आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय इथले संपत नाही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळीण या गावावर काळाने घातलेली झडप राज्यच नव्हे तर देशाला सुन्न करून गेली. कालपर्यंत ज्या डोंगराने पिढ्यान्पिढ्या अंगाखांद्यावर खेळवले तो मायबाप डोंगर असा उलटेल, असा कुणाला नेमही नव्हता. या घटनेनंतर मंत्र्यांची भेट , सरकारी मदतीची घोषणा असे सर्व सोपस्कार पार पडले. पुढच्या वर्षी यापैकी अनेकांना कशी मदतच मिळाली नाही, याच्या बातम्याही सरकारी उदासीनतेवर झगझगीत प्रकाश टाकत प्रसिद्ध होतील. मात्र या प्रश्नाच्या मुळाशी न सरकारला जायचे आहे, न राजकारण्यांना आणि ना जनतेला.

बुधवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारने घेतलेले निर्णय असोत की जागा वाटपाच्या चर्चा या सर्वांवरील प्रकाशझोत दूर झाला आणि माळीणवर केंद्रित झाला. हा परिसर विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील असल्याने याला राजकीयदृष्ट्या अधिकच महत्त्व प्राप्त झाले. या घटनेनंतर जाग आलेल्या राज्य सरकारने राज्यात आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला.

डोंगरांभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय किंवा महापालिकांना सूचना देण्याचा प्रकारही असाच धक्कादायक. पावसाळा सुरू झाल्यावर शहरी भागात डोंगरी भागाभोवती भिंत बांधणे सुरू केली तर ती कधी पूर्ण होणार? मुंबईत दरवर्षी अनेक लोक डोंगरे कोसळून मरण पावतात. आता हेच मरण-भय राज्यातील डोंगरकाठी असलेल्या गावागावांवर पसरले आहे.

ग्रामीण भारतापेक्षा इंडियाचा विचार करणार्‍या नेतृत्वाचा उदय झाल्याने नागरीकरणाच्या महानतेचे ढोल बडवले जात आहेत. औद्योगिकीकरणामुळे सर्व संसाधने व नोकर्‍या केवळ शहरांमध्ये केंद्रित झाल्याने गावे ओसाड पडू लागली. ज्या गावकर्‍यांनी गावातच राहून शेती वा अन्य रोजगाराचा पर्याय निवडला त्यांच्यासमोर मात्र अनेक आव्हाने उभे राहिलेत. त्या गावांमधील पाणी शहरांना पुरवले जाते. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या अनेक योजना आजूबाजूच्या गावातील पाणी मोठ्या प्रमाणात शहरांकडे घेऊन येतात. त्यामुळे या गावात राहणार्‍या शेकडो आया-बायांना आपल्या डोक्यावर हंडे घेऊन अनेक किलोमीटर चालावे लागते आणि शहरी लोकांच्या एका फ्लशवर हजारो लिटर्स वाया जातात. शहरीकरणामुळे घरांची मागणी प्रचंड वाढली. हे घरे बांधण्यासाठी लागणारे सिमेंट, विटा, चुना आणि लाकूड यांच्यासाठी डोंगर आणि जंगले प्रचंड मोठ्या प्रमाणात कापण्यात आली आणि येताहेत.

वाळूचा प्रचंड उपसा होऊन या क्षेत्रात माफियांचा उदय झाला आहे. जिल्हा वा तालुका प्रशासनाला ही डोंगरफोड वा जंगलतोड दिसते, मात्र त्याकडे कानाडोळा करा, असे सल्ले देण्यात येतात. घरे बांधली गेली नाहीत तर बिल्डरांचे उखळ पांढरे कसे होणार आणि बिल्डरच आता राजकारण्यांचा वेष पांघरूण वावरू लागल्याने ही समस्या आता अधिक जटिल झाली आहे. लक्झरियस घरांची संकल्पना असो की घर असूनही इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली घरे घेण्याचे नवे खूळ असो यामुळे माणसांच्या स्वत:च्या तिजोर्‍या भरत असल्या तरी निसर्गाची सर्वांना सुरक्षा व आनंद देणारी संपन्न तिजोरी आता हळूहळू रिकामी होतेय, याचा कुणीही विचार करायला तयार नाही. 'निसर्ग तुमची गरज भागवू शकतो, तुमची हाव भागवू शकत नाही' हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे वचन पुन्हा एकदा सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपली हाव अशीच कायम राहिली तर एकदिवस आपणही हडप्पा-मोहंजोदडो संस्कृतीसारखे भूगर्भात गाडले जाऊ, हे लक्षात ठेवायला हवे!