आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष संपादकीय - महंत बुद्धिवंत ... (प्रशांत दीक्षित)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुयायांची संख्या वाढवणे यातच केवळ नेतृत्वाचे कौशल्य असेल तर शरद जोशी यांच्याकडे ते निर्विवादपणे होते. राजकीय नेत्यांची झोप उडविणाऱ्या लाखांच्या सभा त्यांनी लीलया घेतल्या. तथापि, केवळ संख्या हा नेतृत्वाचा निकष होऊ शकत नाही. अनुयायांना मेंढरे बनविण्यापेक्षा प्रश्न विचारण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण करणे ही सच्च्या नेतृत्वाची खरी कसोटी असते. शरद जोशी हे त्या कसोटीलाही पुरेपूर उतरत होते. ८०च्या दशकात शरद जोशींमुळेच प्रथम महाराष्ट्रातील व नंतर देशातील शेतकरी प्रश्न विचारू लागला. हे प्रश्न फक्त आपल्या गरिबीबद्दल दाद मागणारे नव्हते. शेतकऱ्यांच्या गरिबीचे भांडवल करून मते मिळविणाऱ्या नेत्यांची फळी उभी होती. त्याचबरोबर शेती हा कसा पवित्र व्यवसाय आहे असे सांगत त्यावर अाध्यात्मिक झूल पांघरणारेही होते. जोशींचे वैशिष्ट्य असे की त्यांनी ऐहिक प्रश्न विचारले, पैशाचे प्रश्न विचारले. शेतीबद्दल व्यापक विधाने न करता, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत का नाही, असा रोकडा सवाल केला आणि शेतमालाला रास्त भाव या संकल्पनेभोवती शेतीचे अर्थकारण केंद्रित केले. आज प्रत्येक राजकीय पक्षाचे राजकारण शेतमालाच्या भावाभोवतीच फिरत असते. याचे श्रेय शरद जोशी यांच्या द्रष्टेपणाकडे जाते.

मात्र, नेता केवळ द्रष्टा असूनही चालत नाही. संख्येची ताकद त्याला उभी करावी लागते. तसेच केवळ संख्या वाढवूनही भागत नाही. त्यातून चळवळ उभी करावी लागते. शरद जोशी त्यातही यशस्वी ठरले. शरद जोशींमागे शेतकऱ्यांची शक्ती उभी राहू लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांची धाबी दणाणली होती. यातूनच त्या वेळच्या माध्यमांतून शरद जोशींची हेेटाळणी सुरू झाली. आज माध्यमांचा खुबीने वापर करून लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होणारे बरेच नेते आहेत. ही काही केवळ मोदींची मिरासदारी नाही. छुपेपणाने हा मार्ग यापूर्वीही अनेकांनी अनुसरलेला आहे. मात्र, शरद जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांची ताकद इतकी जबरदस्त होती की माध्यमे साथ देत नसूनही त्या काळी लक्षावधी शेतकरी संघटित होऊ लागले. ही चळवळ बिगर राजकीय होती. त्यामुळे राज्यकर्त्यांना दिलासा मिळाला. पण आज असे वाटते की, राजकारणात पडण्याचा जो वादग्रस्त निर्णय जोशींनी पुढे घेतला तो चळवळीच्या पहिल्याच टप्प्यात घेतला असता तर येेथील राजकीय व्यवस्थेचा पोत बदलण्यात ते यशस्वी ठरले असते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर काँग्रेसच्या हातून महाराष्ट्र बाहेर काढण्याची उत्तम संधी सज्जन समाजवादी नेत्यांना मिळाली होती. पण त्या नेत्यांनी कच खाल्ली व काँग्रेसची दुय्यम टीम म्हणून काम करणे पसंत केले. शरद जोशींच्या वेळी पुन्हा तशी संधी आली, पण तेव्हा जोशी अराजकीय राहिले. खरे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एस. एम. जोशी व अन्य नेते यांना तळागाळातील वर्गाबद्दल सच्ची सहानुभूती होती. स्पष्ट आर्थिक विचार होता आणि नि:स्वार्थ काम करण्याची तळमळ होती. शरद जोशींकडेही हेच सर्व गुण होते आणि त्यामुळेच शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित होत होता. पुढे ते राजकारणात आले. मात्र, तोपर्यंत शेतमालासह त्यांचे मुख्य मुद्दे हे राजकीय नेत्यांनी पळविले होते. त्यातच आडनावावरून कर्तृत्वाचा विचार करणाऱ्या मातीत व काळात जोशी जन्मले असल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या. शिवाय कुशाग्र बुद्धिमत्ता व संघटन कौशल्य हे क्वचितच जोडीने चालते. यामुळे शेतकरी संघटना फोफावली तशी रोडावलीही.
