आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prasanna Joshi Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

सोशल मीडियावर वर्चस्व मुं-पु मराठीचंच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट किंवा सोशल मीडियानं गेल्या काही वर्षांत कोणता क्रांतिकारी बदल झालाय, असा प्रश्न विचारल्यास - सामान्यांच्या हाती माध्यम यंत्रणा आली हेच उत्तर द्यावं लागेल. म्हणूनच, किमान मी तरी इंटरनेटला खर्‍या अर्थाने ‘मास मीडिया’ मानतो. म्हणजेच हे माध्यम परिपूर्ण अर्थानं लोकांचे, लोकांद्वारे आणि लोकांसाठी आहे. पारंपरिक मास मीडिया लोकांसाठी तर होता, मात्र लोकांद्वारे नव्हता. ही माध्यम व्यवस्था अपरिहार्यपणे एखाद्या समविचारी मंडळींच्या, ट्रस्टच्या, संस्थेच्या किंवा उद्योगांच्या नियंत्रणाखालची होती-आहे. अशी माध्यमं, मग ती वृत्तपत्रं, नियतकालिकं असो की, रेडिओ अथवा टेलिव्हिजन. त्यांच्या कार्यवहनासाठी एक व्यवस्था, कौशल्य, नियम, तंत्र आणि आराखडा-मांडणी असणं अनिवार्य ठरतं. त्यातील बाकीच्या गोष्टी आपण तूर्तास बाजूला ठेवू. अशा माध्यम व्यवस्थेतील भाषा या घटकाचा विचार करूयात.

आज महाराष्ट्रात कोंकणी-मालवणी, पुणेरी, नगरी, सातारी-कोल्हापुरी, खान्देशी, मराठवाडी, वºहाडी आणि अनेक प्रमुख-दुय्यम बोलीभाषा आहेत. बर्‍याच प्रमाणात त्या बोली भाषांमध्ये कथा-कविता आदी साहित्य प्रकारही हाताळले गेलेले दिसतात. मात्र, इथल्या माध्यम व्यवस्थेनं मुंबई-पुण्यातल्याच (मुं-पु) मराठीचा स्वीकार केला. हा स्वीकार सार्वत्रिक आणि सर्व समाजात दिसून येतो. याची एक संगती अशीही सांगता येईल की, शालेय शिक्षणापासूनच मुं-पु मराठीतील अभ्यासक्रम असल्यानं (मुं-पु मराठी अन्य मराठी बोली भाषांच्या तुलनेत का वरचढ ठरली याची सामाजिक-राजकीय कारणे आहेत. मात्र, त्या-त्या समाजातील-जातींतील सर्वच अभिजनांनी मुं-पु मराठीचा वापर बोलण्यात-लिहिण्यात केलेला आढळतो) अशा शिक्षणातून तयार झालेली शिक्षित मंडळी माध्यम व्यवस्थेत आणि वाचकांमध्येही आल्यानं माध्यमांची भाषा मुं-पु मराठी राहिली यात नवल नाही. म्हणूनच, चांदा ते बांदा आणि जळगाव ते बेळगाव बोलीभाषा अनेक असल्या तरी स्थानिक वृत्तपत्रांची भाषा मुं-पु मराठीच राहिली आणि आजही आहे.

रेडिओ तर सर्वस्वी सरकारी माध्यम आहे. (आजच्या एफ.एम. वाहिन्या सोडता) तिथेही उपरोल्लेखित कारणांमुळे याच मुं-पु भाषेचा प्रभाव राहिलाय. यानंतर खासगी वाहिन्यांचा काळ सुरू झाला. त्यातही उपरोल्लेखित पार्श्वभूमी आधीच तयार असल्यानं मुं-पु भाषेचा प्रभाव याही काळात पाहायला मिळतो. याचा अर्थ काहीच बदल झाला नाही असा नव्हे. एक प्रमुख बदल सांगायचा म्हणजे, कोंकणी-चित्पावनी मराठीचा प्रभाव असणार्‍या (मात्रा व अनुस्वार- केलें-गेलें) भाषेऐवजी अनुस्वार पद्धतीच्या (केलं-गेलं) भाषेचा वापर वाढला.

रेडिओमध्ये या भाषेचा वापर आधीपासूनच होता. यानंतर सर्वच ठिकाणी अशा भाषेचा वापर माध्यमांमध्ये आढळतो. स्वाभाविकच पुढे आलेल्या खासगी मराठी वाहिन्यांमध्ये तर त्याचा स्वीकार लगेचच झाला. मात्र, पुन्हा ही भाषाही शहरी मराठी भाषाच ठरली.

