आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन अध्यक्षपदासाठी खुल्या पद्धतीने मतदान हवे; प्रवीण दवणे यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मराठी साहित्य संमेलनाच्याअध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ एक हजार सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत तर एकही मतदार नाही. ठरावीक शहरांतच मतदार एकवटले आहेत. ज्याला मतदान केले ते सत्कारणी अाहे का, हे मतदाराला समजले पाहिजे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मतदान करताना ते आवडीने करता आले पाहिजे. मतदारांच्या आवडीचे लगाम एखाद्या व्यवस्थापनाच्या हाती नसावेत. तसे झाल्यास हे कोण असे विचारण्याची वेळ मतदारांवर येते. ज्याला वाचले, पाहिले, ऐकले अशी व्यक्तीच संमेलनाची अध्यक्ष झाली पाहिजे,’ अशी अपेक्षाही दवणेंनी व्यक्त केली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आणखी पाठपुरावा करावा लागणार आहे. इतर राज्यांतील लेखक नव्या लेखकांबद्दल ममत्त्वाने बोलतात, महाराष्ट्रातही तसे झाले पाहिजे, असे मत दवणे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयांमधील नियतकालिकांचे काही लेखन चांगले असते. त्यांना पुढे आणण्यासाठी मुद्दाम प्रयत्न झाले पाहिजेत. पु. ल. देशपांडे यांचा आदर्श समोर ठेवून येणाऱ्या ९० टक्के पत्रांना मी उत्तरे देतो. तरुणांच्या पाठीवर हात ठेवणारा अध्यक्ष हवा, मग तो कुणीही असो, तरच नवोदितांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

मी कवी असलो,तरी कल्पनेत रमलेलो नाही, असे सांगून दवणे म्हणाले, खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे साधेपणातील सुगंध मला समजला. गावोगावी वस्तीला राहिलो, तेव्हा समजले की घराघरांत ‘बहिणाबाई’ आहेत. अशा बहिणाबाईंसाठी माझ्या आजीच्या कवितांची स्पर्धा घेणे गरजेचे आहे. संमेलनाच्या अध्यक्षांनी अशी स्पर्धा आयोजित करून निवडक कवितांचे पुस्तक प्रकाशित केले, तर नवोदित लेखकांना मोठी संधी मिळेल. काचेवरील मजकुराचा जमाना आला, तरी कागदावर छापलेल्या मजकुराची विश्वासार्हता कायम आहे. काचेवरील मजकूर पटकन पुढे सरकतो, वृत्तपत्र पुस्तकांमधील मजकूर मात्र डोक्यात शिरतो, असे दवणे म्हणाले.
सर्वच स्तरांतून मिळतेय प्रेम
गेली ४० वर्षे मी लिहितो आहे, कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरतो आहे. अनेक नवोदितांना मी लिहितं केलं आहे. त्यामुळे मी अध्यक्षपदासाठी उभा असल्याचे समजताच अनेकांकडून पाठिंबा मिळतो आहे. द. मा. मिरासदार, डॉ. प्र. ल. गावडे यांच्यासारख्यांकडून मिळालेले आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडूनही असेच मोठे प्रेम मिळत आहे, असे दवणे म्हणाले.

मराठी सर्व शाखांसाठी हवी
‘दहावी पुरते मराठी क्लेशदायक असून भविष्य अंधकारमय करणार आहे. कोणतीही शाखा असो मराठी हा एक विषय हवाच. आयपीएस, आयएएस होणाऱ्या मुलांना परीक्षेला तोंड देण्यासाठी मराठीचे तास लावावे लागतात. त्यातून ते टवके उडालेली मराठी शिकतात. त्यामुळे मराठीचे कोलाज तयार होते. त्यामुळेच केवळ दहावीपुरता मराठी विषय ठेवता तो पुढे सर्व शाखांसाठी बंधनकारक असला पाहिजे,’ असे दवणे यांनी सांिगतले.

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे लोभाचे आणि उपभोगाचे नाही. त्यामुळे या पदासाठी खुले मतदान असले पाहिजे. खुले मतदान घेतल्यास या निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट होईल’, असे मत संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. नगर येथील दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयाला सदिच्छा भेटी दिल्यानंतर संपादकीय सहकाऱ्यांशी बाेलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...