‘डर’ चित्रपटात कथानकाच्या मध्यापर्यंत नायकच खलनायक आहे. हे समजून घेता येत नाही. भारतीय समाजाचेही हेच वास्तव आहे. व्यवस्थेने खलनायकांनाच नायक म्हणून प्रस्थापित केले आहे. खरे नायक पुढे येऊच दिले नाहीत. भारत नावाच्या भूखंडाला राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी अवघे जीवन समर्पित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वर्ण-वर्गवर्चस्ववादी व्यवस्थेने अघोषित बहिष्कृत केले. त्यामुळे त्यांचे यथार्थ आकलन व मूल्यमापन झाले नाही. सध्या राष्ट्रवाद आणि देशद्रोह यासंदर्भात खल सुरू असून बाबासाहेबांचे म्हणणे समजून घेतल्यास हे संभ्रमाचे धुके वितळून जाईल. राष्ट्र संकल्पनेबाबत बाबासाहेब म्हणतात, “सामाजिक व मानसिकदृष्ट्यादेखील
आपण राष्ट्र नावाच्या संज्ञेस पात्र नाही. हे जेवढ्या लवकर समजून घेता येईल तितके फायदेशीर. कारण नंतरच मग ‘राष्ट्र’ ही संज्ञा प्राप्त करून घेण्यासाठी लागणारी साधने आणि मार्ग शोधण्यास उद्युक्त होऊ. भारत जातीने बुजबुजला आहे. या जाती स्वभावत: राष्ट्रविरोधी आहेत. असे म्हणण्याचे कारण असे की, त्या परस्परात द्वेष आणि तिरस्कार निर्माण करतात. तथापि, आपल्याला भारतास राष्ट्र बनवायचे असेल तर या अडचणीतून आपण मार्ग काढले पाहिजेत. कारण भातृभावशिवाय स्वातंत्र्य, समतेचे पापुद्रे अगदीच पालापाचोळ्यासारखे राहतील.” बाबासाहेबांचा हा इशारा सत्यात येऊ पाहत आहे. प्रतिगाम्यांनी बाबासाहेबांना समजून घेतले नाही आणि आंबेडकरवाद्यांनी त्यांना समग्रपणे जगापुढे नेले नाही. बाबासाहेबांचा राष्ट्रवाद अंतिमत: भारताला राष्ट्रात रूपांतरित करण्यासाठी होता. आजच्या प्रतिगाम्यांसारख्या संकुचित नव्हता. मानवता, समता, बंधुता यावर आधारित देश निर्माण करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. बाबासाहेबांच्या क्रांतितत्त्वज्ञानाचा अन्वयार्थ लावून आजच्या वर्तमानात व भौतिक परिस्थितीत विकास करण्याची जबाबदारी आंबेडकर अनुयायांना पार पाडता आली नाही. कार्ल मार्क्स, लेनिन, माओ यांना समर्थ अनुयायी मिळाल्यामुळे काही देशांत अपेक्षित क्रांती घडली. आंबेडकरवाद जग शोषणमुक्त करण्याचे व देशाला समताधारित राष्ट्रात रूपांतरित करण्याचे क्रांतिविज्ञान आहे. जग बदलण्याचे क्रांतिसूत्र त्यांनी दिलेले असताना अनुयायांना क्रांतीचे कार्य पुढे नेता आले नाही. क्रांतीसाठी देशात जात आणि वर्ग हे दोन अडथळे असल्याचे निदान बाबासाहेबांनी केले आहे. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठात त्यांनी जातीच्या उत्पत्तीसंबंधी शोधनिबंध सादर केला तसेच १९३६ मध्ये जातिसंस्थेचे उच्चाटन हे पाकिस्तानातील जातपात तोडक मंडळास सादर करावयास भाषण तयार केले. जातिसंस्थेसंदर्भात एवढे यथार्थ मूलगामी विश्लेषण कुणीही केलेले नाही. जातिसंस्थेचा उगम, प्रसार आणि संरचना त्यांनी उघड केली. याद्वारे त्यांनी भारतीय क्रांतीचे सूत्र दिले. मात्र याकडे डोळेझाक करण्यात आल्याने कागदपत्रांवरून जात काढून टाका