संघटना रोडावली असली तरी शरद जोशींनी समाजकारणात सोडलेला विचार आपला प्रभाव टाकत राहिला. कारण त्यामागे प्रचंड अभ्यासाची बैठक होती. जोशींचे आंदोलनही अण्णा हजारेंप्रमाणे भावनेची लाट नव्हती. त्यामागे निश्चित अशी आर्थिक बैठक होती. आकडेवारीचा आधार होता. भारत विरुद्ध इंडिया ही घोषणा फक्त चमकदार नव्हती, तर देशाच्या वास्तवाची नेमक्या शब्दांत केलेली मांडणी होती. यामुळेच त्या वेळच्या माध्यमवीरांना जोशींची हेेटाळणी करता आली असली तरी त्यांचा मुद्दा कधीही खोडून काढता आला नाही. बौद्धिक आयाम हे शेतकरी संघटनेचे वैशिष्ट्य होते. याबाबत न्यायमूर्ती रानडे व लोकमान्य टिळक यांच्याशी जोशींचे नाते जुळते. हा आयाम सध्या सर्वच क्षेत्रांतून हद्दपार होत चालला आहे व आजच्या चळवळी या चित्रवाहिन्यांवरील मालिकांप्रमाणे टीआरपीवर आधारलेल्या आहेत. भावनांपेक्षा आकडेवारी व प्रत्यक्ष वास्तवाशी थेट संपर्क ही जोशींच्या चळवळीची सामर्थ्यस्थाने होती. वास्तवाशी नाळ जुळलेली असल्यामुळे सामािजक अभ्युदयासाठी महिलांची साथ किती मूल्यवान आहे हे जोशींनी जाणले. महिलांच्या समाजातील स्थानाबद्दल, त्यांच्या सबलीकरणाबद्दल तोपर्यंत बरेच बोलले जात होते. भाषणे तर शतकभर होत होती. पण महिलांच्या सबलीकरणाचा मार्ग हा सातबाऱ्यातून जातो हे शरद जोशींनी लक्षात घेतले. चांदवडच्या सभेत साडेतीन लाख महिला जमा झाल्या व तेथे सातबाऱ्यावर महिलांच्याही नोंदी घेण्यात आल्या. ही महत्वाची सामाजिक क्रांती होती व ती महात्मा फुलेंशी नाते सांगणारी होती. ‘लक्ष्मीमुक्ती’ हा शरद जोशींनी दिलेला मंत्र ग्रामीण भागातील महिलांमध्ये नवचैतन्य देऊन गेला. नेटाने राबवला तर आजही हा मंत्र फार मोठा सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणू शकतो. शेतीची मालकी महिलेकडे गेली तर केवळ उत्पन्नाचा स्तर वाढणार नाही तर शेतकरी कुटुंबाच्या जीवनशैली व राहणीमानात परिवर्तन घडून येईल. शरद जोशींच्या चळवळीच्या या सामाजिक अंगाकडे अभ्यासकांचे म्हणावे तसे लक्ष गेले नाही.
‘अभ्यासोनी प्रगटावे’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे जोशी वागत असल्याने त्यांच्या विचारांची दखल घेेणे राज्यकर्त्यांना भाग पडत असे. अभ्यास हाच शरद जोशींचा पिंड होता आणि अभ्यासाला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नव्हते. मूलभूत गोष्टींकडे जाण्याची ओढ बुद्धीला असल्यामुळे गेली काही वर्षे ते क्वांटम सिद्धांताकडे वळले. अलिकडे जगातील अभ्यासाची क्षेत्रे एकमेकांपासून तुटक राहिलेली नाहीत. अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे शास्त्र नाही. माणसांच्या भावभावना, त्याची प्रकृती,
त्याच्यावरील संस्कार याचबरोबर त्याची जडणघडण अशा सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे केवळ मानसशास्त्रच नव्हे तर हवामानशास्त्र, शरीरशास्त्र यांच्या जोडीला भौतिकशास्त्रालाही बरोबर घेऊन काम करीत आहे. या नव्या ज्ञानशाखांची चाहूलही आपल्याकडील अनेक माध्यमवीरांंना अद्याप लागलेली नाही. मात्र जोशींना ती लागली होती. शुद्ध व सात्विक बुद्धीला कधी ना कधी वैश्विक सत्याची ओढ लागतेच. शरद जोशींना ती ओढ लागली असेल तर त्यात नवल नाही. गेली काही वर्षे ते अमूर्तात रमू लागले होते. मात्र ही अमूर्तता मातीतून आलेली होती. आजच्या फॅशनेबल भाषेत बोलायचे तर ही अमूर्ताची ओढ ‘ऑरगॅनिक’ होती. ते वास्तवापासून पळून जाणे नव्हते तर वास्तवात अधिक खोल मुसंडी मारणे होते. इथे त्यांचे नाते एम एन रॉय यांच्याशी जुळते. शरद जोशींच्या आयुष्याचा विचार करता चळवळीचे यशापयश हा गौण मुद्दा ठरतो. नव्या दिशेने विचार करण्यास आणि तो विचार वास्तवाशी ताडून पाहण्यास समाजाला उद्युक्त करण्याचे काम शरद जोशींनी केले. हे कार्य चळवळ उभारणीपेक्षा अधिक मौलिक आहे असे आम्ही मानतो.

दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे,
जाणजाणोनी निवळे, यथायोग्य|
ऐसा जाणे जो समस्त, तोचि महंत बुद्धिवंत
,
असे समर्थांनी म्हटले आहे. हे वर्णन शरद जोशींना लागू पडते.
- प्रशांत दीक्षित