्कारामुळे मोदींच्या कार्यक्रमातील हवाच निघून गेली. मोदी लाट असल्याने प्रचंड गर्दी जमेल, हा भाजप नेत्यांचा भ्रमही नागपुरात खोटा ठरला. मोदींच्या सभेकडे बहुसंख्य लोकांनीही पाठ फिरवत अप्रत्यक्ष बहिष्कार टाकल्याने अखेर माध्यमांनाच नागपुरात मोदी फिव्हर जाणवलाच नाही, असे निरीक्षण नोंदवावे लागले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या नितीन गडकरी यांचाही हिरमोड नक्कीच झाला असेल. कारण त्यांचे काँग्रेस असो की राष्ट्रवादी यांच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. या कार्यक्रमाला मोदी नसते तर केवळ गडकरींसाठी झाडून काँग्रेस वा राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते हजर झाले असते. लक्ष्मीदर्शनाची परंपरा निर्माण करणाऱ्या आरटीओ विभागात क्रांतिकारी बदल करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यांची योजना यशस्वी झाली तर देशाची प्रतिमा बदलणारे ते पाऊल ठरेल. राज्याच्या राजकारणात गडकरी यांचे आयआरबी समूहात हितसंबंध दडले असल्याचे आरोप होत असतात. या पार्श्वभूमीवर गडकरी हे देशाचे भूपृष्ठ वाहतूक मंत्री होतात आणि हरियाणातील एका राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम व टोल आकारणीचे काम नेमके आयआरबीलाच मिळते, हा बहुधा योगायोगच असावा. या कंत्राट बहालीत कुठेही लक्ष्मीदर्शन करण्याची वेळ आयआरबीवर आली नसावीच, कारण देशात पहिल्यांदाच अत्यंत प्रामाणिक सरकार आले आहे!