म्हणजे जात नष्ट होईल, अशा मानसिकतेत आंबेडकरी चळवळ गुरफटलेली आहे. बाबासाहेबांनी अत्यंत मार्मिकेतेने भारतीय समाजव्यवस्थेची चिरफाड केली. जात ही राष्ट्रविरोधी असल्याचे निदान करून जात बळकट करण्यास स्त्रीची कळीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जातिसंस्थेची निर्मिती स्त्रियांना गुलाम करण्यासाठी झाल्याचे बाबासाहेब म्हणतात. स्त्री ही जातिसंस्थेची प्रवेशद्वार आहे. जातिसंस्थेची गुरुकिल्ली जातिअंतर्गत विवाह आहे. केवळ सहभोजन आणि आंतरजातीय विवाहांमुळे जातिअंत होणार नाही. ज्या धर्मशास्त्रांवर, वेदप्रामाण्यावर ही जातव्यवस्था उभी आहे, ते धर्मशास्त्र उखडून फेकावे लागेल. हा कृती कार्यक्रम बाबासाहेबांनी दिला. हिंदू धर्मशास्त्रामुळे जातीय विषमता प्रस्थापित झाली. या धर्मशास्त्रात स्रीला काडीचेही स्थान नाही. तरीही जातीचे, धर्माचे ओझे वाहण्याचे, पोसण्याचे कार्य स्त्रीवर लादलेले आहे. स्त्री दलितातील दलित, शूद्रातिशूद्र अशी खऱ्या अर्थाने सर्वहारा आहे. स्त्रीला याची जाणीव करून दिल्यास आणि तिला जातिअंताच्या लढ्याच्या अग्रभागी आणल्यास जातीचा अंत होईल. हे क्रांतिसूत्र बाबासाहेबांनी दिले. आंबेडकरोत्तर चळवळीने याकडे कानाडोळा केल्याने अपेक्षित जातिअंत होऊ शकला नाही. जातिअंत, स्त्रीमुक्ती, राष्ट्रनिर्मिती आणि बांधणी यात परस्परसंबंध आहेत. पुरुषाला जन्माने जात मिळते, तर स्त्रियांना जन्माने आणि विवाहाने पुरुषांकडून जात मिळते. पुरुषांची जात कधीच बदलत नाही, म्हणून ती अपरिवर्तनीय आहे. मात्र स्त्री मुळात जातिविहीन असल्यामुळे तिला पित्याकडून किंवा पतीकडून जात मिळते. म्हणजेच स्त्रीची जात परिवर्तनीय नाही. ही स्त्री जातीची ओझे वाहणे, पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणे, जातीला सदस्य मिळवून देणे अशी हमालीचे कामे तिच्यावर लादलेली आहे. म्हणून स्त्रीला जातीचा अंत करण्याच्या लढाईत अग्रभागी आणून धर्मशास्त्रे उखडून फेकण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्याचा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. ज्या धर्माने बहिष्कृत केले, त्या धर्माला, मंदिराला भारतीय स्त्री कवटाळू पाहत आहे. मंदिर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा हा क्रांतिविचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास चळवळीने प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे. मात्र आजची तथाकथित आंबेडकरी चळवळ भावनिक मुद्द्यांवर मनुवादी व्यवस्थेशी समन्वयवादी झाल्याने आंबेडकरी क्रांती धूसर झालेली दिसत आहे. चक्रधर स्वामी यांनी दिलेल्या हत्ती आणि चार आंधळ्यांच्या दृष्टांतासारखी आज चळवळीची अवस्था आहे. आंबेडकरी तत्त्वज्ञान क्रांतीचे विज्ञान आहे. याचे आकलन करून घेऊन व्यूहरचना, संघर्ष, प्रबोधन आणि संघटना या आघाड्यांवर युद्धरत झाल्याशिवाय व युद्धाचे नेतृत्व स्त्रीकडे सोपवल्याशिवाय जातिअंत होणार नाही. राष्ट्रनिर्माण तर कधीच होणार नाही.