अपरिहार्यपणे ती शहरं मुंबई-पुणेच होती. एका अर्थानं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतंही असो, भले तिथले लोक अगदी त्या माध्यमात काम करत असोत, मात्र तरीही माध्यमांमधली भाषा मुं-पु मराठीच असली पाहिजे असं जणू ठरून गेलं आहे. असं होणं स्वाभाविक आणि स्वीकारार्ह का आहे? अन्य बोलींना या माध्यम-भाषा व्यवहारात कसं सामावून घेतलं जाऊ शकतं, हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. असं असलं तरी किमान मुद्रित भाषेला हरवून बोली मराठी मेनस्ट्रीम झाली हा एक महत्त्वाचा व मोठा टप्पा होय. आज वेगवेगळ्या खासगी एफ.एम. वाहिन्या आहेत. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या मिश्रणाचे अनेक प्रयोग केले जातात. विशेष म्हणजे, त्या-त्या जिल्ह्यातल्या, शहरांतल्या बोलींना जे स्थान तिथली वृत्तपत्रं आपल्या मजकुरात देऊ शकली नाहीत, ती किमया या मनोरंजनपर खासगी एफ.एम. वाहिन्यांनी करून दाखवली. मात्र, पुन्हा एक प्रश्न आहेच. उद्या या खासगी एफ.एम. वाहिन्यांना बातम्या प्रसारित करण्याची परवानगी मिळाल्यास त्याबाबतीतही या रेडिओ कंपन्या स्थानिक मराठी बोलींचा वापर करणार का?

पारंपरिक आणि ज्यांना आपण मेनस्ट्रीम माध्यमं म्हणू, अशांच्या मराठी वापराबद्दलची ही पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतर इंटरनेट-सोशल नेटवर्किंगवरील मराठी भाषेची चर्चा आपल्याला करायची आहे. कारण, महाराष्ट्रभर पसरलेल्या आणि त्या-त्या भागातील लोकांचा भरणा अशा माध्यमात असूनही स्थानिक भाषा स्थानिक आवृत्त्यातही पाहायला मिळत नाही. तेव्हा, किमान जिथं कुणाचं बंधन नाही, कुठले नियम-व्यवस्था नाही, अशा सोशल नेटवर्किंगवर काय माहौल आहे ते पाहूयात. या लेखापुरतं एक क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. उदा. मी कुठल्याही भाषिक ग्रुपनं तयार केलेल्या वेबसाइट्स मुद्दाम टाळल्या आहेत. प्रादेशिक-स्थानिक बोलीभाषांमध्ये लिहिले गेलेले ब्लॉग्जही घेतलेले नाहीत. कारण, या दोन्ही प्रकारांत सार्वत्रिक संवाद होत नाहीये. शिवाय, असे उपक्रम फारच थोड्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि कमी काळ टिकतात.

ट्विटर हे जरी अत्यंत लोकप्रिय संवाद माध्यम असलं तरी शब्दसंख्येची मर्यादा आणि प्रामुख्यानं इंग्रजीचा वापर यामुळे हे माध्यमही मी घेऊ शकलो नाही. व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, व्हायबर, वुई-चॅट वगैरे मेसेजिंग सेवा असल्या तरी, एक तर त्या-त्या प्रादेशिक लोकांना (कोकणी, खान्देशी, मराठवाडी, सातारी, कोल्हापूरकर, व-हाडी वगैरे) गाठणं अवघड. शिवाय ट्विटरप्रमाणेच इथंही मेसेजचं स्वरूप संक्षिप्तच असतं. अर्थात, अनेकदा दीर्घ मेसेजेसही वाचायला मिळतात. मात्र, ते बहुतेक वेळा फॉरवर्डेड असतात. म्हणूनच मी फेसबुक हे सोशल मीडिया माध्यमाला केंद्रीभूत मानून पुढील विश्लेषण करतोय.

फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्रकारांमध्ये प्रमुख फरक हा की, फेसबुकचं जितकं ‘मराठी’करण झालंय, तेवढं इतर सोशल मीडिया प्रकारांचं झालेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फेसबुकमध्ये एकाच वेळी दोन-चार ओळींचं स्फुट, लेख, दीर्घ लेख, फोटो, व्हिडिओ अशा ट्विटर-ब्लॉगसारख्या सोशल मीडिया प्रकारांचा आपोआपच अंतर्भाव होतो. फेसबुकच्या रचनेमुळे आपण जे काही ‘पोस्ट’ केलंय ते आपल्या मित्रांपर्यंत, फॉलोवर्स आणि अगदी अभ्यागतांपर्यंतही सहज पोहोचतं. फेसबुकचं आकर्षक-यंग रूपडंही या सोशल मीडियाला लोकप्रिय बनवतं. मात्र, एवढं सगळं असूनही फेसबुकवर वरचष्मा मुं-पु मराठीचाच आहे. माझ्या पर्सनल प्रोफाइलवर असलेल्या पाच हजार मित्रमंडळींची भाषा मुं-पु मराठीच आहे हे स्पष्ट दिसतंय. याचाच अर्थ आपली मराठी शिक्षणप्रणाली आणि याला जोडूनच वृत्तपत्रांच्या मराठीचा थेट आणि मोठा प्रभाव लोकांच्या ‘लिखित’ मराठीवर आहे, असं म्हणता येईल.

अर्थात काही अपवादही फेसबुकवर आहेत. म्हणजे अहिराणी ग्रुप, मराठवाडी बोली, सातारी, कोल्हापुरी, वºहाडी वगैरे असे भाषक ग्रुपही फेसबुकवर आहेत. त्यापैकी एक अहिराणी ग्रुप सोडला, तर बाकी सर्व ग्रुपवर थोडाफार अपवाद वगळता आपली नेहमीची मराठीच दिसते. एका अर्थानं असंही म्हणता येईल की, पुस्तकी-वर्तमानपत्री मराठी ही सोशल मीडियावर वापरण्याची ‘इंग्लिश’ भाषा बनली आहे. म्हणजे असं की, मुं-पु मराठीचा लिखाणासाठी वापर हा एक प्रकारे संबंधितांना काहीसा ‘वरचा’ फील देतो का, असं प्रश्न मला पडतो.

या निरीक्षणातून काही प्रश्न आणि समज तयार होतात. मुद्रित-नभोवाणी आणि दूरचित्रवाहिन्या यांच्यातल्या मुं-पु मराठीमुळे एकूणच महाराष्ट्रीयनांच्या काही प्रमाणात बोली आणि मोठ्या प्रमाणात लिखित मराठीवर मोठा परिणाम होतोय. आपापल्या कुटुंबात, गावात, प्रदेशात तिथली-तिथली भाषा बोलणारी मराठी मंडळी औपचारिक किंवा जनसंवादाच्या वेळी (भाषण, लेखन, चर्चा इ.इ.) मुं-पु मराठी/प्रमाणित मराठी/शुद्ध मराठी यांचा आवर्जून उपयोग करतात. या प्रकाराचं स्वागत करावं की खेद करावा? कारण, ज्या पारंपरिक माध्यमांमधून आपल्या बोलींची दखल घेतली जात नव्हती, त्या-त्या बोली भाषांमधून मुख्य प्रवाहातील माध्यमं अभिव्यक्त होत नव्हती, तिथं जेव्हा त्या बोलीभाषकांना स्वत:च्या हाती इंटरनेट-सोशल मीडियासारखं ताकदवादन माध्यम मिळाल्यावर त्यांची बोली ऑनलाइन विश्वात का फोफावली नाही? इंटरनेट किंवा सोशल मीडिया हा एक प्रकारच्या त्या-त्या भाषांचा ज्ञान-शब्दार्थ-भाषा-कोश असतो. भाषा अशा माध्यमातून वापरात राहाते, फोफावते, नवे बदल आत्मसात करते, प्रवाही होते, समृद्ध होते.

आज मराठीच्या बाबतीत हे फक्त मुं-पु मराठीसंदर्भातच होतंय. बोलीभाषा या (ही) प्रभावी माध्यमांच्या परिघाबाहेरच आहेत. आधीच इंग्रजी-हिंदीच्या तथाकथित आक्रमणासमोर मुं-पु मराठीच्याच बचावाचा, संवर्धनाचा मुद्दा कळीचा ठरतो, त्याचंच राजकारणही होतं. मात्र, शोषितांच्या या लढाईत अन्य मराठी बोलींसमोर इंग्रजी-हिंदीच्याही आधी मुं-पु मराठीसमोर टिकण्याचं आव्हान आहे, हे तितकंसं पुढे येत नाही. हा अस्तित्वाचा संघर्ष आता ऑनलाइन-वेबविश्वातही मला जाणवला त्यासाठीच हा लेख. मराठी वाचवण्यासाठी, संवर्धित करण्यासाठी तिच्या बोलींची उपासना आणि जोपासनाही तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा, ‘आपली बोली, आपला बाणा’ हे केवळ घोषवाक्यच उरेल...

प्रसन्न जोशी, मुंबई
असो. सिनिअर
प्रोड्युसर-अँकर
एबीपी-माझा